Amitabh Bacchan : अमिताभच्या काव्यगायनाचं गारुड
esakal October 06, 2024 07:45 AM

हिंदी चित्रपटसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाचं अनोख्या पद्धतीनं ‘सेलिब्रेशन’ करण्यासाठी सकाळ माध्यम समूहातर्फे ११ ऑक्टोबरला ‘शहेनशाह - पडद्यावरच्या ‘अँग्री यंग मॅन’ला सांगीतिक सलाम’ या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय.

प्रख्यात हिंदी व मराठी कलाकार हा आगळावेगळा कार्यक्रम सादर करणार आहेत. अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांतील गाजलेली गाणी, त्यांचे काही किस्से व आठवणी, त्यांच्या गाजलेल्या संवादांचं अभिवाचन असं या कार्यक्रमाचं स्वरूप असेल. यानिमित्तानं अमिताभ बच्चन यांच्या पडद्यावरील काव्यगायनाचा वेध...

के. ए.अब्बास यांच्या ‘सात हिंदुस्थानी’ या चित्रपटापासून १९६९ मध्ये कारकीर्दीची सुरुवात करणाऱ्या अमिताभनं कॅमेऱ्यासमोरील अभिनयासोबतच या माध्यमाशी जुळलेल्या सगळ्याच कलांबाबत कमाल करून ठेवली आहे. १९७९ ह्या वर्षी ‘मि. नटवरलाल’ या सिनेमातील ‘मेरे पास आओ मेरे दोस्तों, इक किस्सा सुनो’ ह्या बालगीतासोबत त्याचा पार्श्वगायनाचा प्रवास सुरू झाला आणि नंतर त्यानं सुमारे पस्तीस गाणी विविध सिनेमांकरिता गायली.

अमिताभच्या स्वरातील माधुर्याविषयी नक्कीच प्रश्न विचारले जाऊ शकतील, पण त्यानं गायलेल्या गाण्यांच्या लोकप्रियतेविषयी शंका घेता येणार नाही. यश चोप्रांच्या १९८१ मध्ये प्रदर्शित रोमँटिक सिनेमा ‘सिलसिला’ मध्ये हरिवंशराय बच्चन लिखित ‘रंग बरसे भीगे चुनर वाली’ असो की प्रकाश मेहरांच्या त्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘लावारिस’ चित्रपटातील ‘मेरे अंगने में तुम्हारा क्या काम हैं’ हे लोकगीत असो, सगळ्या गाण्यांनी अफाट लोकप्रियता प्राप्त केली होती. १९८३ मधल्या ‘महान’ चित्रपटातील ‘जिधर देखू तेरी तस्वीर’ असो की अगदी अलीकडच्या २०१५ या वर्षीच्या ‘शमिताभ’ चित्रपटातील ‘पिडलीसी बाते क्यो करते हो पिडलीसी’ हे लयबद्ध गीत असो, रसिकांनी अमिताभची गाणी डोक्यावर घेतली.

अमिताभची ॲक्शन दृश्य, प्रेमप्रसंग, विनोद, नृत्य अशा पडद्यावरील सगळ्याच कौशल्यांबाबत वादच नव्हता पण १९७१ मध्ये अमिताभनं ‘आनंद’ चित्रपटात गुलजार साहेबांची एक कविता त्याच्या खर्जातल्या आवाजात म्हटली आणि तिथूनच त्याच्या आवाजात कविता ऐकण्याचा छंदही भारतीयांना जडला. ‘आनंद’ चित्रपटात ही कविता दोन वेळा येते.

या सिनेमात कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट भूमिका साकारणारा राजेश खन्ना आणि त्याचा डॉक्टर-मित्र बनलेला ‘बाबू मोशाय’ म्हणजेच अमिताभ हे दोघे आपापल्या आवाजात एक, एक कविता त्या काळी नवीनच आलेल्या टेपरेकॉर्डरवर सहजच टेप करतात आणि सिनेमाच्या शेवटच्या दृश्यात जेव्हा आजारी नायकाचे प्राण शरीर त्यागून जातात, त्या वेळी ह्या टेप केलेल्या कवितांनी प्रेक्षकांना कासावीस करून सोडणारा क्लायमॅक्स साधला होता.

