T20 World Cup Women : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कोण वरचढ? हेड-टू-हेड रेकॉर्ड आणि पिच रिपोर्ट जाणून घ्या
GH News October 03, 2024 11:09 PM

दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानात भारत आणि न्यूझीलंड हे संघ आमनेसामने येणार आहेत. वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं हे नववं पर्व आहे. वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा दिसला आहे. भारताने एकदाच 2020 टी20 वर्ल्डकप स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. तेव्हा ऑस्ट्रेलियाने पराभवाची धूळ चारली होती. पण भारताने पुन्हा एकदा जेतेपदाचं स्वप्न पाहिलं असून यंदा जेतेपदावर नाव कोरणार हा विश्वास व्यक्त केला आहे. यावेळी भारतीय संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंचा चांगला तालमेल आहे. युएईची खेळपट्टी फिरकीपटूंना मदत करणारी असल्याने आशा शोभना, श्रेयंका पाटील, दीप्ती शर्मा आणि राधा यादव यांच्याकडून अपेक्षा आहेत.भारताची फलंदाजीही चांगली असून मोठी धावसंख्या करण्याची ताकद आहे. शफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांच्यावर संघाला चांगला स्टार्टअप करून देण्याची जबाबदारी असेल. हरमनप्रीत कौर आणि जेमिमा रॉड्रिग्स मधल्या फळीत डाव सावरतील. तर रिचा घोष आणि पूजा वस्त्राकर डेथ ओव्हरमध्ये भारताला मोठी धावसंख्या करण्यात मदत करतील.

न्यूझीलंडचा संघ अलीकडच्या काळात फारशा फॉर्ममध्ये नाही. न्यूझीलंडने शेवटच्या दहा टी 20 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे.इंग्लंडविरुद्ध सात आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यात पराभव झाला आहे. न्यूझीलंडने 2009 आणि 2010 मध्ये उपविजेतेपद पटकावले होते. पण जेतेपद काही मिळवलेलं नाही. त्यामुळे भारतासाठी एक दिलासादायक बाब असेल. दुसरीकडे, दुबईची खेळपट्टी फिरकीला मदत करणारी आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पाच महिला टी20 सामने खेळले आहेत.प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी दोन सामने, तर पाठलाग करणाऱ्या संघांनी तीन वेळा विजय मिळवला आहे. पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या फक्त 90 आहे.

भारत आणि न्यूझीलंड हे संघ 13 वेळा आमनेसामने आले आहेत. आकडेवारीत न्यूझीलंडचा संघ तगडा असल्याचं दिसत आहे. न्यूझीलंडने 9 तर भारताने फक्त 4 सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे या सामन्यात नेमकं काय होते याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11

टीम इंडिया : शफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋचा घोष (विकेटकीपर), श्रेयंका पाटील, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, आशा शोभना, राधा यादव, रेणुका सिंग.

न्यूझीलंड : सुझी बेट्स, अमेलिया केर, सोफी डेव्हाईन (कर्णधार), ब्रूक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गझ (विकेटकीपर), फ्रॅन जोनास, लेह कॅस्परेक, जेस केर, मॉली पेनफोल्ड, रोझमेरी मायर.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.