राहुल गांधी यांच्यात दैवी शक्ती अन् त्याच्यावर अदृश्य शक्तींचा प्रभाव; अविनाश पांडे यांचा दावा
Marathi October 07, 2024 02:24 PM

नागपूर बातमी नागपूर : जोवर एखाद्या व्यक्तीत दैवी शक्ती असत नाही किंवा त्याच्यावर अदृश्य शक्तींचा प्रभाव असत नाही, तोवर कोणताही व्यक्ती दहा हजार किलोमीटरची पायी यात्रा करू शकत नाही, असं सांगत काँग्रेसचे महासचिव अविनाश पांडे (Avinash Pandey) यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची तुलना थेट देवाशी केली आहे. नागपुरात डॉ. झाकीर हुसेन विचार मंचाच्या कार्यक्रमात बोलताना अविनाश पांडे यांनी हे वक्तव्य केलंय.

राहुल गांधी यांनी देशातील स्थिती पाहून जनतेत सरळ जाण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला. मात्र, असा निर्णय घेणं सोपं नाही. जोवर एखाद्या व्यक्तीत दैवी शक्ती असत नाही किंवा अदृश्य शक्तीचा प्रभाव नसतो. तोवर कोणताही व्यक्ती असे करू शकत नाही असेही अविनाश पांडे म्हणाले. कन्याकुमारी ते काश्मीर आणि मणिपूर ते मुंबई अशी पदयात्रा करताना राहुल गांधी यांनी त्यांचे वैयक्तिक आरोग्य आणि सुरक्षेची काळजी केली नाही आणि दहा हजार किलोमीटर देशाच्या रस्त्यावर पायपीट केली, लोकांचे दुःख समजून घेतले. राहुल गांधीच्या या पद यात्रेने राष्ट्राच्या वातावरणात उत्साह निर्माण केला, असा दावा ही पांडे यांनी केला.

राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल

दरम्यान, राहुल गांधींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण सोहळ्याच्या भाषणात भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी म्हटलं की, शिवाजी महाराजांनी आपल्याला संदेश दिला, की हा देश सर्वांचा आहे. इथे कोणावरही अन्याय होता कामा नये. त्याच विचारांचं प्रतिबिंब आज आपल्याला संविधानात दिसून येत आहे. संविधानात अशी एकही तरतूद नाही, जी शिवाजी महाराजांच्या विचारातून आलेली नाही. त्यांच्या विचारातून संविधानाची निर्मिती झाली आहे. शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांसारखी लोक जन्माला आली नसती, तर आपलं संविधानही नसतं. ज्यावेळी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होणार होता, तेव्हा भाजपाच्या विचारधारेच्या लोकांनी त्यांचा राज्याभिषेक होऊ नये, यासाठी प्रयत्न केले होते. त्यामुळे आज सुरु असलेली विचारधारेची लढाई ही खूप जुनी आहे. या विचारधारेविरोधात शिवाजी महाराजदेखील लढले होते आणि आता याच विचारधारेच्या विरोधात काँग्रेस पक्षही लढतो आहे. ज्याप्रकारे या लोकांनी शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाला विरोध केला, त्याप्रमाणे आताच्या सत्ताधाऱ्यांनी संसदेच्या उद्घाटनाला आदिवासी राष्ट्रपती असलेल्या द्रौपदी मुर्मू यांना बोलवलं नाही, असे म्हणत राहुल गांधींनी भाजपवर निशाणा साधला होता.

हे ही वाचा

अधिक पाहा..

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.