Anand Dighe : 'धर्मवीर' वादातली न दिसलेली बाजू
esakal October 06, 2024 07:45 AM

धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर बेतलेल्या धर्मवीर भाग एक व भाग दोन हे चित्रपट व त्यांचा मृत्यू कसा झाला, याविषयीच्या वादानं महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालंय. पण या वादात आनंद दिघेंच्या मृत्युपश्चात वैद्यकीय क्षेत्राशी निगडित एका घटनेचा व त्याच्या दूरगामी परिणामांचा मात्र सर्वांना विसर पडला.

आनंद दिघेंच्या मृत्यूच्या वेळी नेमकं काय झालं या विषयी अनेक बाबी विस्तारानं सांगितल्या जात आहेत. पण त्या वेळी घडलेली एक महत्त्वाची घटना कायम दुर्लक्षित राहिली. दिघे अत्यवस्थ असल्याचं कळल्यावर हजारो लोक ठाण्याच्या सिंघानिया हॉस्पिटल बाहेर जमले. त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं, तेव्हा हजारोंचा समूह सिंघानिया हॉस्पिटलमध्ये घुसला व काही मिनिटांत रुग्णालय उद्ध्वस्त केलं गेलं.

याच दरम्यान एच. एन. हॉस्पिटलचे प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. वसंत जयकर यांची रुग्णाचा मृत्यू झाल्याने त्यांच्या नातेवाइकांनी गोळ्या घालून हत्या केली. त्यानंतर पुढं रुग्णालयांवर हल्ले, डॉक्टरांवर हल्ले याची एक मोठी मालिकाच राज्यात सुरू झाली जी आजवर थांबली नाही.

२००५ मध्ये प्रमोद महाजन यांचा प्रवीण महाजन यांच्याकडून खून झाला, भावाने त्यांच्यावर गोळ्या झाडल्यावर व ते हिंदुजा रुग्णालयात अनेक दिवस अत्यवस्थ स्थितीत दाखल होते. तेव्हा त्यांच्या उपचाराचं चाळीस लाखांचं बिल थकलं.

या सगळ्या घटनांवरून राजकीय व इतर अति महत्त्वाच्या व्यक्तींचे उपचार म्हणजे सक्तीनं मोफत उपचार व मृत्यू झाल्यास डॉक्टर, रुग्णालयावर हल्ला अशी सुप्त भीती व भावना वैद्यकीय क्षेत्रात निर्माण झाली. या घटनेनंतर मोठे राजकीय नेते, सेलिब्रिटी व महत्त्वाच्या व्यक्ती अत्यवस्थ स्थितीत जेव्हा रुग्णालयात जाऊ लागल्या, तेव्हा हल्ल्यांच्या भीतीने डॉक्टर मोठी रुग्णालये अशा रुग्णांना इतरत्र रेफर करू लागले.

कुठलाही रुग्ण नाकारणे हे वैद्यकीय नीतिमूल्यांना अनुसरून नसले, तरी राजा वाचला नाही तर वैद्याचे हात कापा हा राजनियम होऊ पाहतोय, या भीतीने आधी स्वतःचे प्राण वाचवा मग दुसऱ्याचे असं डॉक्टरांना वाटणं साहजिक आहे.

‘राव करी ते गाव करी’ या उक्तीला साजेसं पुढं घडत गेलं. रुग्णालयांवर , डॉक्टरांवर हल्ला हा चुकीचा ट्रेंड शहरातून छोट्या गावांपर्यंत पोहोचला. हल्ल्यासाठी नेताच नव्हे तर जवळचा नातेवाईक, शेजारी पुरेसा ठरू लागला. मोठ्या व्यक्तीचा असो की सर्व सामान्य माणसाचा - मृत्यू हा दु:खदायकच असतो. कुठलाही डॉक्टर हा जिवाची बाजी लावूनच उपचार करत असतो.

पण राजकारणाच्या बरोबरीने सर्वांत अनिश्चित क्षेत्र म्हणजे वैद्यकीय क्षेत्र. कितीही प्रयत्न केले तरी डॉक्टरला हा रुग्ण मृत्युमुखी कसा पडला किंवा हा रुग्ण बिकट स्थितीत चमत्कार व्हावा तसा वाचला कसा हे प्रश्न वारंवार पडत असतात. अशा वेळी मृत्यूनंतरची स्थिती हाताळण्यात कधी डॉक्टर चुकतही असतील. पण या चुका सांगण्याचा संवादाचा सनदशीर मार्ग हिंसेपेक्षा नक्कीच प्रभावी आहे.

