शतकाच्या अगदी जवळ येऊनही दूर राहिला भारतीय खेळाडू, एका चुकीमुळे झालं मोठं नुकसान
Marathi October 04, 2024 07:24 PM

भारतीय कसोटी संघाचा सदस्य ध्रुव जुरेल सध्या इराणी चषक स्पर्धेत रेस्ट ऑफ इंडिया संघाकडून खेळत आहे. ध्रुवनं या सामन्यात शानदार खेळी करत आपल्या संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढलं. तो ज्या पद्धतीनं फलंदाजी करत होता, ते पाहता आपलं शतक पूर्ण करेल असं वाटत होतं. मात्र एका चुकीमुळे तो शतकापासून मुकला.

इराणी चषकात मुंबईनं रेस्ट ऑफ इंडियाविरुद्ध 537 धावांची मोठी धावसंख्या उभारली. संघाकडून सरफराज खाननं नाबाद 222 धावा केल्या. या धावसंख्येला प्रत्युत्तर देताना रेस्ट ऑफ इंडियानं 416 धावा केल्या, ज्यात ध्रुव ज्युरेलची मोठी भूमिका होती. मात्र त्याला आपलं शतक पूर्ण करता आलं नाही.

सामन्याच्या पहिल्या डावात ध्रुवनं 121 चेंडूत 93 धावांची खेळी केली, ज्यात 13 चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. त्यानं अभिमन्यू ईश्वरनसोबत 165 धावांची भागीदारी केली. शम्स मुलानी यानं ही भागीदारी तोडली. जर ध्रुवनं येथे थोडा संयम दाखवला असता, तर तो आपलं शतक पूर्ण करू शकला असता.

वास्तविक, मुलानीनं चेंडू लेग स्टंपच्या बाहेर टाकला होता, ज्यावर ध्रुवनं स्वीप शॉट खेळला. चेंडू त्याच्या हाताला लागला आणि विकेटच्या मागे गेला, जिथे यष्टिरक्षक हार्दिक तामोरनं त्याचा झेल घेतला. जर ध्रुवनं हा चेंडू सोडला असता किंवा बचाव केला असता, तर कदाचित त्यानं आपली विकेट वाचवून शतक पूर्ण केलं असतं. या मॅचमध्ये ध्रुव ज्युरेलनं फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 1000 धावाही पूर्ण केल्या. आता त्याच्या एकूण 26 डावांत 1085 धावा झाल्या आहेत. त्यानं याच वर्षी मार्चमध्ये इंग्लंडविरुद्ध भारतीय कसोटी संघात पदार्पण केलं होतं.

या सामन्यात रेस्ट ऑफ इंडिया संघाची सुरुवात चांगली झाली नाही. संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड 9 धावा करून बाद झाला. त्याच्यानंतर साई सुदर्शन 16 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. ईशान किशनला केवळ 38 तर देवदत्त पडिक्कलला केवळ 16 धावा करता आल्या. यानंतर ध्रुव आणि ईश्वरन यांनी डावाची धुरा सांभाळली. ध्रुव 393 च्या एकूण धावसंख्येवर बाद झाला. तीन धावांनंतर ईश्वरनही पॅव्हेलियनमध्ये परतला. ईश्वरननं 292 चेंडूंचा सामना करत 191 धावा केल्या. आपल्या खेळीत त्यानं 16 चौकार आणि एक षटकार लगावला.

हेही वाचा –

मुलीला भेटल्यानंतर हसीन जहाँचे शमीवर गंभीर आरोप; म्हणाली, “तो फक्त दाखवण्यासाठी…”
मुंबई विरुद्ध रेस्ट ऑफ इंडिया सामना ड्रॉ झाला, तर कोणता संघ ठरेल इराणी चषकाचा विजेता? नियम जाणून घ्या
टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये होणार बदल! सामन्यापूर्वी प्रशिक्षक मजुमदार यांचा मोठा खुलासा…


© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.