माध्यमविवेकाची ढाल
esakal October 06, 2024 09:45 AM

- मुक्ता चैतन्य, muktaachaitanya@gmail.com

तंत्रज्ञान झपाट्यानं बदलत आहे. त्याच्या वेगाशी आणि रोज नव्यानं येणाऱ्या फीचर्सशी जुळवून घेणं आपल्यासाठी कठीणच आहे; पण तरीही पालक आणि शिक्षक म्हणून किंवा लहान मुलांच्या सान्निध्यात असलेले मोठे म्हणून काही गोष्टी आपल्याला माहीत असणं अतिशय आवश्यक आहे. सध्याचा काळ हा व्हर्चुअल रिॲलिटीचा आणि ऑग्मेंटेड रिॲलिटीचा आहे.

‘रेबॅन’ या चष्मे तयार करणाऱ्या जगप्रसिद्ध कंपनीच्या सहकार्यानं ‘मेटा’नं ऑग्मेंटेड रिॲलिटीचं तंत्रज्ञान वापरून चष्मा बनवला आहे. तुमच्या व्हॉइस कमांड्स, हातवारे करत केलेल्या सूचना या सगळ्याचं पालन हा चष्मा करतो. तो लाइव्ह भाषांतर करू शकतो. होलोग्रामचं तंत्रज्ञान त्यात वापरलं गेलेलं आहे. आपण तंत्रज्ञान कशा पद्धतीनं वापरतो याचं वर्तमान आणि भविष्य हा चष्मा बदलणार आहे.

तीच गोष्ट चीननं आणलेल्या सुपरफास्ट इंटरनेटची. या इंटरनेटच्या साह्यानं १.२ टेराबाईट डेटा एका सेकंदात ट्रान्स्फर करता येतो. इलेक्ट्रॉनिक टॅटू तंत्रज्ञान, इलॉन मस्कचं न्यूरॉलिंक तंत्रज्ञान आणि अजून बरंच काही...हे सगळं आपल्या आधुनिक जगण्यातलं तंत्रज्ञान आहे आणि या तंत्रज्ञानासमवेतच आपली मुलं वाढणार आहेत, जगणार आहेत.

अत्याधुनिक आणि प्रचंड वेगवान असं वेगवेगळ्या प्रकारचं हे तंत्रज्ञान आपल्याला हवं आहे का, हा प्रश्न आपल्याला कुणीही विचारणार नाहीये, विचारलेला नाहीये. आपण फक्त यूजर्स आहोत. त्यामुळं हे तंत्रज्ञान आपण वापरणारच आहोत. मात्र, ते माध्यमविवेक बाळगून वापरलं नाही तर आपल्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात.

आपली जबाबदारी कोणती?

माध्यमांच्या आणि तंत्रज्ञानाच्या या झंझावातात बदलणाऱ्या तंत्रज्ञानाचे दुष्परिणाम आपल्या मुलांना भोगण्याची वेळ येऊ द्यायची नसेल तर त्यांना या बदलासाठी तयार करावं लागेल.

म्हणजे काय करायचं आहे, तर त्यांना तंत्रज्ञान आपण शिकवण्याची, त्याचं एक्स्पोजर देण्याची गरज नाहीये, ते त्यांना मिळणारच आहे. हे सगळं तंत्रज्ञान वापरायचं तर ते कशासाठी, कुठं, कधी आणि कसं वापरायचं याचा विवेक आणि भान आपण त्यांना देणं आवश्यक आहे. मग मुद्दा येतो, आपण हे करणार कसं?

मला आजही आठवतंय...माझ्या एका शिबिरात एक आई म्हणाली होती : ‘आम्ही मुलांना योग्य संस्कार शिकवतो आहोत.’

मात्र, संस्कार ही शिकवण्याची गोष्ट नाही. ते आपोआप, मुलांच्याही नकळत होत असतात. आई-बाबा, आजी-आजोबा किंवा मुलांच्या सान्निध्यातले प्रौढ म्हणून आपण कसे वागतो याचं निरीक्षण करून मुलं स्वतःचं वर्तन ठरवतात. ‘मोबाईल बाजूला ठेव,’ अशी सूचना केल्यावर जर आजी-आजोबा स्वतःच्या मोबाईलमध्ये काहीतरी बघायला सुरुवात करणार असतील तर, मूल त्यातून जो काही संदेश घ्यायचा तो घेईलच.

