Nashik Navratri 2024 : महिलांच्या सुरक्षिततेसाठी 'निर्भया' पथकांची करडी नजर; दिवस-रात्र महिला निर्भया पथकांची गस्ती
esakal October 06, 2024 11:45 AM

नाशिक : नवरात्रोत्सवानिमित्त शहरात सुरू असलेल्या यात्रा, गरबा, दांडिया यावर शहर पोलिसांची करडी नजर असून मुली व महिलांची छेडखानी रोखण्यासाठी खास महिला पोलिसांचे निर्भया पथकांच्या गस्तींचे नियोजन करण्यात आले आहे. पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये चार विभागानुसार नेमणूक करण्यात आलेले निर्भया पथकामार्फत दिवस-रात्र पेट्रोलिंग केली जात आहे. तर, दुसरीकडे शाळा-महाविद्यालयांमध्ये मुलींसाठी प्रबोधनात्मक उपक्रम राबवून मुलींना सायबर साक्षरतेसह, लैगिंग छळाविरोधात आवाज उठविण्यासाठी एकप्रकारे महिला पोलिसांकडून ‘प्रबोधनाचा जागर’च केला जात आहे. (navratri Nirbhaya teams have alert for safety of women during garba in city )

नवरात्रोत्सवाला गुरुवारपासून (ता. ३) उत्साहात प्रारंभ झाला आहे. देवी मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी होते आहे. कालिका मंदिर परिसरात नवरात्रीनिमित्ताने यात्रोत्सवही होतो आहे. याच काळात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असतो. ठिकठिकाणी दांडिया, गरब्याचे आयोजन केले असून, याठिकाणी तरुण-तरुणी मोठ्यासंख्येने येतात. अनेकदा छेडाछाडीचे प्रकार घडून सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो.

तर, याच काळात सोनसाखळी चोरट्यांकडून महिलांच्या सोनसाखळ्या खेचून नेण्याचेही प्रकार घडतात. असे प्रकार घडू नये. महिलांना सुरक्षितपणे नवरात्रोत्सव साजरा करता यावा, यासाठी नाशिक शहर पोलिस आयुक्तालयाचे संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून चारही विभागात महिला पोलीसांचे निर्भया व दामिनी पथकांची करडी नजर असणार आहे.

आयुक्तालयात चार निर्भया पथके

शहर पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये पंचवटी, सरकारवाडा, अंबड आणि नाशिकरोड असे चार विभाग केले आहेत. चारही विभागाचे सहायक आयुक्त या पथकांचे नोडल ऑफिसर असून, त्यांच्या नेतृत्वाखाली निर्भया पथकांची नियुक्ती केली आहे. एका पथकामध्ये एका महिला पोलिस अधिकाऱ्यासह चार पोलिस कर्मचारी आहेत. ही पथके सकाळी ७ ते ३ आणि दुपारी ३ ते रात्री १२ वाजेपर्यंत अशा दोन शिफ्टमध्ये या पथकामार्फत पेट्रोलिंग केले जाते. ()

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गस्ती वाढविण्यात आलेली आहे. कालिका मंदिर परिसर, भगूर येथील रेणुका माता मंदिर परिसरामध्ये महिलांची गर्दी असल्याने याठिकाणी निर्भया पथकातील महिला पोलीस साध्या वेशात गस्तीवर आहेत. नवरात्रोत्सवात प्रामुख्याने मध्यरात्री ते पहाटेदरम्यान दर्शनासाठी महिलांचे येण्याचे प्रमाण मोठे असते.

यावेळी मुली तसेच महिलांची छेडखाणी, सोनसाखळ्या हिसकावणे, लूट असे प्रकार घडण्याची शक्यता लक्षात घेत शहर पोलीसांनी कडक पोलिस बंदोबस्त असला तरी महिलांसाठी खास रात्री गस्ती पथकांचे नियोजन करण्यात आले आहे. पहाटे ४ ते सकाळी ९ व सायंकाळी ६ ते रात्री ११ अशा विविध वेळातही साध्या वेशातील पथके गस्त घालत आहेत.

‘निर्भया’शी येथे साधा संपर्क

* निर्भया पथक १ (पंचवटी, आडगाव, म्हसरुळ) : ९४०३१६५८३०

* निर्भया पथक २ (सरकारवाडा, गंगापूर, भद्रकाली, मुंबई नाका) : ९४०३१६५६७४

* निर्भया पथक ३ (अंबड, इंदिरानगर, सातपूर) : ९४०३१६५५०६

* निर्भया पथक ४ (उपनगर, नाशिकरोड, देवळाली कॅम्प) : ९४०३१६५१९३

* टोल फ्री : डायल ११२

''नवरात्रोत्सवात नव्हे तर एरवीही निर्भया पथकाकडून शहरात पेट्रोलिंग केली जाते. नवरात्रोत्सवात गस्तीचे प्रमाण वाढविले जाते. जेणेकरून कुठेही महिलांना त्रास होऊ नये. त्यांना सुरक्षितपणे नवरात्रोत्सव साजरा करता यावा. त्यांना होणाऱ्या समस्येबाबत निर्भया पथकाच्या चारही विभागाशी संपर्क साधता येऊ शकतो.''- संदीप मिटके, सहायक आयुक्त, विशेष शाखा.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.