परदेशात पाठवा दिवाळी फराळ
esakal October 10, 2024 08:45 PM

पिंपरी, ता. १० ः दिवाळी म्हटले की गोडधोड पदार्थ, फराळाची मजा काही औरच. अशावेळी परदेशात वसलेल्या महाराष्ट्रीयन अथवा भारतीय नागरिकांना फराळाची प्रामुख्याने आठवण होत असते. अशा नागरिकांना पोस्ट विभागाने विशेष सुविधा उपलब्ध करून दिली असून, जगाच्या पाठीवर पिंपरी-चिंचवड शहर टपाल कार्यालयातून फराळ पाठवता येणार आहे. नातेवाइकांना लाडू, चिवडा, चकल्या, करंज्या यांची चव थेट विदेशात चाखता येणार आहे.
शहरातील बरेच उच्चशिक्षित तरुण-तरुणी जगातील विविध देशांत कार्यरत आहेत. त्यांच्यापर्यंत दिवाळीचा फराळ कसा पाठवायचा, हा मोठा प्रश्न त्यांच्या पालकांसमोर असतो. याचे उत्तर पुणे डाक विभागाने शोधून काढले आहे. टपाल विभागाने यासाठी एक महत्त्वपूर्ण सुविधा पुणे शहरांमध्ये उपलब्ध करून दिली आहे.

माफक दरात सुविधा
काही खास टपाल कार्यालयात फराळाचे वाजवी दरात सुरक्षित पॅकेजिंग आणि विशेष बुकिंग काऊंटर सुविधा उपलब्ध करून दिली आहे. डाक विभागाच्या स्पीड पोस्ट, रजिस्टर पोस्ट या विविध आंतरराष्ट्रीय मेल सेवा उपलब्ध असून, या सेवांचे दर खासगी कुरिअर कंपन्यांच्या दरापेक्षा बरेच कमी आहेत. सोबतच जलद सेवा आणि डाक विभागाची विश्वसनीयता ही डाक विभागाच्या सेवेची वैशिष्ट्ये आहेत.

‘या’ टपाल कार्यालयात सेवा उपलब्ध
- चिंचवड ईस्ट कार्यालय
- एन.आय.बी.एम कार्यालय
- चिंचवडगाव कार्यालय
- आयटी पार्क हिंजवडी कार्यालय
- पिंपरी पीएफ कार्यालय
- औंध कॅम्प कार्यालय
- पी.सी.एन.टी. कार्यालय

‘‘भारतीय डाक विभाग नेहमीच जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध असतो. डाक विभागाच्या आंतरराष्ट्रीय मेल सेवांचे दर इतर खासगी सेवांपेक्षा कमी आहेत. जगभरातील आपल्या प्रियजनांना दिवाळीचा फराळ पाठवण्यासाठी डाक विभागाच्या सेवेचा नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करावा.’’
- के. एस. पारखी, जनसंपर्क निरीक्षक चिंचवड टपाल कार्यालय

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.