सण-उत्सवात कुटुंबापेक्षा ड्युटीलाच प्राधान्य! सर्वांनी आनंदात सण साजरे करावेत म्हणून जनतेच्या सुरक्षिततेसाठी पोलिस रस्त्यावर; महिला पोलिस अधिकारी म्हणतात...
esakal October 09, 2024 01:45 PM

सोलापूर : महिला पोलिसांना आठ तासांची ड्यूटी करण्याचा निर्णय जुनाच, पण कमी मनुष्यबळ व सततच्या बंदोबस्तामुळे या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची स्थिती आहे. तरीसुद्धा पहिल्यांदा ड्यूटी आणि राहिलेला वेळ कुटुंबासाठी, अशी दिनचर्या त्यांची आहे. घरी पत्नी, बहीण, आई, सून अशा विविध आघाड्यांवर त्यांना काम करावे लागते. वरिष्ठांचे पाठबळ व कुटुंबाची साथ असल्याने महिला पोलिस अधिकारी, अंमलदार सक्षमपणे कर्तव्य बजावत आहेत.

सध्या गणेशोत्सवात बंदोबस्ताची ड्यूटी केल्यानंतर आता नवरात्रोत्सवातील बंदोबस्ताची ड्यूटी सुरु आहे. त्यातच आगामी काही दिवसांत विधानसभेची निवडणूक होणार असल्याने त्यासाठी देखील पोलिस अधिकारी व अंमलदारांना सतत घराबाहेर बंदोबस्तासाठी राहावे लागते. निवडणुकीच्या निमित्ताने विविध व्हीव्हीआयपी, व्हीआयपी नेत्यांचे दौरे असतात. त्यावेळी पण नियमित काम सांभाळून बंदोबस्ताची ड्यूटी करावी लागते. अशावेळी कुटुंबाकडे विशेषतः मुलांकडे, त्यांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होते. ज्यावेळी सर्व पालक मुलांसोबत सण-उत्सव साजरा करतात, त्याचवेळी बंदोबस्तावरील पोलिस पालकांची मुले घरी एकटीच असतात. तरीदेखील कोणतेही गाऱ्हाणे न मांडता प्रामाणिकपणे या नवदुर्गा कर्तव्य बजावतात, हे विशेष.

आमच्यासाठी कर्म हीच पुजा; सर्वांनी कुटुंबासमवेतच साजरे करावेत सण- उत्सव

पोलिस दलातील अंमलदार, अधिकाऱ्यांसाठी कर्म हीच पूजा असते. सण-उत्सव साजरा करण्यापेक्षा तो साजरा करणाऱ्यांची सुरक्षितता आमच्यासाठी महत्त्वाची असते. कुटुंब व नोकरी या दोन्ही बाबी सांभाळताना कसरत होते ही वस्तुस्थिती आहे. कर्तव्य पार पाडताना कुटुंबापेक्षा सामाजिक जबाबदारीला प्राधान्य द्यावे लागते. प्रत्येकांनी कुटुंबासोबतच सण-उत्सव साजरा करणे हाच त्यामागील उद्देश आहे. तसे झाल्यास निश्चितपणे सर्वांनाच त्याप्रमाणे आनंद घेता येईल.

- डॉ. दीपाली काळे, पोलिस उपायुक्त, सोलापूर शहर

-------------------------------------------------------------------------------------------------

ड्युटीला पहिले प्राधान्य, उरलेला वेळ आपला स्वत:चा

पोलिस अंमलदार, अधिकाऱ्यांची लाइफ स्टाइल खूपच वेगळी असते, इतरांप्रमाणे त्यांना सर्वकाही गोष्टींचा आनंद घेता येत नाही. जनतेसाठी पोलिसांना ड्युटीला प्राधान्य देऊन शिल्लक राहिलेला वेळ स्वत:साठी व कुटुंबासाठी द्यावा लागतो. त्यातही सर्वजण आनंदी राहून प्रामाणिक कर्तव्य बजावतात आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही त्यांना सपोर्ट असतो हे कौतुकास्पद आहे.

- संजिवनी व्हट्टे, पोलिस उपनिरीक्षक

---------------------------------------------------------------------------

आमच्यामुळे सर्वजण आनंदाने सण-उत्सव साजरा करतात याचे समाधान

कुटुंब सांभाळून नोकरी करताना सर्वांनाच तारेवरील कसरत करावी लागते. कुटुंबासोबत सण-उत्सव साजरा करता येत नाही याचे दुःख निश्चित आहे, पण आम्ही रस्त्यावर बंदोबस्तासाठी असतो म्हणून सर्व जनता आनंदाने सुरक्षित वातावरणात सण- उत्सव साजरा करू शकते, याचे समाधान वाटते. नोकरी स्वीकारल्यानंतर कुटुंबापेक्षा ड्युटीलाच प्राधान्य द्यावे लागते.

- सविता मोरे पाटील, सहायक पोलिस निरीक्षक

---------------------------------------------------------------------------------

कुटुंबापेक्षा ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’लाच प्राधान्य

‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’नुसार समाज हेच आमचे कुटुंब समजून आम्ही सर्वजण कर्तव्य बजावतो. सण- उत्सवात रस्त्यावर उभारून बंदोबस्ताची ड्यूटी करतो, त्यावेळी आम्ही समाजासोबत उत्सव साजरा करतो. नोकरी करताना कुटुंबात नेहमीच विविध भूमिका पार पाडाव्या लागतात, त्यावेळी तारेवरील कसरत करावी लागते. सण- उत्सवात कुटुंबासोबत असावे असे नेहमीच वाटते, पण सामाजिक शांतता व सुव्यवस्थेला आमचे प्राधान्य असते.

- अनिता जाधव, सहायक पोलिस उपनिरीक्षक

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.