सूरज चव्हाण : 'गुलीगत' रिल्सस्टारचा बिग बॉसच्या विजेतेपदापर्यंत असा आहे 'झापुक झुपूक' प्रवास
BBC Marathi October 08, 2024 03:45 AM
X/@ColorsMarathi

'रिल्सस्टार' सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या 5 व्या पर्वाचा विजेता ठरला आहे. गायक अभिजीत सावंत आणि सूरज चव्हाण हे दोघेजण अंतिम फेरीपर्यंत पोहोचले होते.

अखेरीस अभिनेता आणि बिग बॉस मराठीचा निवेदक रितेश देशमुखनं सूरज चव्हाणचा हात उंचावत विजेता घोषित केलं.

बिग बॉस मराठीच्या 5 व्या पर्वाचा महाअंतिम सोहळा काल (6 ऑक्टोबर) रात्री पार पडला. या पर्वातील 16 सदस्यांना मागे टाकत बारामतीच्या सूरजने आपल्या 'झापुक झुपूक' अंदाजात ट्रॉफीवर नाव कोरलं.

सूरज विजयी ठरल्यानं गायक अभिजीत सावंत हा दुसऱ्या क्रमांकावर राहिला.

बिग बॉसच्या या पर्वातील विजेता ठरलेल्या सूरज चव्हाणला ट्राफीसह 14 लाख 60 हजार रुपये रक्कम मिळाली, तसंच इतर अनेक बक्षीसांचा वर्षावही झाला आहे.

सूरजच्या विजयानंतर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी एक्सवर (पूर्वीचं ट्विटर) पोस्ट शेअर करत अभिनंदन केलं.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "कलर्स मराठी या वाहीनीवर सुरू असलेल्या ‘बिग बॉस’ या रियॅलिटी शोमध्ये आपल्या बारामतीचा रीलस्टार सूरज चव्हाण हा विजेता ठरला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येऊन सूरजने हे यश मिळविले. बिग बॉसच्या घरात सूरजने जनतेच्या हृदयात जागा निर्माण केली. त्याचे या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा. सूरज आम्हाला तुझा अभिमान वाटतो."

अजित पवारांनीही सूरज चव्हाणचं अभिनंदन केलं आहे. ते म्हणाले, "आमच्या बारामतीचा सुपुत्र सूरज चव्हाण बिग बॉस मराठीचा विजेता ठरला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करत सूरजनं हे यशोशिखर गाठलं आहे. सूरज आपल्या मेहनतीच्या आणि प्रतिभेच्या जोरावर महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला. त्याच्या यशामुळे बारामतीचाच नव्हे तर, संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमान वाढला आहे. सूरजला उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!"

सूरजच्या रिल्सस्टार ते बिग बॉस मराठीचा विजेता बनण्यापर्यंतच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊया.

हालाखीच्या स्थितीतून यशोशिखरपर्यंत

सूरज चव्हाण मूळचा पुण्यातील बारामती तालुक्यातील आहे. बारामतीतलं मुडवे हे त्याचं गाव आहे.

अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत सूरजचं बालपण गेलं. सूरज 10 वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचं निधन झालं. या धक्क्यातून त्याची आई सावरू शकली नाही आणि ती आजारी पडली. या आजारपणातूनच पुढे सूरजच्या आईचंही निधन झालं.

आई-वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या मागे सूरज आणि त्याच्या पाच बहिणी या भावंडांनी एकमेकांना आधार दिला.

घरच्या बिकट परिस्थितीमुळे सूरजला आठवीपर्यंत शिक्षण घेता आलं. यानंतर हाताला मिळेल ते काम करून सूरज चार पैसे कमवू लागला.

Instagram/@Riteish Deshmukh सूरज चव्हाण अभिनेता रितेश देशमुखबरोबर

हालाखीच्या स्थितीतून जात असतानाच, सूरजच्या आयुष्याला वेगळं वळण मिळालं.

भारतात तेव्हा टिकटॉकचा बोलबाला सुरू होता. सूरजनंही टिकटॉकवरून आपला ऑनलाईन प्रवास सुरू केला.

टिकटॉकवरील रिल्सच्या माध्यमातून तो लोकांचं मनोरंजन करू लागला. टिकटॉकवर भारतात बंदी आणल्यानंतर सूरज इन्स्टाग्रामकडे वळला.

इन्स्टाग्रामवरुनही त्यानं चाहत्यांचं मनोरंजन सुरू ठेवलं. इन्स्टाग्रामवर आजच्या घडीला त्याचे तब्बल 2 मिलियन फॉलोअर्स आहेत. 'बुक्कीत टेंगूळ', 'गुलीगत धोका', 'झापुक झुपूक' अशा शब्दांमुळे तो नेटकऱ्यांत चांगचाल प्रसिद्ध झाला, यातूनच त्याला बिग बॉस मराठीची ऑफरही मिळाली.

