भारत हिंदू राष्ट्र होणार? RSS प्रमुख मोहन भागवतांच्या 'त्या' विधानाने चर्चेला उधाण, काय म्हणाले भागवत?
esakal October 07, 2024 01:45 PM

''हिंदू समाज हा सर्वांशी सुसंवाद साधत गुण्यागोविंदाने नांदतो. हिंदू समाजाने आता भाषाभेद, प्रांतभेद, जातिभेद आणि पंथभेद दूर सारत एकत्र यायला हवे.’’

कोटा : ‘‘भारत हे हिंदू राष्ट्र (Hindu Rashtra) असून हिंदूंनी धर्माच्या संरक्षणासाठी भाषा, प्रांत आणि जातिभेद दूर सारून एकत्र यायला हवे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक (Mohan Bhagwat) यांनी शनिवारी केले. राजस्थान येथील बरान येथे आयोजित करण्यात आलेल्या स्वयंसेवक एकत्रीकरण कार्यक्रमात भागवत यांनी हे विधान केले आहे.

यावेळी बोलताना भागवत म्हणाले, ‘‘आपण येथे अत्यंत प्राचीन काळापासून राहात आहोत, हिंदू ही संज्ञा नंतरच्या काळात आली. हिंदू समाजाने सर्वांना आपलेसे केले आहे. हिंदू समाज हा सर्वांशी सुसंवाद साधत गुण्यागोविंदाने नांदतो. हिंदू समाजाने आता भाषाभेद, प्रांतभेद, जातिभेद आणि पंथभेद दूर सारत एकत्र यायला हवे.’’

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे यांत्रिक संघटन नसून या संघटनेला विचारांचे अधिष्ठान आहे, असे प्रतिपादनही भागवत यांनी यावेळी केले. शिस्तबद्ध आचरण, देशाप्रती कर्तव्याची जाणीव आणि ध्येयाप्रती समर्पित भावना हे अत्यावश्यक गुण असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी भागवत यांनी रा. स्व. संघाच्या स्वयंसेवकांना, व्यापक जनसंपर्क करा आणि समाजातील त्रुटी दूर करत सामर्थ्यवान समाज निर्माण करा असे आवाहन केले.

भागवत म्हणाले...
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी समाजामध्ये सौहार्द टिकविण्यासाठी आणि समाजातील सौहार्द वाढविण्यासाठी सतत कार्यरत राहावे.

  • समाज या संकल्पनेचे मूलभूत घटक असलेल्या स्वदेशी मूल्यांबाबत, पर्यावरणाबाबत आणि कुटुंबातील सामाजिक भान याबाबत स्वयंसेवकांनी जागरूकता निर्माण करावी.

  • आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे स्थान आणि परदेशात राहणाऱ्या भारतीयांचा सन्मान व त्यांची सुरक्षा ही देशाच्या सामर्थ्यसंपन्नतेवर अवलंबून आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.