रतन टाटांची अंत्ययात्रा वरळी स्मशानभूमीत दाखल, शासकीय इतमामात होणार अंत्यविधी
GH News October 10, 2024 08:14 PM

भारताच्या उद्योग क्षेत्रातील बापमाणूस म्हणून ओळख असलेल्या टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आणि जगातील मोठे उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी (9 ऑक्टोबर) निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. रतन टाटा यांच्या निधनानंतर राज्यात आज एक दिवसाचा दुखवटा पाळला जात आहे. रतन टाटा यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यासाठी श्रद्धांजली म्हणून हा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. तसेच रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जात आहे. रतन टाटा यांचे पार्थिव त्यांच्या कुलाब्यातील राहत्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यानंतर मुंबईतील नरिमन पॉईंट येथील एनसीपीए याठिकाणी त्यांचे पार्थिव सर्वसामान्यांना अंतिम दर्शन घेण्यासाठी हलवण्यात आले. यानंतर दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास टाटा यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी वरळीच्या दिशेने रवाना झाले. यानंतर संध्याकाळी साडे चार ते पावणे पाच वाजता मरिन ड्राईव्ह मार्गे पेडर रोडवरुन ही अंत्ययात्रा वरळीतील स्मशानभूमीत दाखल झाली. यानंतर टाटांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात पारसी पद्धतीने अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. साधारण ४५ मिनिट प्रार्थना केल्यानंतर टाटांचं पार्थिव विद्युत दाहिनीवर ठेवण्यात येणार आहे आणि अंत्यविधी केले जाणार आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.