बिग बॉस मराठीचा विजेता ठरलेल्या सूरजने आपल्या स्वभावाने प्रेक्षकांचं मन जिंकलं. पण हा प्रवास त्याच्यासाठी सोपा नव्हता. अनेक प्रसिद्ध आणि नावाजलेल्या कलाकारांशी त्याची स्पर्धा होती. त्यातच त्याला खेळ समजत नाही, अशी टीकाही त्याच्यावर होत राहिली.

मात्र, या सर्व अडथळ्यांना पार करत त्याने आपला मार्ग शोधला. त्याचा संघर्ष आणि साधेपणा प्रेक्षकांना भावला. प्रेक्षकांही त्याला तशीच दाद दिली आणि आज सूरज चव्हाण हे नाव घराघरात पोहोचलंय.

आमची परिस्थिती नव्हती, वाटत नव्हतं तो इतक्या वर जाईल म्हणून पण तो शून्यातून वर आला, याचा आनंद आहे, अशी भावना सूरजच्या बहिणीनं व्यक्त केली.

'बिग बॉस' विजेता ठरल्यानं सूरजला बक्षीस काय मिळालं?

बिग बॉस मराठीच्या महाअंतिम सोहळ्यात विजयी ठरल्यानंतर सूरजवर बक्षीसांचा वर्षाव होत आहे. या पर्वातील ट्रॉफीसह विजेत्या सूरजला पहिल्या क्रमांकाच्या बक्षीसस्वरुपात 14 लाख 60 हजारांचा चेक मिळाला.

त्यासह कार्यक्रमाचे स्पॉन्सर पु. ना. गाडगीळ ॲन्ड सन्स यांच्याकडून सूरजला 10 लाख रुपयांचा धनादेश जाहीर करण्यात आला.

एक इलेक्ट्रिक बाईकही त्याला बक्षीस स्वरुपात मिळाली आहे.

सोबतच, दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सूरजला घेऊन एक चित्रपट तयार करणार असल्याची घोषणाही केली आहे.

BBC

BBC

याआधी गायक उत्कर्ष शिंदे यांनी गिफ्ट म्हणून शिंदे कुटुंबाकडून सूरज चव्हाणसाठी एक गाणं बनवण्याची घोषणाही केली होती.

बिग बॉसच्या 5 व्या पर्वात कोणी भाग घेतला?

बिग बॉस मराठी हा अत्यंत लोकप्रिय असा रिएलिटी शो आहे. प्रेक्षक प्रत्येक सीझनची आतुरतेने वाट पाहत असतात. यंदा बिग बॉस मराठीचं 5 वं पर्व होतं तर चित्रपट अभिनेता रितेश देशमुख या शोचा निवदेक होता.

Instagram/@Colors Marathi

तर सहभागी प्रतिस्पर्धकांमध्ये निक्की तंबोळी, पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे, शुभांकर तावडे, मानसी नाईक, इंडियन ऑयडल 1 फेम गायक अभिजीत सावंत, आयरिना रुडाकोवा, अरबाज शेख, अभिनेत्री वर्षा उसगावकर, वैभव चव्हाण, अंकिता वालावलकर, समीक्षा टाके, धनंजय पवार, जान्हवी किल्लेकर, सूरज चव्हाण अशा 16 सदस्यांनी या सहभाग घेतला होता.

टॉप 5 स्पर्धकांना काय मिळालं?

बिग बॉस मराठीच्या 16 प्रतिस्पर्धकांमधून अंकिता वालावलकर ही 5 व्या स्थानावर राहिली, तर धनंजय पोवार हा 4 थ्या स्थानी होता. निक्की तंबोळीला तिसरं स्थान मिळालं.

इंडियन आयडल 1 फेम गायक अभिजीत सावंत हा दुसऱ्या स्थानावर राहिला तर सूरजने पहिलं स्थान पटकावलं.

@Colors Marathi/Instagram

सूरजनंतर दुसऱ्या स्थानावर आलेल्या अभिजीत सावंतला पु. ना. गाडगीळतर्फे 1 लाख रुपयांचा चेक मिळाला, तर धनंजय पोवार, अंकिता वालावलकर आणि निक्की तांबोळी यांना प्रत्येकी 1 लाख रुपये देण्यात आले.

या पर्वातील स्पर्धकांमध्ये सहाव्या क्रमांकावर राहिलेल्या आणि जान्हवी किल्लेकरने अंतिम स्पर्धेआधी बाहेर पडायचा निर्णय घेतला होता, 9 लाख रुपयांची बॅग घेऊन जान्हवी बिग बॉस मराठीच्या घराबाहेर पडली होती.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.