Ajit Pawar : अजितदादांचं ठरलं! बारामती नव्हे, तर 'या' मतदारसंघातून लढवणार निवडणूक?
Sarkarnama October 08, 2024 03:45 AM

लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांना पराभूत केलं होतं. हा पराभव उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जिव्हारी लागला आहे. 1995 पासून सलग तीस वर्षे निवडून येणाऱ्या अजितदादांनी बारामतीतून निवडणूक न लढण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे बारामतीसह राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. आता मात्र पुणे जिल्ह्यातील दुसऱ्या एका मतदारसंघातून अजितदादा निवडणूक लढू शकतात, असं बोललं जात आहे.

अजितदादांनी ( Ajit Pawar ) बारामतीतून आपला मोर्चा शिरूर विधानसभा मतदारसंघाकडे वळवला आहे. अजितदादा शिरूरमधून विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. तेथे राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) अशोक पवार हे आमदार आहेत. त्यामुळे विधानसभेला शिरूरच्या मैदानात अजितदादा विरुद्ध अशोक पवार, अशी लढत पाहायला मिळते का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

गुरूवारी ( 3 ऑक्टोबर ) अजितदादांनी बारामतीतून न लढण्याचे संकेत दिले होते. 'मी उमेदवार देईन, त्यालाच निवडून आणा,' असं अजितदादांनी म्हटलं होतं. त्यामुळे बारामतीचा उमेदवार कोण असणार? अजितदादा कुठून निवडणूक लढविणार? असे तर्कवितर्क कार्यकर्त्यांकडून वर्तवले जात होते. पण, अजितदादा शिरूरमधून निवडणूक लढण्यासाठी सकारात्मक असल्याची बातमी पक्षातील सूत्रांच्या हवाल्यानं एका मराठी वृत्तपत्रानं दिली आहे.

बारामतीत सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) विरुद्ध सुनेत्रा पवार, अशी लढत झाली होती. त्या निवडणुकीत दीड लाखांच्या मताधिक्यानं सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांना पराभूत केलं होतं. हा पराभव अजितदादांच्या जिव्हारी लागला होता. सुप्रिया सुळेंविरुद्ध सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देऊन चूक केली, असंही अजितदादांनी कबुल केलं होतं.

मात्र, विधानसभा निवडणूक जवळ येत असतानाच अजितदादांचे बारामतीतून लढण्याचे सूर बदलले आहेत. 'बारामतीतून निवडणूक लढविण्यात आता रस राहिलेला नाही. कार्यकर्त्यांची मागणी असेल आणि संसदीय समितीनं मान्यता दिली, तर जय पवार यांना बारामतीतून उमेदवारी दिली जाईल,' असं अजितदादांनी दोन महिन्यांपूर्वी म्हटलं होतं. पण, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी, 'अजितदादा बारामतीतून लढतील,' असं स्पष्ट केलं होतं.

परंतु, अजितदादा शिरूरमधून लढणार असल्याचं बोललं जात आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रसचे ( शरदचंद्र पवार ) अशोक पवार आमदार आहेत. राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतरही अशोक पवार यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. तसेच, लोकसभा निवडणुकीपूर्वी अजितदादांनी अशोक पवार यांच्या मतदारसंघात जाऊन, 'मंत्रिपद दूरच, आमदार कसा होतो, हे पाहतो,' असा दम भरला होता.

तसेच, शरद पवार यांच्यासोबत राहिल्यानं घोडगंगा कारखान्यास कर्ज न दिला असल्याचा आरोपही अशोक पवार यांनी अजितदादांवर केला होता. एकप्रकारे कारखान्याच्या माध्यमातून अशोक पवार यांची कोंडी करण्याचा प्रयत्न अजितदादांकडून केला जात असल्याचं बोललं जात होते. यातच आता अजितदादांनी शिरूरमधून निवडणूक लढण्याचं ठरवल्यास अशोक पवार यांच्यासमोर मोठं आव्हान उभे राहणार आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.