‘रात्री उशिरापर्यंत मोबाईल का बघता’ असं म्हणत मुलांना टोकणारे आई-बाबा रात्री उशिरापर्यंत बिंजवॉच करणार असतील तर, मुलं त्यांना जे हवं ते त्यांच्या सोईनं उचलणारच आहेत. मुलं टिपकागदासारखी असतात. आई-बाबा, आजो-आजोबा जसे वागतील त्यातल्याच गोष्टी उचलून ते, स्वतःच वर्तन कसं असावं, याची मांडणी करत जातात. म्हणूनच, आपली जबाबदारी सगळ्यात मोठी आहे. जन्म देऊन काम संपत नाही.

मूल सज्ञान होईपर्यंत पालक म्हणून आपली जबाबदारी मोठीच आहे. आणि, त्याविषयी जागरूक असण्याची आवश्यकता आहे. एक उदाहरण देते... व्हॉट्सॲपच्या जगात फॅमिली ग्रुपमध्ये नव्हे तर, इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका बाबाचा कुणाशी तरी भलताच वाद झाला. मतभेद झाले. वाद दोन दिवस चालूच होता.

बाबा जे जे म्हणून सोशल मीडियावर लिहीत होता, कधीमधी अर्वाच्य शिव्या देत होता, समोरच्याची रागाच्या भरात अक्कल काढत होता ते ते सगळं तो त्याच्या बायकोला मोठ्या तोऱ्यात सांगत होता. त्याचं लहान मूल आजूबाजूला खेळत असताना हे सगळं त्याच्या कानावर पडत होतं.

बाबानं त्याच्याही नकळत त्याच्या मुलापर्यंत, मतभेद झाले तर दुसऱ्याची बाजू समजून घ्यायची नसते; आपलीच रेटायची असते... आणि, दुसऱ्याची अक्कल काढली तरी, त्याला चार अर्वाच्य शिव्या दिल्या तरी चालतं, ही गोष्ट पोहोचवली. ऑनलाईन जगाचा परिणाम ऑफलाईन जगात जगणाऱ्या मुलावर होण्याच्या शक्यता वाढल्या.

अशा अनेक बारीकसारीक गोष्टी असतात, ज्या मुलांपर्यंत पोहोचतात, तसंच पालक जर माध्यमांचा, तंत्रज्ञानाचा विवेकी वापर करत असतील तर मुलांना तेही दिसत असतं, जाणवत असतं. मग माध्यमांकडं, तंत्रज्ञानाकडं बघण्याची त्यांचीही नजर बदलते. ते अधिक सजग, त्यांच्याही नकळत, होण्याच्या शक्यता बदलतात.

मुलांना माध्यमांचे आणि सायबरजगताचे फायदे-तोटे-धोके यांची जाणीव करून देणं ही पालक म्हणून आपली जबाबदारीच आहे. रस्त्यावरून चालताना, रस्ता क्रॉस करताना काय करावं हे जसं आपण मुलांना सांगतो, तसंच सायबरच्या जगताविषयीही आवश्यक ती माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवली पाहिजे.

‘माध्यमविवेक’ आणि ‘माध्यमभान’ या दोन गोष्टींचीच ढाल फक्त आपल्या आणि आपल्या मुलांच्या हातात असणार आहे. बदलणाऱ्या तंत्रज्ञानाचा योग्य वापर करायचा असेल तर ही ढाल नीट वापरता यायला हवी.

पुढील गोष्टी आवर्जून करा

  • दिवसातलं एक जेवण एकत्र आणि मोबाईलशिवाय करण्याचा प्रयत्न करा.

  • रात्री एकत्र गप्पा मारा. म्हणजे फोन घेण्याची इच्छा कुणालाच होणार नाही.

  • मुलांबरोबर स्वतःचेही छंद जोपासा. जगण्याच्या धबडग्यात ते छंद मागं पडले असतील तर त्यांना प्राधान्य द्या.

  • रोज स्वतःसाठी किमान १५ मिनिटं काढा.

  • मुलांच्या कामांमध्ये सहभागी व्हा आणि स्वतःच्या कामांमध्ये, जिथं शक्य आहे तिथं, मुलांना सहभागी करून घ्या.

  • असं केल्यानं सगळ्या कुटुंबाचा स्क्रीनटाइम कमी व्हायला मदत होऊ शकते.

(लेखिका ह्या ‘सायबर-मैत्र’च्या संस्थापक, तसंच सायबर-पत्रकार आहेत.)

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.