IND vs BAN: दुसऱ्या T20I साठी टीम इंडियाच्या प्लेइंग-11 मध्ये सूर्यकुमार-गंभीर बदल करणार? जाणून घ्या कोणाला मिळू शकते संधी
esakal October 09, 2024 01:45 PM

India vs Bangladesh T20I: भारत विरुद्ध बांगलादेश संघात सध्या टी२० मालिका सुरू आहे. या मालिकेतील ग्वाल्हेरला झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने ७ विकेट्सने विजय मिळवला. आता दुसरा सामना दिल्लीमध्ये बुधवारी (९ ऑक्टोबर) खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.०० वाजता चालू होईल.

भारती संघाने पहिला सामना जिंकून मालिकेत आघाडी घेतली आहे. आता दुसरा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याची संधी भारताला आहे. दरम्यान, या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केले जाणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पहिल्या सामन्यात भारताकडून नितीश रेड्डी आणि मयंक यादवचे पदार्पण झाले होते. दरम्यान, दुसऱ्या सामन्यात तरी विजयी संमिश्रण बदलण्याचा विचार सध्या भारतीय संघव्यवस्थापनाचा नसेल.

त्यामुळे दुसऱ्या सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल दिसण्याची शक्यता कमी आहे. जर भारताने दुसरा टी२० सामना जिंकला, तर कदाचीत तिसऱ्या सामन्यात बदल दिसू शकतात.

दुसऱ्या सामन्यासाठीही सलामीला संजू सॅमसनसह अभिषेक शर्मा येऊ शकतो. तसेच कर्णधार सू्र्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर खेळताना दिसू शकतो. मधल्या षटकांमध्ये नितीश रेड्डीसह अष्टपैलू हार्दिक पांड्या खेळताना दिसू शकतो.

त्याचबरोबर त्यांना रियान पराग आणि रिंकु सिंग यांची साथ मिळू शकते. वॉशिंग्टन सुंदरही संघात कायम राहू शकतो. तो फिरकी गोलंदाजीबरोबरच तळात फलंदाजीतही महत्त्वाचे योगदान देऊ शकतो.

पहिल्या सामन्यात भारताकडून आक्रमक फंलंदाजी पाहायला मिळाली होती. त्यामुळे दुसऱ्या सामन्यातही तशीच फलंदाजी पाहायला मिळणार याची औत्सुकता असेल.

गोलंदाजीत पहिल्या सामन्यात शानदार कामगिरी केलेल्या वरुण चक्रवर्तीवर दुसऱ्या सामन्यातही लक्ष असेल. तसेच त्याच्याबरोबर मयंक यादव आणि अर्शदीप सिंग हे वेगवान गोलंदाजही प्लेइंग इलेव्हनमध्ये कायम असू शकतात.

दिल्लीमधील एकमेव पराभव

दरम्यान, भारताने बांगलादेशविरुद्ध दिल्लीत अखेरचा टी२० सामना २०१९ मध्ये खेळलेला. या सामन्यात भारताला बांगलादेशने पराभूत केलं होतं.

हा एकमेव पराभव भारताने आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये बांगलादेशविरुद्ध स्वीकारलेला आहे. त्यामुळे आता बुधवारी होणाऱ्या सामन्यावर सर्वांचे लक्ष असेल.

दुसऱ्या सामन्यासाठी भारताची संभावित प्लेइंग-११

संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव, नितीश कुमार रेड्डी, हार्दिक पांड्या, रियान पराग, रिंकु सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, मयंक यादव.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.