स्त्री सन्मानाचं नवरात्र
esakal October 06, 2024 11:45 AM

- प्रा. विशाल गरड, vishalgarad.18@gmail.com

नऊ दिवसांच्या प्रदीर्घ युद्धानंतर देवी दुर्गानं महिषासुर राक्षसाचा वध केला. जो दिवस आपण विजयादशमी म्हणून साजरा करतो. हा दिवस म्हणजे सत्याचा असत्यावर झालेला विजय. हा दिवस म्हणजे चांगल्याचा वाइटावर झालेला विजय. मग हे नऊ दिवस आपणही जर आपल्यातल्या वाईट विचारांशी युद्ध करून दहाव्या दिवशी विजयोत्सव साजरा केला तर?

वर्षभरात आपल्या व्यक्तिमत्त्वात ज्या ज्या काही विकृत विचारांनी अतिक्रमण केले असेल, ज्या ज्या व्यसनांनी जखडलं असेल, त्या व्यसनांना आणि वाईट विचारांना जर या नऊ दिवसांत शरीरातून आणि मनातून काढून आत्मशुद्धी करता आली तर ? तर मग प्रत्येक वर्षी येणारी नवरात्र सार्थकी लागेल.

दसऱ्या दिवशी काही ठिकाणी रावण दहन होते. रावणाचा प्रतीकात्मक पुतळा उभारून तो जाळला जातो. अशावेळी आपण व्यक्ती जाळत नसून त्या व्यक्तीच्या आतली वृत्ती जाळत असतो. आज घडीला बघायचे झाले रावणाहून भयंकर वृत्ती माणसात निर्माण झाल्या आहेत. उद्या जर रावण पुन्हा जिवंत होऊन माणसात आला तर तो माणसांकडून स्वतःला जळताना पाहून म्हणेल 'अरे, मला जाळण्यापेक्षा तुमच्या मनातल्या रावणाला जाळा. कारण मला मारण्यासाठी आधी तुम्हाला राम व्हावे लागेल.'

सांगण्याचं तात्पर्य एवढंच, की पुराणकाळातील या घटनेचे आम्ही दरवर्षी परंपरागत अनुकरण करत आलोय, पुढेही करू पण या गोष्टींच्या पायथ्याशी नेमकं काय आहे हे विसरून जर आम्ही ते करत असू तर मग आपली उत्क्रांती कशी होणार?

मला जर कधी रावणदहन करण्याची वेळ आली, तर मी अख्खा रावण कधीच जाळणार नाही. रावणातल्या काही चांगल्या गोष्टी अंगीकारून उरलेल्या अहंकाराला जाळीन. रावण साम्राज्यात वेळ प्रसंगी लढण्यासाठी स्त्रियांना शस्त्रज्ञान दिले जायचे. लंकेतल्या ''लंकिनी'' या स्त्रीला रावणाने राजधानीच्या संरक्षणाची जबाबदारी दिली होती. त्याने बुद्धिबळाचा शोध लावला.

मातृहत्या केली म्हणून त्याने स्वतःच्या भाऊजीचे मस्तक छाटले. त्याची शिकण्याची तीव्र इच्छाशक्ती, कुटुंबाची काळजी आणि प्रजेवरील प्रेम कौतुकास्पद होते. संकरित जन्म, दासीपुत्र माणूस सुद्धा शक्ती, भक्ती आणि बुद्धिचातुर्याच्या जोरावर राजा होऊ शकतो हे रावणाने त्रैलोक्याला दाखवून दिले.

युद्धात रावणाच्या नाभीत बाण मारल्यानंतर रावणाला गुरु मानून त्याच्याकडून ज्ञान घेण्यासाठी प्रभू श्रीरामानं लक्ष्मणाला रावणाकडं पाठवलं. शेवटच्या क्षणी रावणानं लक्ष्मणाला शिष्य मानून विद्या दिली आणि आपण बसलोय इकडे रावणाला जाळत. माणूस मेल्यानंतर वैर संपतं. उरतं ते फक्त त्यानं केलेल्या चांगल्या आणि वाईट गोष्टी.

सध्या आपण हजारो वर्षांनंतरही व्यक्तीला दोष देत बसण्यापेक्षा त्याच्यातल्या वाईट गोष्टींना मूठमाती देऊन त्यातल्या चांगल्या गोष्टी अंगीकारून स्वतःला समृद्ध करायला हवं. रावणाला हरवल्यानंतर रामालाही वाटलं, की लक्ष्मणानं रावणाला गुरु मानून त्याच्याकडून शिकलं पाहिजे मग आपणही का शिकू नये?

आज घडीला आपल्या समाजात मुलींवर बलात्कार करून त्यांना ठार मारणारे, महिलांची नग्न धिंड काढणारे, चिमुरड्या मुलींकडेही वाईट नजरेने बघणारे, बायकोचा छळ करणारे, आईला मारणारे, व्यभिचार करणारे, मुलींची छेड काढणारे असे हजारो-लाखो रावण रस्त्यावर हिंडत आहेत. मग अशा रावणांचा आपण कसा बंदोबस्त करणार आहोत. का त्यासाठीही प्रभु श्रीरामालाच यावे लागेल? नवरात्र ही स्त्रियांच्या सन्मानार्थ साजरी झाली पाहिजे.

जन्माआधी नऊ महिने नऊ दिवस पोटात जिने आपलं संरक्षण केले, त्या पोटातून बाहेर येऊन आपण तिचे संरक्षण करू शकत नसू, तर आपल्या पुरुषार्थाला काय अर्थ उरतो? जिने तिच्या रक्ताच्या थेंबांनी आपलं शरीर बनवलं, तेच शरीर जर तिच्यावरच चाल करून जात असेल तर माणूस म्हणून आपण काय कमावलं ?

स्त्री ही निर्मितीची खाण आहे. शेतीचा शोध स्त्रीने लावला. पोटाची भूक भागवण्यासाठी दिवसरात्र भटकंती करणाऱ्या माणसाला स्त्रीने नदीतीरावर शाश्वत जीवन दिले. सुख आणि समृद्धी दिली. जगातल्या सर्व संस्कृतींची निर्माती तीच आहे.

ती सुवासिनी असली तरी पवित्र, ती विधवा असली तरी पवित्रच, ती काळी असली तरी पवित्र, ती गोरी असली तरी पवित्रच, तिला पाळी आली असतानाही पवित्र, नसतानाही ती पवित्रच, ती तारुण्यात पवित्र ती वार्धक्यातही पवित्रच, ती देशात पवित्र ती परदेशातही पवित्रच. तिचे हे पावित्र्य असंच अबाधित राहो हीच आई तुळजाभवानी, श्री महालक्ष्मी, आई रेणुकादेवी आणि सप्तशृंगी चरणी प्रार्थना. आई राजा उदो उदो !

(लेखक हे प्रसिद्ध व्याख्याते आणि इतिहास व विविध सामाजिक घडामोडींचे अभ्यासक आहेत.)

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.