शाहूनगरमध्ये कोल्हापूरच्या महालक्ष्मीची प्रतिकृती
esakal October 09, 2024 07:45 AM

पिंपरी, ता. ८ ः कोल्हापूरमधील श्री महालक्ष्मी मंदिर हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे. म्हणूनच शहरात स्थायिक झालेल्या कोल्हापूर, सांगली आणि सातारावासीयांनी शाहूनगर भागात साधारणतः २० वर्षांपूर्वी श्री महालक्ष्मी देवीची स्थापना केली. कोल्हापूरच्या महालक्ष्मीची प्रतिकृती मंदिरात बसविण्यात आली. मुख्य महालक्ष्मी मंदिर, गाभारा, मंडप व कळस अशा क्रमाने त्याचे बांधकाम झाले. मंदिरात शंकराची पिंड आहे. कालांतराने २०१० मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. शाहूनगरची ग्रामदेवता अशी या महालक्ष्मीची ओळख निर्माण झाली आहे. कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या मंदिराच्या पश्चिम प्रवेशद्वाराची प्रतिकृती आणि दीपमाळेचे बांधकाम करण्यात आले असून हे यंदाचे वैशिष्ट ठरत आहे.
मंदिरात संगमरवरी दगडाची चतुर्भुजा देवीची मूर्ती आहे. वरील दोन भुजांमध्ये कमलफूल आहे. एका हाताने देवी आशीर्वाद देत आहे आणि दुसऱ्या एका हाताने धनप्राप्तीचे वरदान देत आहे. अडीच ते तीन फूट आकाराची देवीची मूर्ती कमलावर बसलेली आहे. गळ्यात मंगळसूत्र, चांदीचा मुकुट आणि हार आहे. नाकात सोन्याची नथ असा शृंगार आहे. यंदा मंदिरात ‘केदारनाथ दर्शन’ असा देखावा केला आहे.

नवचंडी होमहवन
धर्मवीर संभाजीराजे मंच संचलित श्री महालक्ष्मी मंदिर येथे शाहूनगरची ग्रामदेवता श्री महालक्ष्मीचा नऊ दिवसांचा जागर म्हणजेच नवरात्र उत्सव साजरा केला जातो. घटस्थापना झाल्यावर मंदिरामध्ये दररोज वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम होत असतात. दर दिवशी वेगवेगळी भजनी मंडळे भजनाचा कार्यक्रम करतात. सकाळी साडेसहा वाजता महिलांचे सामुदायिक श्रीसूक्त पठण झाले. त्यामध्ये २५० महिलांनी सहभाग घेतला. त्याचबरोबर पुरुषांचे दुर्गा सप्तशती वाचन झाले. त्यानंतर, नवचंडी होमहवन करण्यात आले आहे.

कोल्हापुरी पद्धतीने सोने लुटण्याचा कार्यक्रम
विजयादशमीला सायंकाळी पाच वाजता ढोल-ताशांच्या गजरांमध्ये महालक्ष्मी मंदिरामधून देवीची पालखीची मिरवणूक निघते. कोल्हापुरी पद्धतीने तेथे सोनं लुटण्याचा कार्यक्रम केला जातो. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी मंडळाचे संस्थापक संजय पाटील, अध्यक्ष पांडुरंग पाटील, सचिव राजेंद्र भागवत, खजिनदार अनिल पाटील, उत्सव समितीचे अध्यक्ष हर्षल मुळूक आणि मंडळाचे सर्व पदाधिकारी यांचा सहभाग आहे.
(शब्दांकन - आशा साळवी)

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.