T20 World Cup 2024 : स्मृती मंधानाला अखेर सूर गवसला, श्रीलंकेविरुद्ध 38 चेंडूत अर्धशतकी खेळी
GH News October 10, 2024 12:10 AM

वुमन्स टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेच्या 12व्या सामन्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात सामना होत आहे. साखळी फेरीतील दोन्ही संघांचा हा तिसरा सामना आहे. हा सामना स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी दोन्ही संघांची धडपड सुरु आहे. भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून शफाली वर्मा आणि डावखुरी स्मृती मंधाना ही जोडी मैदानात उतरली. या जोडीने संघाला आश्वासक सुरुवात करून दिली. दोघांनी आक्रमक पण सावध खेळी केली. 13 षटकापर्यंत ही जोडी तग धरून होती. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 98 धावांची भागीदारी केली. स्मृती मंधाना धाव घेताना फसली आणि विकेट देऊन बसली. पण तिथपर्यंत स्मृती मंधानाने आपली भूमिका बजावली होती. तिने 38 चेंडूत 4 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 50 धावा केल्या. तिच्या या खेळीमुळे भारताला मोठी धावसंख्या उभारण्यास मदत झाली.त्यानंतर शफाली 43 धावांवर असताना चमारी अटापट्टूच्या गोलंदाजीवर बाद झाली.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताकडून स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा यांची चौथी सर्वाधिक धावांची भागीदारी ठरली. 2018 टी20 वर्ल्डकपमध्ये हरमनप्रीत कौर आमि जेमिमाह रॉड्रिग्स यांनी न्यूझीलंडविरुद्ध 134 धावांची भागीदारी केली होती. मिताली राज आणि पुनम राऊत यानी 2014 टी20 वर्ल्डकपमध्ये 117 धावांची भागीदारी केली होती. 2014 मध्ये मिताली राज आणि हरमनप्रीत कौर यांच्यात 107 धावांची भागीदारी झाली होती. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये स्मृती मंधाना आणि शफाली वर्माने 98 धावांची भागीदारी केली आहे. पाचव्या क्रमांकावर मिताली राज आणि सुलक्षणा नाईक यांच्यातील भागीदारी राहिली. श्रीलंकेविरुद्ध 2010 मध्ये 86 धावांची भागीदारी केली होती.

दरम्यान, स्मृती मंधाना बाद झाल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरचा शो पाहायला मिळाला. हरमनप्रीतने दोन सामन्यातील राग काढला असं म्हणायला हरकत नाही. हरमनप्रीत कौरने 27 चेंडूत 52 धावा केल्या. यात तिने 8 चौकार आणि षटकार मारला. अर्धशतकी खेळी करताना तिचा स्ट्राईक रेट हा 192.59 इतका होता.  भारताने 20 षटकात 3 गडी गमवून 172 धावा केल्या आणि विजयासाठी 173 धावांचं आव्हान दिलं आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.