इतिहासाच्या पानांत डोकावताना...
esakal October 06, 2024 09:45 AM

‘लर्न फ्रॉम यस्टर्डे, लिव्ह फॉर टुडे, होप फॉर टुमारो. द इंपॉर्टंट थिंग इज नॉट टू स्टॉप क्वश्चनिंग.’

विख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाईन यांचं हे विधान आहे. विविध शोधांची हीच प्रेरणा आहे, असं म्हटलं तरी वावगे ठरणार नाही. दररोजचा दिवस खरं तर एक इतिहास निर्माण करत असतो. जगातील बहुतांश शोधांची जननी ही `गरज` असल्याचं दिसून येते.

तसेच आंतरिक ऊर्मीतून ज्या कृती केल्या गेल्या त्यातूनच इतिहास निर्माण झाल्याचेही आपल्याला दिसून येते. अर्थात, आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींबद्दल माणसाला असलेले कुतूहल हे सगळ्याच्या मुळाशी आहे. दररोजचा दिवस एक नवी आशा घेऊन येतो, तसाच त्याच्या मागे एक इतिहासही दडलेला असतो.

दररोजच्या दिवसाशी संबंधित असलेला रंजक इतिहास र. कृ. कुलकर्णी यांनी ‘आजच्या दिवशी... इतिहासाच्या पानांमधून’ या पुस्तकातून मांडला आहे. अनोख्या आणि वैविध्यपूर्ण ३६५ घडामोडी या पुस्तकात लिहिल्या आहेत. या सर्व घटना परदेशाशी संबंधित आहेत हे विशेष. ‘दिनविशेष’ या विषयावर अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.

त्यात प्रामुख्याने त्या तारखेला जन्मलेले अथवा मृत्यू पावलेल्या प्रसिद्ध व्यक्ती, प्रसिद्ध घटनांची जंत्री असते. मात्र एखाद्या शोधाची, नवनिर्मितीची माहिती आणि त्या मागील गोष्ट त्यात नसते. नेमका हा धागा धरूनच प्रत्येक घटनेमागची गोष्ट या पुस्तकामध्ये लिहिली आहे.

ऑक्सफर्ड इंग्लिश शब्दकोश सर्वांना माहिती आहे. त्याचा पहिला खंड एक फेब्रुवारी १८८४ रोजी प्रसिद्ध झाला होता. ‘फिलॉलॉजिकल सोसायटी ऑफ लंडन’ या संस्थेला १८५७ मध्ये अँग्लो सॅक्सन काळापासून असलेल्या इंग्लिश शब्द असलेल्या शब्दकोशाची आवश्यकता जाणवली.

त्यानंतर प्रक्रिया सुरू झाली व पहिला खंड प्रत्यक्षात येण्यासाठी २७ वर्षांचा कालावधी लागला. त्यानंतर पुढील ४० वर्षांहून अधिक काळ ते सुरू राहिले व त्याचे दहा खंड प्रकाशित झाले. त्यानंतरही त्यात भर पडत जाऊन १९८६पर्यंत या खंडांची संख्या १६ पर्यंत पोहोचली होती. याबाबतची रंजक माहिती पुस्तकात दिली आहे.

‘बीबीसी’ या प्रसिद्ध रेडिओने ‘आज कोणतीच बातमी नाही’ असे जाहीर केलेल्या दिवसाची गोष्टही वाचनीय आहे. ‘बीबीसी’ने १८ एप्रिल १९३० रोजी रात्री पावणे नऊच्या बातमीपत्रात त्यांनी ते जाहीर केले व पियानोवरील संगीत श्रोत्यांना ऐकविले. माध्यमस्वातंत्र्याबाबतचा हा अघोषित लढा चांगलाच गाजला होता.

गोठलेल्या तळ्यांतून बर्फ काढून तो अमेरिकेतून भारतात पाठविण्याचा आणि त्या व्यवसायाच्या बळावर कोट्यधीश झालेल्या फ्रेडरिक ट्यूडर याची मोठ्या प्रमाणावर कुचेष्टाही झाली. शीतगृहाची व्यवस्था उपलब्ध नसताना तब्बल दहा हजार सागरी मैल पार करून हा बर्फ पाठविण्यात आला होता.

अशा अनेक सुरस कथा यात आहेत. झिमरमनची तार, टेक्सेलचे युद्ध, पॉपकॉर्न, काँकॉर्ड, अजीनोमोटो, नेफरतीतीचा पुतळा, गिनेस बुक अशासारख्या अनेक घटनांची नोंद कुलकर्णी यांनी पुस्तकात घेतली आहे. सहज, सोप्या लेखन शैलीमुळे पुस्तक वाचनीय झाले आहे.

पुस्तकाचं नाव : आजच्या दिवशी .. इतिहासाच्या पानांमधून...

३६५ दिवसांच्या अनोख्या कथा

लेखक : र. कृ. कुलकर्णी

प्रकाशक : डायमंड पब्लिकेशन्स, पुणे

संपर्क : ८६०००१०४१६

पृष्ठं : ३१०

किंमत : ६५० रुपये

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.