चालू वीजबिलासह शंभर टक्के थकबाकी वसूल करा : भुजंग खंदारे
esakal October 11, 2024 01:45 AM

बारामती, ता. १० : ‘‘वीजग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यासह दरमहाच्या चालू वीजबिलाची व मागील थकबाकी वसुली करावी. त्यासाठी पुढील सहा महिन्यांचा कृती आराखडा बनवून आणि त्यात सातत्य राखून वीजबिल वसुली करावी,’’ असे निर्देश महावितरण पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे यांनी दिले.
बुधवारी (ता. ९) बारामतीत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी खंदारे म्हणाले की, चालू आर्थिक वर्षात बारामती परिमंडलाची लघुदाब वर्गवारीतील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर ग्राहकांची मार्च अखेर ४४ कोटी रुपये असलेली थकबाकीची रक्कम १४४ कोटींवर गेली आहे. ही रक्कम वसूल करण्यासाठी पुढील सहा महिन्यांचा कृती आराखडा तयार करून त्यावर काम करावे लागेल. शिवाय चालू बिले शंभर टक्के अधिक थकबाकी वसूल करणे हे आपले उद्दिष्ट असले पाहिजे. या उद्दिष्टपूर्तीसाठी जनमित्रांपासून वरिष्ठ अभियंत्यापर्यंत प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे.

आपल्या कामांचा आलेख हा नेहमी चढताच असला पाहिजे. प्रधानमंत्री सूर्यघर योजना, मागेल त्याला सौर कृषीपंप योजना, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आदी अनेक लोकाभिमुख योजना महावितरणच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत. ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०’ मुळे शेतीला दिवसा वीज देणे शक्य होणार आहे. त्याकरिता या योजनांच्या कामांना गती द्या. तसेच वीज नियामक आयोगाने घालून दिलेल्या कृती मानंकानुसार वीज कनेक्शन वेळेत देण्याचे व तक्रार निवारण करण्याच्या सूचनाही प्रादेशिक संचालकांनी यावेळी केल्या.
बैठकीला मुख्य अभियंता अंकुश नाळे, अधीक्षक अभियंता दीपक लहामगे (बारामती), बाळासाहेब हळनोर (सातारा), सुनील माने (सोलापूर), सहायक महाव्यवस्थापक कीर्ती भोसले व धैर्यशील गायकवाड उपस्थित होते.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.