कारवाईला वळसा, केवळ नोटिसा प्रदूषण नियंत्रण मंडळाची कार्यशैली ः इतरांवर जबाबदारी ढकलत कानावर हात
esakal October 05, 2024 02:45 AM

प्रदीप लोखंडे ः सकाळ वृत्तसेवा

पिंपरी, ता. ४ : वाढत्या नदी प्रदूषणावरून ठोस कारवाई करण्याऐवजी केवळ नोटिसांवर बोळवण करण्याचे काम महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ करत आहे. प्रदूषणाची जबाबदारी घरगुती सांडपाण्यातून होत असल्याचा निष्कर्ष मंडळाने काढला आहे. त्यावरून प्रदूषणाची जबाबदारी पिंपरी-चिंचवड महापालिका आणि ग्रामपंचायतींवर ढकलत स्वतःची जबाबदारी झटकत असल्याचे चित्र आहे. जानेवारी २०२४ पासून आतापर्यंत पिंपरी-चिंचवड महापालिकेला तीन वेळा नोटीस बजावली आहे. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) प्लॉन्ट नसलेल्या कंपन्यांना देखील नोटीस बजाविण्यात येत असल्याचा दावा मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे. प्रत्यक्षात मात्र त्यांच्याकडून कारवाईकडे काणाडोळा केला जात असल्याचे चित्र आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत पवना, इंद्रायणी तसेच मुळा नद्या वाहतात. या नद्यांच्या प्रदूषणाचा प्रश्न सातत्याने उभा राहत आहे. दूषित सांडपाणी नाल्याद्वारे नदीपात्रात मिसळत असल्याने नदीपात्र फेसाळत आहे. पवना नदीवर थेरगाव येथील केजुबाई बंधारा आणि इंद्रायणी नदीवर आळंदी येथे फेस तयार होत आहे. अनेकदा माशांच्या मृत्यूच्या घटना घडल्या आहेत. उन्हाळ्यात सर्वच नद्या जलपर्णीने भरून जातात. नदीचे पाणीच दिसत नसल्याची स्थिती होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटते. डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नदीकाठचे रहिवासी त्रस्त झाले असून, आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
नागरिकांच्या सातत्याने येणाऱ्या तक्रारींवरून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नद्यांमधील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्यामध्ये घरगुती सांडपाणी नदीत मिसळत असल्याने नदी प्रदूषणात वाढ होत असल्याचा निष्कर्ष काढला होता. त्यावरून देहू, तळेगाव परिसरातील काही ग्रामपंचायतींना तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेला नोटीस बजाविण्याचा दिखावा मंडळाने केला. जानेवारीपासून महापालिकेला तीन वेळा नोटीस बजावून पाण्यावर प्रक्रिया करण्याच्या सूचना दिल्याचे मंडळाचे म्हणणे आहे. मात्र, नोटीस देण्यापलीकडे इतर ठोस कारवाईकडे मंडळाने दुर्लक्ष केले असल्याची वस्तुस्थिती आहे.

इंद्रायणी नदीमध्ये कंपन्यांचे रासायनिक सांडपाणी मिसळत आहे. त्यामुळे नदी प्रदूषित होत असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे. नदी काठावरील नागरिकांनी त्याबाबत सातत्याने तक्रारी केल्या आहेत. मात्र, कंपन्यांवर ठोस कारवाई करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. कंपन्यांवर मंडळाची एवढी मेहेरबानी का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सीईटीपी प्लॅन्टसाठी हवा पाठपुरावा
उद्योगनगरीत मोठ्या कंपन्या वगळता अनेक कंपन्यांकडे एसटीपी अथवा केमिकल इन्फ्ल्युन्स ट्रिटमेंट प्लॅन्ट (सीईटीपी) प्लॅन्ट नाहीत. त्यामुळे या कंपन्यातील रासायनिक सांडपाणी प्रकिया न होताच गटारे व नाल्याद्वारे थेट नद्यांमध्ये जाते व त्यामुळे नद्यांचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. तत्कालीन महापालिका आयुक्त श्रीकर परदेशी, एमआयडीसी अधिकारी, चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज असोसिएशनचे पदाधिकारी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाची संयुक्त बैठक नऊ वर्षापूर्वी पार पडली होती. यामध्ये एमआयडीसी, महापालिका, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, उद्योजक यांच्यावतीने रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा सीईटीपी उभा करण्याबाबत चर्चा करण्यात आली. परंतु; याबाबत अद्याप कुठलीच ठोस भूमिका घेऊन प्रकल्प कार्यान्वित होण्याबाबत हालचाली झालेल्या दिसत नाहीत. याबाबत या संस्थांबरोबरच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानेही पुढाकार घेऊन हा प्रकल्प कसा मार्गी लागेल, याबाबत हालचाली करायला हव्यात, असे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच एमआयडीसीमधील अनेक कंपन्यांचे पाणी नाल्याद्वारे नदीत मिसळून नदी प्रदूषित होत आहे. त्यावरही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठोस पावले उचलली नाहीत.

महापालिकेची कार्यवाही
१) नदी प्रदूषित करणारे नाले एसटी प्लॅन्टकडे वळविले
२) पवना नदीत मिसळणाऱ्या नाल्यांना वळविण्याचे काम पूर्ण
३) इंद्रायणी नदी पात्रात आळंदी येथील भाग वगळता इतर ९० टक्के काम पूर्ण
४) मुळा नदीत मिसळणाऱ्या नाल्यांवरील कामाला सुरवात

‘‘घरगुती सांडपाण्यामुळे नद्यांच्या प्रदूषणात वाढ होत असल्याचे दिसते. त्यामुळे या सांडपाण्यावर प्रक्रिया होणे आवश्यक आहे. त्या बाबत आम्ही पिंपरी-चिंचवड महापालिकेला वारंवार नोटिसा दिल्या आहेत. तसेच कंपन्यांचे रासायनिक पाणी नदीत मिसळत असल्यास त्यांना देखील प्राप्त तक्रारीनुसार नोटीस देतो. कंपन्यांमध्ये सांडपाणी पाण्यावर प्रक्रिया करणारा प्लान्ट नसेल तर नोटीस देऊन तसे प्लान्ट उभारण्याबाबत सूचना देत आहे. तसेच कंपन्यांबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास कारवाई करू.
- मंचक जाधव, उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ.

‘‘पवना, इंद्रायणी आणि मुळा नदीत मिसळणारे प्रदूषित नाल्याचे पाणी एसटी प्लॅन्टकडे वळविण्याची कार्यवाही महापालिकेने केली आहे. पवना नदीचे काम पूर्ण झाले आहे. इंद्रायणीचे काम ९० टक्के झाले आहे. केवळ आळंदी येथे हे काम करणे बाकी आहे.
- संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता, पर्यावरण अभियांत्रिकी विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.