Haryana Election Results: ''हरियानामध्ये इतिहास घडला, यापूर्वी असं कधीच झालेलं नाही'' मोदींनी सांगितलं ५० वर्षांपासूनचं समीकरण
esakal October 09, 2024 05:45 AM

नवी दिल्लीः भाजपने हरियाना राज्यामध्ये हॅटट्रिक करत पुन्हा सत्ता ताब्यात घेतली आहे. जम्मू काश्मीरमध्ये भाजपने २९ जागांवर विजय मिळवला आहे. या विजयाचा जल्लोष दिल्लीमध्ये भाजपच्या मुख्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, विनोद तावडे यांच्यासह पक्षाचे शीर्षस्थ नेते उपस्थित होते.

यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेस पक्ष देशामध्ये अराजकता पसरवू पाहात आहे. त्यामुळे ते समाजातल्या वेगवेगळ्या वर्गाला भडकावत आहेत. म्हणूनच देशाला आता विचार करावा लागेल की, शेतकऱ्यांना भडकावण्याचा प्रयत्न केला तरीही हरियानातल्या शेतकऱ्यांनी भाजपला साथ दिली.

''मुळात काँग्रेस पक्ष हा देशातल्या मागासवर्गीयांचा, दलितांचा, आदिवासींचा द्वेष करतो. आज जेव्हा समाजातील हे घटक पुढे जात असल्याचं दिसतंय तर यांच्या पोटात दुखतंय. ते सत्तेला जन्मसिद्ध अधिकार समजतात हे लोक.. सरकारमध्ये नसल्यामुळे काँग्रेसची अवस्था पाण्याबाहेर असलेल्या माशाप्रमाणे झाली आहे.'' असा घणाघात मोदींनी केला.

पंतप्रधान पुढे म्हणाले की, देशातल्या जास्तीत जास्त राज्यांनी काँग्रेसला नो एन्ट्रीचा बोर्ड लावला आहे. पूर्वी काँग्रेसला वाटायचं, काम करा नाहीतर नका करु पण लोक आपल्याला मतदान करतात. परंतु आता काँग्रेसची पोलखोल झाली आहे. भाजपला देशातील लोकांनी समर्थन दिलेलं आहे. केवळ देशच नाही तर जगभरातील लोकांना भाजपचं आकर्षण आहे.

हरियानातल्या विजयाबद्दल बोलताना मोदी म्हणाले, हरियानामध्ये आतापर्यंत १३ निवडणुका झाल्या आहेत. यातल्या १० निवडणुकांमध्ये हरियानातल्या लोकांनी पाच वर्षांनंतर सरकार बदललं. परंतु यावेळी हरियानातल्या लोकांनी जे केलं ते अभूतपूर्व आहे. पहिल्यांदाच असं झालं की, पाच-पाच वर्षांनंतरचे दोन कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर जनतेने भाजपला तिसऱ्यांदा संधी दिली.

''आज हरियानामध्ये विकासाची खोटी हमी देणाऱ्यांना लोकांनी घरी बसवलं असून खऱ्या गॅरंटीला स्वीकारलं आहे. जनतेने नवीन इतिहास रचला आहे. हा विजय कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाचा परिणाम आहे.'' असं म्हणत मोदींनी पक्षाचे कार्यकर्ते, नेते आणि जनतेचे आभार मानले.

#ElectionWithSakal

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.