Ratan Tata Ex Girlfriend: 'ते म्हणतात तू निघून गेलास...'; एक्स गर्लफ्रेंडला रतन टाटांच्या निधनाने धक्का, लिहिली अश्रू ढाळणारी पोस्ट
esakal October 10, 2024 09:45 PM

Simi Garewal on Ratan Tata's Passing: देशभरात रतन टाटा यांच्या आकस्मिक निधनाने शोककळा पसरली आहे. 86 वर्षांच्या वयात आपल्यातून निघून गेलेल्या रतन टाटा यांनी आपल्या कामाने आणि समाजात बदल घडवण्याच्या प्रयत्नांमुळे लाखो लोकांच्या हृदयाला स्पर्श केला. त्यांचं निधन ही देशासाठी मोठी हानी असून, त्यांनी आयुष्यभर केलेलं योगदान अविस्मरणीय आहे. सध्या देश दुर्गा पूजेच्या तयारीत असताना, आपण आपल्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला गमावलं आहे.

रतन टाटा यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांसह अनेक नामवंत व्यक्ती भावूक झाल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे त्यांची जुनी मैत्रीण आणि एक्स गर्लफ्रेंड, दिग्गज अभिनेत्री सिमी गरेवाल. रतन टाटा यांचं निधन सिमी यांच्यासाठी देखील धक्कादायक ठरलं. त्यांनी सोशल मीडियावर रतन टाटा यांच्यासाठी एक भावुक पोस्ट शेअर केली, ज्यामुळे अनेकांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले.

सिमी गरेवाल यांनी रतन टाटा यांना दिला अंतिम निरोप

रतन टाटा यांच्या निधनाची बातमी येताच जगभरातील लोकांनी सोशल मीडियावरून त्यांना श्रद्धांजली वाहिली. या शोकात सहभागी होत सिमी गरेवाल यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक हृदयस्पर्शी पोस्ट लिहिली. त्यांनी लिहिलं, "ते म्हणतात की तू निघून गेलास... तुझं जाणं सहन करणं खूपच अवघड आहे... अलविदा माझ्या मित्रा... रतन टाटा." या शब्दांतून त्यांनी आपल्या जुनी मैत्री आणि भावना व्यक्त केल्या आहेत.

सिमी आणि रतन टाटा यांचा जुना इतिहास-

२०११ साली टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सिमी गरेवाल यांना रतन टाटा यांच्याशी असलेल्या नात्याबद्दल विचारण्यात आलं होतं. त्यावेळी सिमी यांनी स्पष्टपणे मान्य केलं होतं की त्यांचं आणि रतन टाटा यांचं जुने संबंध होते. त्यांनी रतन टाटा यांचं कौतुक करत म्हटलं होतं, "रतन एक परिपूर्ण व्यक्तीमत्व होते, त्यांच्यात विनोदबुद्धी आणि नम्रता होती. ते एक परफेक्ट जेंटलमॅन होते. पैसा कधीही त्यांच्या जीवनाचं उद्दिष्ट नव्हतं."

१० ऑक्टोबर २०२४: रतन टाटा यांचा शेवटचा श्वास-

रतन टाटा यांचं निधन १० ऑक्टोबर २०२४ रोजी झालं. काही दिवसांपूर्वी त्यांच्या प्रकृतीबद्दल अफवा पसरल्या होत्या, ज्यावर त्यांनी स्पष्टीकरण देतं, हे केवळ नियमित वैद्यकीय तपासणी असल्याचं सांगितलं होतं. मात्र, त्यांच्या प्रकृतीचा अचानक बिघाड झाल्यानंतर मुंबईतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यावेळी ते अतिदक्षता विभागात दाखल होते. त्यांच्या निधनामुळे देशभरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.