जे केवळ भारतातच नाही तर संपूर्ण आशिया खंडात नाही, ते नागपुरात उभारण्याचं सौभाग्य आम्हाला मिळाले : नितीन गडकरी
रजत वशिष्ठ, एबीपी माझा October 05, 2024 06:43 PM

Nagpur News नागपूर : जे भारतात नाही, संपूर्ण आशिया खंडात नाही, ते नागपुरात उभारण्याचं सौभाग्य आम्हाला मिळालंय, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी बोलताना व्यक्त केलंय. राज्याच्या उपराजधानी नागपुरात आज दोन महत्वाच्या उड्डाणपूलांचे लोकार्पण होत आहे. शहरातील वेगवेगळ्या भागातील या दोन उड्डाणपूलामुळे नागपूरकरांना वाहतूक कोंडीच्या संदर्भात मोठा दिलासा मिळणार आहे. यातील एक म्हणजे एलआयसी चौक ते ऑटोमोटिव्ह चौक दरम्यान 5.67 किमी लांबीच्या डबल डेकर उड्डाणपूलाचे लोकार्पण आज केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे हस्ते होत आहे. यावेळी बोलताना नितीन गडकरी यांनी हे वक्तव्य केले आहे.

देशात पहिल्यांदा 4 स्तरीय वाहतूक व्यवस्था वाहनचालकांसाठी खुली 

विशेष म्हणजे या ठिकाणी रस्त्यावर रेल्वे, त्यावर उड्डाणपूल आणि त्यावर मेट्रो रेल अशी देशात पहिल्यांदा 4 स्तरीय वाहतूक व्यवस्था वाहनचालकांसाठी खुली होणार आहे. या चार स्तरांमध्ये पहिल्या स्तरावर म्हणजेच सर्वात खाली राष्ट्रीय महामार्ग आहे. दुसऱ्या स्तरावर भारतीय रेल्वेचा ट्रॅक आहे. तिसऱ्या स्तरावर उड्डाणपूल बांधण्यात आलं असून चौथ्या स्तरावर मेट्रो रेल धावणार आहे. हे कार्य करत असताना अनेक अडचणी आल्या. ज्या भागात हे उड्डाणपूल उभारले आहे, तो भाग वर्दळीचा असून जागा कमी होती. मात्र, जिल्हाधिकारी आणि प्रशासनाने उत्तम काम केले. जागा अधिग्रहण करून दिली. महामेट्रो आणि NHAI ने उत्तम काम केले, असेही नितीन गडकरी म्हणाले.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला जबाबदारी दिली आहे की मेट्रो किंवा उड्डाणपुलाच्या दोन पिलर मधील अंतर कसे वाढवता येईल, याचे डिझाईन तयार करा. तसे झाल्यास मेट्रो उभारणीसाठीच्या खर्चात खूप कमतरता होईल. हे उड्डाणपूल राष्ट्रीय महामार्गावर आहे. त्यामुळे NHAI आणि मेट्रो दोघांनी मिळून अर्धा अर्धा खर्च केला आहे. त्यामुळे नागपूरचा चेहरामोहरा आता हळू हळू बदलत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी खास धन्यवाद देतो, त्यांच्यामुळे जमीन अधिग्रहण लवकर होऊ शकले. त्यांनी निधी त्वरित दिला, असेही  नितीन गडकरी म्हणाले. 

हे ही वाचा :

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.