राजेश खन्नाच्या आवाजातील ‘जिंदगी और मौत उपरवालेके हाथ है जहाँपनाह’ ही कविता त्या ध्वनिमुद्रणामध्ये नंतर येते, त्यापूर्वी येते गुलजारची ‘मौत तु एक कविता हैं’ ही अमिताभने सादर केलेली अत्यंत गंभीर कविता जी अद्यापही हृदयात घर करून बसली आहे.

मौत तु एक कविता हैं

मुझसे एक कविता का वादा है, मिलेगी मुझको

डूबती नब्ज़ों में जब दर्द को निंद आने लगे

ज़र्द सा चेहरा लिये जब चांद उफक तक पहुंचे

दिन अभी पानी मे हो, रात किनारे के करीब

ना अंधेरा ना उजाला हो, ना अभी रात ना दिन

जिस्म जब खत्म हो और रूह को जब साँस आये

मुझसे एक काविता का वादा हैं मिलेगी मुझको

एका हळुवार मरणाची कल्पना या कवितेत गुलजारांनी केली होती, आणि धीरगंभीर आवाज तसेच संवेदनशील अभिनयाच्या बळावर अमिताभनं केलेलं सादरीकरण जीवाला वेड लावून गेलं होतं.

‘आनंद’ मधील धीरगंभीर आणि मरणाच्या क्षणाची जाणीव करून देणाऱ्या कवितेनंतर अमिताभ नावाची त्सुनामी हिंदी सिनेमाच्या किनाऱ्यावर धडकली. ‘जंजीर’, ‘मजबूर’, ‘दीवार’ आणि ‘शोले’ सारख्या चित्रपटात सलीम-जावेदच्या अँग्री यंग मॅनने सिनेरसिकांवर गारुड केलेलं असताना ‘दीवार’वाल्या यश चोप्रांनी १९७६ ह्या वर्षी ‘मैं पल दो पल का शायर हूँ’ अशी ओळख देत ‘कभी कभी’ सिनेमात अमिताभला ॲक्शन हीरोच्या ऐवजी एका हळुवार मनाच्या कवीची भूमिका दिली.

तारुण्यातील प्रेमभंगाचं दु:ख हृदयात साठवून आयुष्य कंठलेल्या एका गंभीर कवीच्या भूमिकेलासुद्धा ॲक्शनच्या त्या वावटळीत रसिकांनी दाद दिली. ह्याच सिनेमात त्याच्या कविता गायनाची महती पटवून देणारी साहिरची आत्यंतिक प्रेमभावनेने ओतप्रोत अशी कविता अमिताभनं म्हटली होती, जिची नशा पन्नास वर्षांपासून अजूनही ताजीच आहे.

कभी कभी मेरे दिल मे खयाल आता है

कि ज़िंदगी तेरी जुल्फों कि नर्म छांव मैं गुजरने पाती

तो शादाब हो भी सकती थी।

यह रंज-ओ-ग़म कि सियाही जो दिल पे छाई हैं

तेरी नज़र कि शुआओं मैं खो भी सकती थी।

मगर यह हो न सका और अब ये आलम हैं

कि तू नहीं, तेरा ग़म तेरी जुस्तजू भी नहीं।

गुज़र रही हैं कुछ इस तरह ज़िंदगी जैसे,

इससे किसी के सहारे कि आरझु भी नहीं.

न कोई राह, न मंजील, न रौशनी का सुराग

भटक रहीं है अंधेरों मैं ज़िंदगी मेरी.

इन्ही अंधेरों मैं रह जाऊँगा कभी खो कर

मैं जानता हूँ मेरी हम-नफस, मगर यूंही

कभी कभी मेरे दिल में खयाल आता है

अमिताभ वेळोवेळी विविध मंचांवरून आणि ‘कौन बनेगा करोडपती’ ह्या त्याच्या सुप्रसिद्ध टी.व्ही.शो मधून उपस्थितांच्या आग्रहास्तव वरील कविता सादर करत असतो, आणि प्रत्येक वेळी साहिरनं व्यक्त केलेला प्रियकराचा दर्द वेगळीच उंची गाठत असतो.

