देशातील घुसखोरांमुळे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात
esakal October 09, 2024 07:45 AM

पिंपरी, ता. ८ ः ‘‘देशात सद्यःस्थितीला घुसखोरांची संख्या सहा कोटींपेक्षा जास्त आहे. त्यामुळे, राष्ट्रीय सुरक्षा, एकता, अखंडता धोक्यात आहे. याला व्यवस्थेतील भ्रष्टाचार हे मूळ कारण आहे. हे रोखण्यासाठी देशात पुरेसे कायदे आहेत. परंतु त्याची कडकपणे अंमलबजावणी होत नाही. आता सर्वसामान्य नागरिकांनीच लोकप्रतिनिधींवर दबाव निर्माण करून देशातील शिक्षण व कायदा व्यवस्था बदलण्यासाठी काम केले पाहिजे, असे आवाहन सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. अश्विनीकुमार उपाध्याय यांनी केले.
हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानच्यावतीने नवरात्रोत्सव व विजयादशमीनिमित्त, चिंचवड येथे हिंदू शौर्य दिन- विराट हिंदू मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला डॉ. संजय उपाध्ये, कृष्णकुमार गोयल, राजाभाऊ गोलांडे, उत्तम दंडीमे, कैलास बारणे, दत्तात्रेय सूर्यवंशी, अतुल आचार्य, कुमार जाधव, नामदेव शिंत्रे, विजय गुंजाळ, दिगंबर रिद्धीवाडे, मनोज बोरसे, शिवाजी रेड्डी, मनोज गोबे, दिलीप कुलकर्णी, रमेश अर्धाले आदी उपस्थित होते.
ॲड. उपाध्याय म्हणाले,‘‘भारताला इंग्रज, मुघलांनी लुटले नाही; एवढे भ्रष्टाचाऱ्यांनी लुटले आहे. त्यांना शिक्षा होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. भ्रष्टाचार, धर्मांतर, जनसंख्येचा विस्फोट, युवकांमध्ये व्यसनाधीनता आणि अश्लीलता यामुळे देश आतून पोखरला जात आहे. सर्वसामान्य नागरिकांनी पुढाऱ्यांच्या आश्वासनांना बळी न पडता शिक्षण आणि कायदा व्यवस्थेत बदल करण्यासाठी सरकारवर दबाव निर्माण केला पाहिजे.’’
यावेळी स्व. संजय आर्य स्मृती दिनानिमित्त आद्य पत्रकार देवर्षी नारद राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर यांना आणि स्व. प्रा. एकनाथजी नाणेकर स्मृती समाजभूषण पुरस्कार शिरीष महाराज मोरे यांना प्रदान करण्यात आला. तत्पूर्वी, संस्थेचे संस्थापक पंडित धर्मवीर आर्य आणि हरिकृष्ण वाफता यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कृष्णकुमार गोयल यांनी स्वागत केले. उत्तम दंडीमे यांनी प्रास्ताविक व मानपत्राचे वाचन केले. सुहास पोफळे यांनी आभार मानले.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.