Irani Cup : रेस्ट ऑफ इंडियाचं कमबॅक, मुंबईची दुसऱ्या डावात घसरगुंडी, दिवसअखेर 274 धावांची आघाडी
GH News October 04, 2024 09:11 PM

इराणी कप ट्रॉफीतील चौथ्या दिवसाचा खेळ संपला आहे. मुंबईने दुसऱ्या डावात 6 विकेट्स गमावून 153 धावा केल्या आहेत. मुंबईकडे पहिल्या डावातील 121 धावांची आघाडी आहे. मुंबईने या आघाडीच्या जोरावर दिवसाचा खेळ संपेपर्यंत 274 धावांची भक्कम आघाडी मिळवली आहे. मात्र रेस्ट ऑफ इंडियाच्या गोलंदाजांसमोर मुंबईची दुसऱ्या डावात घसरगुंडी झालेली पाहायला मिळाली. रेस्ट ऑफ इंडियाने पहिल्या विकेटचा अपवाद वगळता मुंबईला ठराविक अंतराने झटके देत दिवसअखेर 160 धावांच्या आत रोखत कमबॅक केलं. त्यामुळे आता सामन्याच्या पाचव्या आणि अंतिम दिवशी निकाल लागणार का? याकडे लक्ष असणार आहे.

मुंबईचा दुसरा डाव

सर्फराज खान आणि तनुष कोटीयन हे दोघे 9 आणि 20 धावा करुन नाबाद परतले. तर त्याआधी पृथ्वी शॉ आणि आयुष म्हात्रे या सलामी जोडीचा अपवाद वगळता टॉप आणि मिडल ऑर्डरमधील एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. पृथ्वी शॉ याने सर्वाधिक 76 धावांचं योगदान दिलं. तर आयुष म्हात्रेला 14 धावा करुन माघारी जावं लागलं. तर हार्दिक तामोरे, कॅप्टन अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर आणि शम्स मुलानी या चौकडीने निराशा केली. शम्सला भोपळाही फोडता आला नाही. हार्दिक, श्रेयस आणि अजिंक्य या तिघांनी अनुक्रमे 7, 8 आणि 9 अशा धावा केल्या. रेस्ट ऑफ इंडियाकडून सारांश जैन याने चौघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर मानव सुथारने 2 विकेट्स मिळवल्या.

रेस्ट ऑफ इंडियाचा पहिला डाव

रेस्ट ऑफ इंडियाने चौथ्या दिवसाची सुरुवात 4 बाद 289 धावांपासून सुरुवात केली. मात्र रेस्ट ऑफ इंडियाला चौथ्या दिवशी 6 विकेट्सच्या मोबदल्यात 127 धावाच करता आल्या. त्यामुळे रेस्ट ऑफ इंडियाचा पहिला डाव हा 416 धावांवर आटोपल्याने भारताला 121 धावांची आघाडी मिळाली. रेस्ट ऑफ इंडियाकडून अभिमन्यू इश्वरन याने सर्वाधिक 191 धावांची खेळी केली. ध्रुव जुरेलने 93 धावांचं योगदान दिलं. इशान किशन याने 38 तर साई सुदर्शन याने 32 धावा केल्या. शेवटच्या 2 फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. तिघांनी दुहेरी आकडा गाठण्याआधीच मैदानाबाहेरचा रस्ता धरला. तर सारांश जैन 9 धावांवर नाबाद परतला. मुंबईकडून तनुष कोटीयन आणि शार्दूल ठाकुर या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. मोहित अवस्थीने दोघांना मैदानाबाहेर पाठवलं. तर एम खान याने 1 विकेट घेतली.

चौथ्या दिवसाचा खेळ संपला

मुंबई प्लेइंग ईलेव्हन : अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, आयुष म्हात्रे, श्रेयस अय्यर, सरफराज खान, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, शम्स मुलानी, तनुष कोटियन, मोहित अवस्थी आणि एम जुनेद खान.

रेस्ट ऑफ इंडिया प्लेइंग ईलेव्हन : ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), देवदत्त पडिक्कल, अभिमन्यू ईश्वरन, साई सुदर्शन, इशान किशन, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), मानव सुथार, सरांश जैन, यश दयाल, प्रसीध कृष्णा आणि मुकेश कुमार.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.