गुलजार आणि साहिर लुधियानवी ह्या महान कवी/शायरांच्या कवितांना सिनेमा सारख्या जनसामान्याच्या माध्यमात प्रतिष्ठा प्राप्त करून दिल्यानंतर आता पाळी होती त्यांच्याच दर्जाच्या जावेद अख्तरांची. कारकीर्दीच्या पूर्वार्धात सिनेमाच्या कथा-पटकथा-संवाद लिहिण्याच्या कामात हिमालयाची उंची गाठलेल्या अख्तर यांनी ‘जंजीर’, ‘मजबूर’, ‘दीवार’, ‘शोले’, ‘डॉन’, ‘त्रिशूल’, ‘काला पत्थर’, ‘शान’ आणि ‘शक्ती’ अशा सुवर्ण महोत्सवी चित्रपटातून अमिताभ सलीम-जावेद ह्यांचा समाज व्यवस्थेविरुद्ध आक्रोश व्यक्त करणारा नायक पडद्यावर आणला होता.

यश चोप्रांनी अमिताभ, जया भादुरी आणि रेखा ह्यांच्या भावजीवनात आलेल्या तथाकथित वादळावर त्यांच्याच वाट्याला खऱ्या जीवनातील भूमिका देऊन ‘सिलसिला’ हा चित्रपट १९८१ मध्ये आणला होता. तोपर्यंत सलीम-जावेद ह्या संवाद लेखकांची जोडी विलग झाली आणि स्वतंत्रपणे काम करू लागली होती. त्या वेळी ह्या चित्रपटातील गाणी लिहायचं काम केलं जावेद अख्तर ह्यांनी.

‘सिलसिला’ सिनेमात अमिताभ-रेखा जोडीचा आक्रमक प्रणय पाहून प्रेक्षक स्तंभित झाले होते. सिनेमातील एका उत्कट क्षणी लता मंगेशकरांच्या धारदार आवाजात गाणं येत ‘ये कहाँ आ गये हम, युही साथ साथ चलते...’ लतादीदींच्या सर्वोत्कृष्ट गाण्यांपैकी एक असलेल्या ह्या गाण्यातील कुठल्या भागावर पान १ वरून

प्रेक्षकांनी फिदा व्हावे ? तर प्रेक्षक फिदा झाले होते गाण्याच्या सुरुवातीला, मध्यात आणि शेवटच्या कडव्यानंतर, अशा तीन भागांत अमिताभच्या खर्जातल्या आवाजात जावेद अख्तरांची कविता डोकावते तिच्यावर. सामाजिक बंधनांविरुद्ध प्रेमातील बंडखोरीचं प्रतीक ठरलेल्या ‘ये कहाँ आ गये हम’ ह्या गाण्यातील अमिताभच्या आवाजात डोकावणाऱ्या कवितेनं माहौल तंग करून टाकला होता. त्यातील सुरुवातीला प्रियकर प्रेयसीला आजच्या भाषेत ‘मिस’ करत असताना काय म्हणतो ते येतं.

मैं और मेरी तन्हाई

अक्सर ये बाते करते है

तुम होती तो कैसा होता

तुम ये कहती तुम वो कहती

तुम इस बात पे हैरान होती

तुम उस बात पे कितनी हंसती

तुम होती तो ऐसा होता

तुम होती तो वैसा होता

मैं और मेरी तन्हाई

अक्सर ये बाते करते है

दुसऱ्या कडव्यात प्रेयसी जवळ नसतानाचं एकटेपण पुढच्या स्तराला जातं आणि भोवतालचा पूर्ण निसर्ग जसे रात्र, चांदणं, चंद्र, तारे, हवा, झाडांच्या पानांचा आवाज सगळं सगळं प्रेयसीच्या अस्तित्वानं भारून गेल्याचं प्रियकराला वाटतं.

