मोठी बातमी: बोपदेव घाट सामूहिक अत्याचारातील आरोपींची माहिती देणाऱ्यास 10 लाखांचं इनाम
Marathi October 07, 2024 02:24 PM

पुणे: संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या पुण्याच्या बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील (Bopdev Ghat Rape case) आरोपींना हुडकून काढण्यासाठी राज्य सरकार आणि गृह मंत्रालयाने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या प्रकरणातील आरोपींची माहिती देणाऱ्या व्यक्तीला 10 लाख रुपयांचे इनाम देण्याची घोषणा पोलीस खात्याकडून (Pune Police) करण्यात आली आहे. आरोपींची नावे आणि ठावठिकाणा सांगणाऱ्या व्यक्तीची ओळखही गुप्त ठेवली जाईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.

बोपदेव सामूहिक अत्याचार प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 200 हून अधिक संशयित व्यक्तींची कसून चौकशी केली आहे. पोलिसांनी आतापर्यंत बोपदेव घाट परिसरात गेलेल्या तीन हजार मोबाइलधारकांची माहिती जमा केली आहे. याशिवाय, संशयित आरोपींची रेखाचित्रही जारी करण्यात आली आहेत. याआधारे पोलिसांकडून आरोपींना शोधण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. मात्र, आतापर्यंत पोलिसांना तरुणीवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या नराधमांचा ठावठिकाणा मिळालेला नाही. या नराधमांनी बोपदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीला कोयत्याचा धाक दाखवून तिच्यावर सामूहिक अत्याचार केला होता. गुरुवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती.

नेमकं काय घडलं?

पीडित तरुणी पुण्यातील बोपदेव घाटात गुरुवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास आपल्या मित्रासोबत फिरायला गेली होती. यावेळी तीन जणांनी या दोघांवर हल्ला केला होता. त्यांनी तरुणी आणि तिच्या मित्राला कोयत्याचा धाक दाखवला. आरोपींनी तरुणाला मारहाण केली, त्याचा शर्ट काढला. त्याच शर्टने आरोपींनी तरुणाचे हात बांधले, त्याच्याच पॅन्टचा पट्टा काढून त्याचे पाय बांधले. त्यानंतर आरोपींनी तरुणाला एका झाडाला बांधून ठेवले. यानंतर आरोपींनी आपला मोर्चा मुलीकडे वळवला. ही 21 वर्षी मुलगी परराज्यातून आली असून ती पुण्यात शिक्षण घेते. आरोपींनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी घटनेचा सखोल तपास सुरू केला आहे. नराधम आरोपींकडे कोयता, चाकू अशी शस्त्रे होती, तसेच एका आरोपीच्या हातात बांबू होता. मित्राला ठार मारण्याची धमकी देऊन आरोपींनी तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे.

पुण्यातील सर्व टेकड्यांवर सर्च लाईट बसवणार

या घटनेनंतर पुण्यातील पोलीस आणि स्थानिक प्रशासन खळबळून जागे झाले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी महत्त्वाचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आता पुणे शहरातील सर्व टेकड्यांवर बसवण्यात येणाऱ्या सर्च लाईट आणि आपतकालीन परिस्थितीत वापरण्यासाठी सायरन बसवण्यात येणार आहे.

आणखी वाचा

बोपदेव घाट अत्याचार प्रकरणी तीन हजार मोबाइल नबंरची तपासणी; स्केच, सीसीटीव्ही अन् आत्तापर्यंत काय समोर आले अपडेट

अधिक पाहा..

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.