10 महिन्यांपासून ST कर्मचाऱ्यांची 700 कोटी रुपयांची PF रक्कम थकीत, कर्मचाऱ्यांना आर्थिक झळ
अल्पेश करकरे October 06, 2024 10:13 AM

ST Employees PF Amount : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचारी (Employees) व अधिकारी पीएफ रक्कमेच्या (PF Amount) प्रतीक्षेत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांची 700 कोटी रुपयांची पीएफ रक्कम गेल्या दहा महिन्यांपासून थकीत आहेत. 3000 कर्मचारी जुलैपासून अॅडव्हांसच्या प्रतीक्षेत आहेत. सवलत मूल्य रक्कम सरकारकडून (Govt) अपुरी येत असल्याने कर्मचाऱ्यांना आर्थिक झळ बसत आहे. राज्य सरकार बेपर्वाईने वागत असल्याची टीका श्रीरंग बरगे यांनी केलीय. 

एसटीला निधी देण्यात राज्य सरकारची बेपर्वाई

एसटी कर्मचारी आणि पगारातून कपात केलेली 700 कोटी रुपयांची रक्कम पी. एफ. ट्रस्टकडे एसटीने भरली नसल्यानं आपल्या पीएफमध्ये जमा असलेल्या रक्कमेतून अॅडव्हांसची मागणी करणारे 3000 कर्मचारी जुलैपासून पीएफ अॅडव्हांस रकमेच्या प्रतीक्षेत आहेत. गेले अनेक महिने सरकारकडून येणारी सवलत मूल्य प्रतिपूर्ती रक्कम अपुरी येत असल्याने कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात केलेली पी. एफ. रक्कम ट्रस्ट कडे जमा केली जात नाही. साहजिकच त्यामुळं कर्मचाऱ्यांना पी एफ अॅडव्हांस मिळत नसल्याने आर्थिक झळ सोसावी लागत आहे. विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. एसटीला निधी देण्यात राज्य सरकार बेपर्वाईने वागत असल्याची टीका महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.

मागणीच्या तुलनेत अपुरा निधी 

एसटी कर्मचाऱ्यांचे पीएफ व ग्र्याजुटीचे दोन स्वतंत्र ट्रस्ट असून 87 हजार एसटी कर्मचारी व अधिकारी यांची भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफची अंदाजे 700 कोटी रुपये व उपदान म्हणजे ग्र्याजुटीची अंदाजे 1000 रुपये इतकी रक्कम अशी मिळून अंदाजे 1700 कोटी  रुपयांची रक्कम गेले 10 महिने एसटीने  दोन्ही ट्रस्टकडे भरणा केलेली नाही. पीएफ ट्रस्टमधून कर्मचारी आपल्या खात्यावरील जमा रक्कमेतून आर्थिक अडचणीच्या वेळी अॅडव्हांस रक्कम घेत असतात. पण गेले दहा महिने सरकारकडून अपुरा निधी येत असल्यानं एसटीने पीएफ रक्कम ट्रस्टकडे जमा केली नाही. त्यामुळं ट्रस्टच्या तिजोरीत खडखडाट असून राज्यभरातील एसटीच्या 3000 कर्मचाऱ्यांना जुलैपासून आतापर्यंत पीएफची अॅडव्हांस रक्कम मिळाली नाही. आपलीच रक्कम आपल्याला मिळत नसल्याने कर्मचारी आर्थिक विवंचनेत सापडले असून स्वतःचे आजारपण किंवा कुटुंबीयांचे आजारपण, मुला मुलींची लग्ने, शाळा, कॉलेजची फी भरण्यासाठी  सुद्धा हे पैसे वेळेवर मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. मागणीच्या तुलनेत अपुरा निधी देणारे सरकारच जबाबदार असल्याचा आरोपही बरगे यांनी केला आहे.

सवलत मूल्य प्रतिपूर्ती निधी

एसटी महामंडळ प्रवाशांना तिकीट दरात विविध प्रकारच्या सवलती देते त्याची दर महिन्याला सरकारकडून प्रतिपूर्ती रक्कम येत असते. मागणी केलेली पूर्ण रक्कम सरकारने कधीही एसटीला दिली नसून, त्यामुळं विविध अडचणीचा सामना करावा लागत असल्याचेही बरगे यांनी म्हंटले आहे.

ST Employee: एसटी कर्मचारी वेतन वाढ श्रेयाच्या लढाईत कर्मचाऱ्यांची फरफट; महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचा आरोप

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.