काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपचे शक्ती प्रदर्शन, राबवला असा फंडा की लोकांची उडली झुंबड
GH News October 06, 2024 10:10 PM

राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहे. पुढील आठवड्यात कधीही निवडणुकीची घोषणा होऊ शकते. इच्छूकांनी आपली जोरदार तयारी सुरु केली आहे. पुणे जिल्ह्यातील काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भारतीय जनता पक्षाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केले आहे. पुण्यातील भोर विधानसभा मतदार संघ काँग्रेसचे आमदार संग्राम अनंतराव थोपटे यांचा बालेकिल्ला आहे. २००४ पासून थोपटे परिवाराचा व्यक्तीच या मतदार संघातून आमदार होत आहे. आता भाजपचे भोर विधानसभा निवडणूक प्रमुख किरण दगडे यांनी शक्तीप्रदर्शन केले आहे. पुण्याच्या भोरमध्ये त्यांच्याकडून दिवाळी फराळ किराणा किट वाटप करण्यात आले. त्यासाठी हजारो नागरिकांची गर्दी झाली.

भाजपचे भोर विधानसभा प्रमुख किरण दगडे यांच्याकडून दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना किराणा किटचे वाटप केले. किराणा किट घेण्यासाठी महिला, नागरिकांची मोठी झुंबड उडालेली मिळाली आहे. 18 हजार जणांना या किराणा किटचे वाटप करण्यात आले. तालुक्यातील गावागावातून मोठ्या प्रमाणात महिला पुरुषांची ही किट घेण्यासाठी गर्दी मोठी उसळली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या आमदार संग्राम थोपटे यांच्या भोर विधानसभा मतदार संघात भाजपचं शक्ती प्रदर्शन केले. किरण दगडे यांनी जंगी कार्यक्रम घेतला. तालुक्यातील 18 हजार जणांना किराणा किटचे वाटप करण्यात आले. भोर विधानसभेतील भोर, राजगड, मुळशी या तीन तालुक्यात या किराणा किटच वाटप करण्यात येणार आहे.

काय आहे किरणा किटमध्ये

दिवाळी फराळ किराणा किट साहित्यमध्ये १ किलो रवा, १ किलो बेसण पीठ, अर्धा किलो पीठीसाखर, १ किलो मैदा, अर्धा किलो डालडा, १ किलो तेल, १ किलो भाजके पोहे, भाजकी डाळ, मोती साबण, सुगंधी उटणे, पणती सेट, रांगोळी, चिवडा मसाला, मीठ असे साहित्य मिळणार आहे.

भाजप या जागेसाठी आग्रही

भोर विधानसभेची जागा महायुतीमधून लढण्यासाठी भाजपला मिळावी यासाठी भाजप आग्रही आहे. भोर विधानसभेतून भाजपच्या तिकिटावर लढण्यासाठी चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्गीय किरण दगडे इच्छुक आहेत. यावेळी किरण दगडे म्हणाले, आता निवडणुकीमुळे नाही तर आठ वर्षांपासून मी हा कार्यक्रम घेत आहे. आम्ही या भागांत प्रत्येक सण साजरा करतो. नागरिकांना रोज दिवाळी वाटेल, असे काम करणार आहे. मतदार संघात ठिकठिकाणी कार्यक्रम घेणार आहोत.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.