Loan Pre Closure Charge: सणासुदीत RBI चं मोठं गिफ्ट! वेळेआधी कर्जाची परतफेड केल्यास लागणार नाही अतिरिक्त शुल्क
Times Now Marathi October 09, 2024 11:45 PM

Loan Pre-Closure Charge : बँकिंग क्षेत्र नियामक RBI ने सणासुदीच्या काळात कर्ज घेणाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. बँका, गृहनिर्माण वित्त कंपन्या आणि एनबीएफसी (NBFC) कडून कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना दसरा आणि दिवाळीआधी मोठी भेट दिली आहे. कर्जदारांचे हित लक्षात घेऊन आरबीआयने फ्लोटिंग रेट टर्म लोन बंद करण्यासाठी फोरक्लोजर चार्जेस किंवा प्री-पेमेंट दंड रद्द केला आहे. फ्लोटिंग रेटवर कर्ज घेणाऱ्या ग्राहकांसाठी हा अतिशय दिलासादायक निर्णय आहे.

आरबीआयच्या या निर्णयामुळे आता बँका किंवा एनबीएफसी फ्लोटिंग रेट लोन बंद करण्यासाठी कर्ज घेणाऱ्या ग्राहकांकडून दंड किंवा क्लोजर चार्जेस आकारू शकणार नाहीत. यामुळे ग्राहकांना कर्ज वेळेआधी बंद करण्यासाठी द्यावे लागणारे शुल्क आता द्यावे लागणार नाही. या निर्णयामुळे सूक्ष्म आणि लघु उद्योगांना दिलेल्या फ्लोटिंग रेट मुदत कर्जावर देखील बँका आणि NBFC फोरक्लोजर चार्जेस किंवा प्री-पेमेंट दंड आकारू शकणार नाहीत.




काय म्हणाले गव्हर्नर शक्तिकांत दास?
आरबीआयच्या पतधोरण बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती देताना गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, "गेल्या अनेक वर्षांत रिझर्व्ह बँकेने ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. या अंतर्गत बँक किंवा एनबीएफसीला व्यवसायाव्यतिरिक्त वैयक्तिक श्रेणी अंतर्गत फ्लोटिंग रेट मुदत कर्ज घेणाऱ्या कर्जदारांकडून कर्ज बंद करण्यासाठी फोरक्लोजर चार्जेस किंवा प्री-पेमेंट दंड वसूल करण्याची परवानगी नाही". याचा अर्थ असा की आता बँका किंवा NBFC अशा कर्जावर ग्राहकांकडून फोरक्लोजर शुल्क आकारू शकणार नाहीत.




फ्लोटिंग रेट कर्ज म्हणजे काय?
बँका कर्जाचे व्याजदर फ्लोटिंग रेट लोन आणि फिक्स रेट लोन या दोन प्रकारे ठरवतात. फ्लोटिंग रेट लोन बेंचमार्क दरावर आधारित असते. उदाहरणार्थ, जेव्हा जेव्हा RBI त्यांचे धोरण दर बदलते, तेव्हा बँका फ्लोटिंग रेट कर्जावरील व्याजदर देखील वाढवतात. तसेच आरबीआयने रेपो रेटमध्ये कपात केली तर बँका कर्जावरील व्याजदर कमी करतात. परंतु फिक्स रेट लोनवरील व्याजदर स्थिर असतात. या प्रकारच्या कर्जावर कर्ज घेताना ठरवलेले व्याजदर कर्जाची मुदत संपेपर्यंत सारखेच राहतात. आता RBI ने बँका आणि NBFC सूक्ष्म आणि लघु उद्योगांना दिलेल्या फ्लोटिंग रेट मुदत कर्जाच्या मुदतपूर्व परतफेडीसाठी फोरक्लोजर चार्जेस किंवा प्री-पेमेंट दंड आकारू शकणार नाहीत.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.