ये रात है या तुम्हारी

जुल्फें खुली हुई है

है चाँदनी तुम्हारी नज़रों से

मेरी रातें धूली हुई है

ये चाँद है या तुम्हारा कंगन

सितारें हैं या तुम्हारा आँचल

हवा का झोंका है

या तुम्हारे बदन की खुशबू

ये पत्तियों की है सरसराहट

के तुमने चुपके से कुछ कहा है

ये सोचता हूँ मैं कब से गुमसुम

की जबकि मुझको भी ये खबर हैं

की तुम नहीं हो कहीं नहीं हो

मगर ये दिल है की कह रहा है

तुम यहीं हो यहीं कहीं हो

...आणि शेवटी विरह यातना सहन न झाल्यामुळे बंडखोरीच्या निर्णयावर आलेला प्रियकर ‘क्यो दिल मे सुलगते रहे लोगों को बता दे...’ ह्या शब्दात आपले भाव व्यक्त करतो...

मजबूर ये हालात इधर भी है उधर भी

तन्हाई कि ये रात इधर भी है उधर भी

कहने को बहुत कुछ है मगर किससे कहें हम

कब तक यूँ ही खामोश रहे और सहे हम

दिल कहता है दुनिया की हर इक रस्म उठा दें

दीवार जो हम दोनों में है आज गिरा दें

क्यों दिल में सुलगते रहे

लोगों को बता दें

हाँ हमको मुहब्बत है

मोहब्बत है मोहब्बत है

अब दिल में यही बात इधर भी है उधर भी

बहुसंख्य जनसामान्यांच्या ‘मजबूर ये हालात इधर भी है उधर भी’ अशा अवस्थेला अमिताभच्या आवाजातून वाट मिळाली, आणि ही कविता हृदयात कोरली गेली.

हिंदीतील मोठे कवी, अमिताभ बच्चन याचे वडील डॉ. हरिवंशराय बच्चन ह्यांच्या अनेक कविता किंवा त्यांच्या ‘मधुशाला’ ह्या दीर्घ काव्याचं गायन अमिताभ विविध मंचांवरून करतच असतो. पण १९९० मध्ये ‘अग्निपथ’ चित्रपटात वापरलेली आणि अमिताभच्या जोरदार ढंगात गायली गेलेली ‘अग्निपथ’ ह्या त्यांच्या कवितेला सार्वकालीक प्रसिद्धी मिळाली. आदर्शवादी शिक्षक असलेल्या वडिलांवर आणि कुटुंबीयांवर झालेले अत्याचार लहानपणीच पाहिल्यानं निर्माण झालेला मनातील आक्रोश एक नामचीन डॉन होऊन समाजाविरुद्ध परिवर्तित करणारं ‘विजय दीनानाथ चौहान’चं चरित्र ठाऊक नसलेला सिनेप्रेमी विरळाच.

वृक्ष हों भले खड़े,

हों घने, हों बड़े,

एक पत्र छाँह भी

मांग मत! मांग मत! मांग मत!

अग्निपथ! अग्निपथ! अग्निपथ!

तू न थकेगा कभी,

तू न थमेगा कभी,

तू न मुड़ेगा कभी,

कर शपथ! कर शपथ! कर शपथ!

अग्निपथ! अग्निपथ! अग्निपथ!

यह महान दृश्य है,

चल रहा मनुष्य है,

अश्रु, स्वेद, रक्त से

लथ-पथ, लथ-पथ, लथ-पथ,

अग्निपथ! अग्निपथ! अग्निपथ!

चित्रपटाच्या शेवटी भयंकर क्रूर अशा खलनायकाविरुद्ध सूड उगवत असताना आणि आयुष्यभर झेललेल्या यातनांवरचा अंतिम इलाज करत असताना स्वत: नायक सुद्धा गंभीर जखमी होतो, रक्तबंबाळ अवस्थेतील नायक शेवटच्या घटका मोजत असतो आणि अमिताभच्या आवाजात वरील कविता पार्श्वभूमीला घुमते आणि अमिताभचं ‘अश्रू, स्वेद, रक्तसे, लथ-पथ’ अस रूप बघत असताना प्रेक्षकांच्या अंगावर सरसरून काटा उभा राहतो. अमिताभच्या आवाजात गायल्या गेल्यानंतर ही कविता सर्वसामान्य जनतेच्या तोंडातोंडी झाली होती.

