Israel Attack : इस्रायलला पुन्हा झटका, हिजबुल्लाहच्या रॉकेटच्या माऱ्यापुढे Air Defence सिस्टीम फेल
GH News October 07, 2024 12:12 PM

इस्रायलं सध्या आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी मोठी लढाई लढत आहे. इस्रायलने शेजारच्या लेबनानमध्ये घूसन हिज्बुल्लाह विरोधात मोठी कारवाई केली होती. बेरूतमध्ये इस्रायलच्या बॉम्बहल्लादरम्यान आता हिजबुल्लाहने इस्रायलच्या हैफा शहरात पुन्हा एकदा दहशत माजवली आहे. दक्षिण लेबनॉनमधून इस्रायलच्या बंदर शहर हैफावर रॉकेट डागण्यात आले आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे हा हल्ला हमासच्या  हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त करण्यात आला आहे. या रॉकेटला पूर्णपणे रोखण्यात इस्रायलचे ( air defence) हवाई संरक्षण अपयशी ठरले आणि पाच रॉकेट्स त्यांच्या लक्ष्यावर धाडकन आदळली.

या हल्ल्यात सुमारे 10 लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. हिजबुल्लाने हा हल्ला आपला नेता हसन नसराल्लाहला समर्पित केला. गेल्या महिन्यात बेरूतमध्ये इस्रायली बॉम्बस्फोटात हसन ठार झाला होता. पण 7 ऑक्टोबरचा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी हिजबुल्लाहने हा हल्ला केल्याचे मानले जात आहे आणि हमासप्रमाणेच इस्रायलचा सुरक्षा घेरा तोडून हैफावर रॉकेट सोडले.

लेबनॉनमध्ये सुरू असलेल्या इस्रायलच्या कारवाईला प्रत्युत्तर म्हणूनही हा हल्ला केल्याचे मानले जात आहे. हैफा बंदराजवळील इस्रायली लष्करी तळाला लक्ष्य केल्याचे हिजबुल्लाहने निवेदनात म्हटले आहे. यापूर्वीही हैफाच्या दक्षिणेकडील आणखी एका तळावर दोन हल्ले करण्यात आले होते. हिजबुल्लाहच्या रॉकेटने हैफामध्ये प्रचंड विध्वंस केला आहे. 

एअर डिफेन्स ठरलं अपयशी

दक्षिण लेबनॉनमधून येणारे रॉकेट रोखण्यात इस्रायलचं एअर डिफेन्स पूर्णपणे अपयशी ठरलं. सुदैवाने वेळेवर सायरनचा आवाज ऐकू आल्याने अनेक लोकांनी वेळीच बॉम्ब शेल्टरमध्ये जाऊन आसरा घेतला. अन्यथा हैफामध्ये आणखी विध्वंस घडू शकला असता. एअर डिफेन्स नेमका अपयशी का ठरला, याचा शोध घेत असल्याचे इस्रायली लष्कराने सांगितले.

बेरूतमध्ये इस्रायलचा हल्ला सुरूच

बेरूतमध्ये इस्रायलकडून सुरू असलेल्या प्रचंड बॉम्बस्फोटानंतर हिजबुल्लाचा हा हल्ला झाला आहे. रविवारी झालेल्या बॉम्बस्फोटात लेबनॉन आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्याला लक्ष्य करण्यात आले. तसेच त्या रोडजवळील अनेक इमारतींनाही लक्ष्य करण्यात आले. एवढंच नव्हे तर लेबनीज वृत्तवाहिनी अल-मनारची इमारतही इस्रायलने केलेल्या हल्ल्यात उद्ध्वस्त झाली.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.