Vidhansabha Election : पश्चिम महाराष्ट्रातील चार जिल्ह्यातील १३४ इच्छुकांनी दिली मुलाखत
esakal October 09, 2024 05:45 AM

पुणे - राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून पश्चिम महाराष्ट्रातील चार ते पाच जिल्ह्यांमधील इच्छुकांच्या मंगळवारी मुलाखती पार पडल्या. सातारा, सांगली, कोल्हापुर, सोलापुर या चार जिल्ह्यांसह पिंपरी चिंचवड शहर अशा ४० मतदारसंघातील सुमारे १३४ इच्छुकांनी मुलाखतीसाठी हजेरी लावली. आजी-माजी आमदार, जुने-नवे चेहरे, वादग्रस्त पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांसह सेना-भाजपशी संबंधीत काही नेत्यांचाही मुलाखत देणाऱ्यांमध्ये समावेश होता.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मागील काही दिवसांपासुन पुण्यात उमेदवारांच्या मुलाखतींचा सपाटा लावण्यात आला आहे. विदर्भ-मराठवाड्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती मागील तीन दिवसात संपन्न झाल्या.

त्यानंतर मंगळवारी पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापुर, सोलापुर या चार जिल्ह्यांमधील इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, पक्षाच्या संसदीय मंडळातील सदस्य व संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष यांच्या उपस्थितीत मुलाखतीचा कार्यक्रम झाला. यावेळी पक्षाचे आजी-माजी आमदार, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, जिल्हाध्यक्षांसह विविध पदांवरील, तरुण व जुन्यांसह नव्या चेहऱ्यांनी मुलाखतीसाठी गर्दी केली होती.

कोल्हापुरमधुन समरजीत घाडगे यांच्यासह काही जणांनी मुलाखतीसाठी हजेरी लावली. तर, सांगली येथुन आर.आर.पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील, मुलगा रोहित पाटील यांच्यासह मानसिंग नाईक, बाळासाहेब पाटील आदींच्या मुलाखती झाल्या.

सोलापुर जिल्ह्यातुन माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे नातु अनिकेत देशमुख, बाबासाहेब देशमुख, भारत भालके यांचा मुलगा भगीरथ भालके, करमाळ्याचे नारायण पाटील, धनराज शिंदे यांच्या मुलाखती झाल्या. दरम्यान, माढ्यासाठी अभिजीत पाटील, शिवसेनेचे नेते व आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा पुतण्या अनिल सावंत, माजी आमदार व अण्णाभाऊ साठे आर्थिक महामंडळ घोटाळ्याप्रकरणी तुरूंगवास झालेले माजी आमदार रमेश कदम यांनीही मुलाखतीसाठी हजेरी लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

साताऱ्यामध्ये फलटणमधुन इच्छुकांची संख्या सर्वाधिक होती. त्यामध्ये बाळासाहेब पाटील, प्रभाकर देशमुख, शशिकांत शिंदे, अनिल देसाई, लक्ष्मण माने, अभय वाघमारे, अमोल आवळे, बुवासाहेब हुंबरे, डॉ. अनिल जगताप, डॉ. राजेंद्र काकडे, डॉ.बाळासाहेब कांबळे आदी १६ जणांनी मुलाखती दिल्या. वाईमधुन दत्तात्रय ढमाळ, अनिल जगताप, डॉ.नितीन सावंत, रमेश धायगुडे यांनी, तर कोरेगावमधुन शशिकांत शिंदे यांनी मुलाखत दिली.

माणसाठी अभयसिंह जगताप, प्रभाकर घार्गे, सुर्यकांत राऊत यांनी, कराड उत्तर मधुन बाळासाहेब पाटील, कराड दक्षिणेतुन सविनय कांबळे, पाटणमधुन सत्यजीत पाटणकर, सातारा-जावलीमधुन शफीक शेख, दीपक पवार, अमित कदम यांनी मुलाखती दिल्या आहेत.

मुलाखतीच्या अखेरच्या टप्प्यात पिंपरी चिंचवडमधुन अजित गव्हाणे, सुलक्षणा शिलवंत, राहुल कामठे यांनी मुलाखत कार्यक्रमात सहभाग नोंदविला. इच्छुक उमेदवारांनी कोणती कामे केली आहेत? त्यांचा जनसंपर्क किती आहे? त्यांनी कोणाला व किती मताधिक्य मिळवुन दिले? वैयक्तीक स्वरुपाचे कोणते व किती कार्यक्रम घेतले? उमेदवारी मिळाल्यास निवडुन येण्यासाठी कसे प्रयत्न करणार? या स्वरुपाचे प्रश्न उमेदवारांना विचारण्यात आले.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.