अशा प्रकारे सातत्यानं सिनेमातून आणि इतर मंचावरून देखील अमिताभचं हळुवार कविता वाचन सुरूच होतं. पण २०१८ मध्ये आलेल्या ‘पिंक’ ह्या स्त्री सशक्तीकरणाचा विषय असलेल्या सिनेमात अमिताभनं पीडित तरुणींची बाजू एका वृद्ध वकिलाच्या भूमिकेतून सक्षमपणे उचलून धरली होती. ‘तू खुद की खोज मे निकल’ ह्या तन्वीर गाजी ह्यांच्या कवितेमधून अमिताभनं स्त्री सुरक्षेची भूमिका अत्यंत जोरकसपणे मांडली होती.

तू खुद की खोज में निकल

तू किस लिए हताश है,

तू चल तेरे वजूद की

समय को भी तलाश है

जो तुझ से लिपटी बेड़ियाँ

समझ न इनको वस्त्र तू

ये बेड़ियां पिघाल के

बना ले इनको शस्त्र तू

बना ले इनको शस्त्र तू

तू खुद की खोज में निकल

तू किस लिए हताश है,

तू चल तेरे वजूद की

समय को भी तलाश है

समय को भी तलाश है

चरित्र जब पवित्र है

तो क्यों हैं ये दशा तेरी

ये पापियों को हक़ नहीं

कि ले परीक्षा तेरी

कि ले परीक्षा तेरी

तू खुद की खोज में निकल

तू किस लिए हताश है

तू चल, तेरे वजूद की

समय को भी तलाश है

जला के भस्म कर उसे

जो क्रूरता का जाल है

तू आरती की लौ नहीं

तू क्रोध की मशाल है

तू क्रोध की मशाल है

तू खुद की खोज में निकल

तू किस लिए हताश है

तू चल तेरे वजूद की

समय को भी तलाश है

समय को भी तलाश है

चूनर उड़ा के ध्वज बना

गगन भी कंपकंपाएगा

अगर तेरी चूनर गिरी

तो एक भूकंप आएगा

तो एक भूकंप आएगा

तू खुद की खोज में निकल

तू किस लिए हताश है,

तू चल तेरे वजूद की

समय को भी तलाश है

समय को भी तलाश है

२०१६ मध्ये प्रदर्शित झालेला अनिरुद्ध रॉय चौधरी दिग्दर्शित ‘पिंक’ सिनेमा खास होता. सिनेमा किंवा इतर कुठल्याही माध्यमातून प्रकट झालेलं महिला सक्षमीकरणावरच हे सर्वाधिक सशक्त भाष्य होतं. हा संदेश देणारा व्यक्ती एक गंभीर, परिपक्व आणि ज्येष्ठ अवतारातील निवृत्त वकील दीपक सैगल (अमिताभ बच्चन) होता. जितक्या विश्वासाने आणि समर्थपणे आक्रमक पुरुषी मानसिकतेची लक्तर ह्या सिनेमात काढली गेली त्याची तुलना होत नाही. वरील कवितेत सिनेमाचा अर्क उतरला होता.

वर घेतलेली उदाहरण प्रातिनिधिक आहेत. अमिताभच्या आवाजातील विविध चित्रपटांतील शेरोशायरी हा अजून एक वेगळा विषय आहे. पण वरील उदाहरणाकडे पाहिलं तरी लक्षात येत की ‘आनंद’ मधील कवितेचा विषय मरणासारखा गंभीर होता, ‘कभी कभी’ मधल्या कवितेत अत्युच्च स्तराचा प्रेमभाव आहे, ‘सिलसिला’ मधील कवितेत प्रेमासाठी विद्रोहाची तयारी आहे, ‘अग्निपथ’ ही कविता त्या सिनेमातील रक्तलांछित हिंसेचा मुद्दा घेऊन येते आणि ‘पिंक’ सिनेमातील कविता महिला सशक्तीकरणावर सशक्त भाष्य करते. प्रत्येक कवितेचा विषय वेगळा, कवी वेगळे, सिनेमाचे विषय वेगळे पण ज्या आवाजात त्या म्हटल्या गेल्या तो आवाज एकच. अमिताभचा. ११ ऑक्टोबरला हा आवाज ८३ व्या वर्षात प्रवेश करतो आहे. ह्या आवाजाचं तारुण्य कायम राहो हीच शुभेच्छा.

(लेखक चित्रपट अभ्यासक व ललित लेखक आहेत, तसेच अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांवरचे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे.)

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.