डॉक्टर हे उच्च शिक्षित असल्यानं हिंसेच्या बाबतीत सॉफ्ट टार्गेट ठरतात. व्यस्ततेमुळे हल्ला झाल्यावर यावर कायदेशीर किंवा इतर मार्गाने याला प्रतिक्रिया देण्यास त्यांना वेळ नसतो, हेही सर्वसामान्य जाणून असतात. आजच्या व्यवस्थेत गंभीर गुन्ह्यांनाही लवकर शिक्षा होत नाही, तिथं डॉक्टरांवरील हल्ल्यांना न्याय मिळण्याची अपेक्षा व्यर्थ आहे, हे डॉक्टरही जाणून असतात. पण यामुळे डॉक्टर व वैद्यकीय क्षेत्र बचावात्मक पवित्र्यात जाऊन त्यांच्या पुरते काही निर्णय घेतात.

डॉक्टरांसारखा बौद्धिक पातळीवर काम करणारा वर्ग जाहीररीत्या कदाचित व्यक्त होणार नाही पण कृतीतून त्याचं मत दाखवून देतो. अशा प्रकारे हल्ल्यांच्या भीतीमुळं असुरक्षिततेपोटी रुग्ण नाकारला जाऊन त्याचा मृत्यू होणे राजकीय नेते, महत्त्वाच्या व्यक्तीच काय सर्वसामान्यांनाही परवडणारे नाही. डॉक्टर व रुग्णालयांमध्ये योग्य उपचार घ्यायचे असल्यास आपल्या प्रतिष्ठेचे जोडे रुग्णालयाबाहेर काढून केवळ एक रुग्ण म्हणून गेल्यास नक्की उत्तम उपचार मिळतील.

आनंद दिघे हयात असताना ठाण्यात महानगरपालिकेचे कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालय कार्यरत होते. पण तेव्हाही आनंद दिघे हे सिंघानिया या खासगी रुग्णालयात दाखल झाले व इतकी वर्षे लोटून १३ ऑगस्ट २०२३ ला याच छत्रपती शिवाजी रुग्णालयात एका दिवसांत १८ मृत्यू झाल्याने ते राज्यभर गाजले.

बड्या नेत्यांचे उपचार लीलावती, ब्रीच कँडी अशा सर्व मोठ्या खासगी रुग्णालयात होतात. अर्थात त्यांचे आरोग्य हे राज्यासाठी महत्त्वाचे असल्यानं त्यांना उत्तम उपचार मिळायलाच हवे. पण सर्वसामान्यांचे आरोग्य तितकेच महत्त्वाचे मानून एकही सार्वजनिक रुग्णालय इतकं सक्षम होऊ शकलं नाही, की अति महत्त्वाच्या व्यक्तींना तिथं उपचार घेण्यास यावं असं वाटावं, ही विसंगती या निमित्तानं पुढं येतं.

सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अपुरी असल्याने खासगी रुग्णालयांवर ताण येतो. त्यातून डॉक्टरांना उपचार करणे व नातेवाइकांशी संवाद साधणे हा वेळेचा समतोल साधणे डॉक्टरांना अवघड जाते. त्यातून विसंवाद निर्माण होऊन हल्ल्यात रूपांतर होते.

इंदिरा गांधींच्या हत्येनंतर शिखांवर हल्ले झाले तेव्हा राजीव गांधी म्हणाले होते, ‘‘ जब कोई बडा पेड गिरता हैं तो जमीन तो हिलती हैं.’’ आनंद दिघे किंवा कुठल्याही महत्त्वाच्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा भावनिक पडसाद उमटणं साहजिक आहे. पण या भावनेचं टोकाच्या हिंसेत रूपांतर होण्यानं त्याचे दुरगामी परिणाम होऊन त्यातून एक ट्रेंड निर्माण होऊ नये ही काळजी घेणे गरजेचे आहे. आजार व शारीरिक, मानसिक अस्वास्थ्याचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यात वैद्यकीय क्षेत्रात हल्ल्यांमुळे सामाजिक अस्वास्थ्य परवडणारे नाही.

(लेखक हे वैद्यकीय व्यावसायिक असून सामाजिक घडामोडींचे विश्लेषक आहेत तसेच विविध अनुभवांवरची त्यांची काही पुस्तकंही प्रसिद्ध झाली आहेत. )

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.