PAK vs ENG: इंग्लंडची कसोटी क्रिकेटमधील चौथी सर्वोच्च धावसंख्या, पहिला डाव 823 वर घोषित, पाकिस्तान विरुद्ध 267 धावांची आघाडी
GH News October 10, 2024 07:14 PM

इंग्लंड क्रिकेट टीमने पाकिस्तान विरूद्धच्या पहिल्या कसोटीत विक्रम केला आहे. इंग्लंडने कसोटी क्रिकेट इतिहासातील चौथी सर्वात मोठी धावसंख्या केली आहे. इंग्लंडने चौथ्या दिवशी पहिला डाव हा 7 बाद 823 धावांवर घोषित केला. याआधी कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 3 वेळा सर्वात मोठी धावसंख्या करण्यात आली आहे. तसेच दोन्ही संघांची एका कसोटीतील ही तिसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. पाकिस्तान आणि इंग्लंड या दोन्ही संघांनी पहिल्या डावात मिळून एकूण 1 हजार 379 धावा केल्या. इंग्लंडकडून हॅरी ब्रक आणि जो रुट या दोघांनी सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. हॅरी ब्रूक याने सर्वाधिक 317 धावा केल्या. हॅरी ब्रूक इंग्लंडसाठी त्रिशतक करणारा सहावा फलंदाज ठरला. तर जो रुटने 262 धावांची खेळी केली. इंग्लंडकडून या दोघांव्यतिरिक्त झॅक क्रॉली याने 78 धावांचं योगदान दिलं. कॅप्टन ओली पोप याला भोपळाही फोडता आला नाही. बेन डकेटने 84 धावा केल्या. इंग्लंडने यासह 267 धावांची आघाडी घेतली आहे.

कसोटी क्रिकेटमधील एका संघाची सर्वाधिक धावसंख्या

  • श्रीलंका, 6 बाद 952, 1997
  • इंग्लंड, 7 बाद 903, 1938
  • इंग्लंड, सर्वबाद 849, 1930
  • इंग्लंड, 7 बाद 823, 2024

कसोटीतील पहिल्या डावातील दोन्ही संघांच्या एकूण धावा

  • इंडिया-श्रीलंका, 1 हजार 489 धावा, 1997
  • पाकिस्तान-श्रीलंका, 1 हजार 409 धावा, 2009
  • पाकिस्तान-इंग्लंड, 1 हजार 379 धावा, 2024
  • विंडिज-इंग्लंड, 1 हजार 349 धावा, 2009
  • श्रीलंका-भारत, 1 हजार 349 धावा, 2009

पाकिस्तानने त्याआधी पहिल्या डावात सर्वबाद 556 धावा केल्या. पाकिस्तानकडून अब्दुल्ला शफीक 102 आणि आघा सलमान याने नाबाद 104 धावांची शतकी खेळी केली. तर कॅप्टन शान मसूद याने 151 धावा केल्या. सौद शकील याने 82, नसीम शाह 33, बाबर आझम 30 आणि शाहिन अफ्रीदी याने 26 धावांचं योगदान दिल. इंग्लंडकडून जॅक लीच याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. गस एटकीन्सन आणि ब्रायडन कार्स या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर ख्रिस वोक्स, शोएब बशीर आणि जो रुट या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : शान मसूद (कॅप्टन), सॅम अयुब, अब्दुल्ला शफीक, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, आमेर जमाल, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि अबरार अहमद.

इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : ऑली पोप (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, गस एटकिन्सन, ब्रायडन कार्स, जॅक लीच आणि शोएब बशीर.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.