छत्रपती शिवरायांशी कोणाचीच तुलना होऊ शकत नाही, पण...; राज ठाकरेंनी सांगितली रतन टाटांबाबतची आठवण
esakal October 10, 2024 10:45 PM

रतन टाटा यांच्या निधनाने भारताने एक महान उद्योजक गमावला आहे. बुधवारी रात्री त्यांच्या निधनामुळे देशभरात शोककळा पसरली आहे. याच निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रतन टाटा यांच्याशी संबंधित काही खास आठवणी शेअर केल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांशी कोणाचीच तुलना होऊ शकत नाही, पण समर्थ रामदास स्वामींनी महाराजांना दिलेलं 'श्रीमंत योगी' हे वर्णन रतन टाटांबाबत खूप अचूक ठरते, असं राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरेंच्या आठवणी आणि आदरभाव

राज ठाकरे यांनी रतन टाटांसोबतच्या आपल्या जिव्हाळ्याच्या संबंधांबद्दल सांगितले. त्यांनी सांगितलं की, टाटा समूहाच्या अध्यक्षपदावर रतन टाटा आले तेव्हा भारतातील उद्योगधंद्यांच्या स्थितीत खूप मोठे बदल सुरू होते. स्वातंत्र्यानंतर 'लायसन्स राज'ने भारतीय उद्योगाच्या विकासावर मर्यादा आणल्या होत्या, आणि त्यातून मुक्त होत असताना रतन टाटांनी आपल्या नेतृत्वाने टाटा समूहाला जागतिक बाजारपेठेत मानाचे स्थान मिळवून दिले.

समाजसेवेची आवड

रतन टाटांची आणखी एक विशेष आठवण म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नाशिकमधील 'बोटॅनिकल उद्यान' प्रकल्पासाठी त्यांनी दिलेला महत्त्वपूर्ण आर्थिक हातभार. सुरुवातीला मंजूर झालेला निधी कमी पडत होता, परंतु रतन टाटांनी कामाचा आवाका पाहून निधी पुरवण्यात कोणतीही कुचराई केली नाही. हे काम पूर्ण झाल्यावर ते स्वतः नाशिकला येऊन उद्यानाचे उद्घाटन पाहण्यासही आले होते, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

श्वानप्रेम आणि माणुसकीची ओळख

रतन टाटांची श्वानप्रेमाची खासियतही राज ठाकरे यांनी अधोरेखित केली. ते त्यांच्या श्वानांवर अपार प्रेम करायचे. टाटा समूहाच्या मुख्यालयाबाहेर भटक्या श्वानांची देखील उत्तम काळजी घेतली जायची. एकदा रतन टाटा यांचा सन्मान लंडनमधील बकिंगहॅम राजवाड्यात होणार होता, पण त्यांच्या श्वानाच्या आजारामुळे त्यांनी तो समारंभ रद्द केला. ही गोष्ट त्यांच्या माणुसकीची आणि सजीवांबद्दलच्या संवेदनशीलतेची साक्ष देणारी आहे.

श्रीमंत योगीची उपमा

राज ठाकरे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांशी या जगात कोणाचीच तुलना होऊ शकत नाही. पण समर्थ रामदास स्वामींनी महाराजांचं वर्णन जसं अचूक केलं आहे तसं इतर कुठे आढळत नाही. त्यात त्यांनी महाराजांना 'श्रीमंत योगी' म्हणलं आहे, रतन टाटांबद्दल विचार करताना, 'श्रीमंत योगी' ही उपमा तंतोतंत पटते. पण श्रीमंत असून देखील त्यांनी आपल्या श्रीमंतीचा तमाशा कधी मांडला नाही. असा माणूस पुढच्या पिढयांना पहायला न मिळणं ही अधिक दुःखाची बाब आहे.

भारताच्या उद्योजकीय वारशाचा अंत

भारताने आज कर्तृत्ववान आणि निर्विकार राहिलेला शेवटचा महान उद्योजक गमावला आहे. रतन टाटांच्या निधनाने देशातील उद्योजकीय संस्कृतीत एक अमूल्य शून्य निर्माण झाले आहे, ज्याची भरपाई होणं कठीण आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.