कडाचीवाडीत सेंद्रिय खतावर फुलविली फळबाग
esakal October 06, 2024 03:45 AM

चाकण, ता. ३: कडाचीवाडी (ता. खेड) येथील शेतकरी बाळासाहेब कड यांनी त्यांच्या शेतात आंबे, सीताफळ, जांभूळ, पेरू, नारळ, कागदी लिंबू अशी सुमारे अडीच हजार झाडे सात एकर जमिनीत लावलेली आहेत. ही फळबाग पूर्णपणे सेंद्रिय शेणखतावर आहे. त्यामुळे फळांना विशिष्ट चव आणि चांगली प्रत असते. सध्या फळबागेपासून दरवर्षी सुमारे दहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळते आहे. सुमारे सहाशे सीताफळाच्या झाडांच्या बागेपासून या हंगामात तीन लाख रुपयाचे उत्पन्न त्यांना मिळाला आहे.

हंगामी पिके, बागायती पिकापेक्षा फळझाडे परवडतात. याला मजुरीही कमी लागते व भविष्यासाठी ही झाडे चांगले उत्पन्न देतात. यामुळे कड यांनी चार वर्षांपूर्वी आंबा, सीताफळ, जांभूळ, पेरू, नारळ, लिंबू आदींची सुमारे अडीच हजार रोपांची लागवड केली होती. चार वर्षातच फळबागेतून उत्पन्न सुरू झाले. दरवर्षी साधारणपणे दहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.खर्च वजा जाता पाच लाख रुपये नफा मिळता. पण पुढील काळात दहा वर्षांनी हेच उत्पन्न पन्नास लाखावर जाणार आहे.


बागेतील फळांची मुंबई, पुणे येथे विक्री
सात एकर जमिनीमध्ये ही फळबाग असून शेतकरी बाळासाहेब, पत्नी विद्या, मुलगा साई, मुलगी हर्षदा हे सर्व कुटुंबं शेतीमध्ये राबत आहे. भविष्यात शेतीलाच महत्त्व येणार आहे आणि सेंद्रिय खताच्या फळबागेला महत्त्व राहणार आहे. शेतकरी बाळासाहेब कड यांच्या फळबागेबद्दल अनेकांनी त्या फळबागेची पाहणी करून कौतुक केले आहे. फळबागेतील आंबा, सीताफळ, पेरू ही फळे अगदी मुंबई, पुणे, पिंपरी- चिंचवड येथे विक्रीसाठी जात आहेत.


सेंद्रिय फळे खाण्यासाठी व विकत घेण्यासाठी घरी ग्राहक खरेदीदार येत आहेत. मुलाला कंपनीतील नोकरीत न अडकवता त्याला शेतीत राबण्यास अडकवले आहे. प्रत्येक हंगामामध्ये सगळ्या प्रकारची फळ असल्यामुळे वर्षभर शेतामध्ये फळे असतात. फळबागा शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा मोठा स्रोत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रिय फळबागेकडे वळावे.
-बाळासाहेब कड, शेतकरी


07518

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.