Dombivli News: कल्याण परिमंडलातील 2 हजार 437 ग्राहकांना अभय योजनेचा लाभ; 94 लाख रुपये माफ !
esakal October 11, 2024 06:45 AM

डोंबिवली: वीजबिल थकबाकीमुळे वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित केलेल्या कल्याण परिमंडलातील 1 हजार 885 ग्राहकांना पुन्हा वीजजोडणी मिळाली. या ग्राहकांनी व्याज व विलंब आकार शंभर टक्के माफीसह किमान 30 टक्के थकबाकी भरणाऱ्यांना त्वरित वीजजोडणीची संधी देणाऱ्या महावितरण अभय योजना मध्ये सहभाग घेतला आहे.

योजनेच्या लाभासाठी आतापर्यंत 3 हजार 148 जणांनी अर्ज केले असून यातील 2 हजार 437 ग्राहकांनी 3 कोटी 41 लाख रुपयांचा भरणा करून योजनेचा लाभ घेतला. या ग्राहकांनी त्यांच्या थकबाकीवरील व्याज व विलंब आकाराच्या 94 लाख रुपयांची माफी मिळवली आहे. अधिकाधिक ग्राहकांनी योजनेत सहभागी होऊन उपलब्ध संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य अभियंता चंद्रमणि मिश्रा यांनी केले आहे.

अभय योजनेनुसार मार्च 2024 अखेर किंवा तत्पूर्वी वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित झालेले लघुदाब व उच्चदाब ग्राहक (सार्वजनिक पाणीपुरवठा व कृषीपंप ग्राहक वगळून) योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत. थकबाकीची मुळ रक्कम एकरकमी किंवा सहा समान हप्त्यात भरल्यास त्यावरील व्याज आणि विलंब आकार पुर्णतः माफ़ होतो. योजनेतील सहभागी ग्राहकांना एकरकमी किंवा सहा समान हप्त्यात मूळ थकबाकी भरण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

तर थकबाकी एकरकमी भरणाऱ्या उच्चदाब ग्राहकांना मूळ थकबाकीवर 5 टक्के आणि लघुदाब ग्राहकांना 10 टक्के अतिरिक्त सवलत मिळते. मूळ थकबाकी एकरकमी अथवा किमान 30 टक्के रक्कम भरुन योजनेत सहभागी होता येईल. त्यानंतर मागणीप्रमाणे व आवश्यकतेनुसार तत्काळ नवीन वीजजोडणी मिळेल. 30 टक्के रक्कम भरणाऱ्या ग्राहकांना मूळ थकबाकी व्याजमुक्त अशा सहा समान हप्त्यात भरण्याची सवलत उपलब्ध आहे.

कल्याण परिमंडलातील 2 लाख 94 हजार 91 ग्राहक या योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत. त्यांच्याकडे 301 कोटी 18 लाख रुपयांची मूळ थकबाकी असून विलंब आकाराचे 3 कोटी 81 लाख व व्याजाचे 40 कोटी 61 लाख रुपये थकीत आहेत. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. याशिवाय महावितरणच्या स्थानिक कार्यालयांमध्ये इच्छुक ग्राहकांना ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे असे महावितरण कडून सांगण्यात आले.

मंडल कार्यालय अर्जदार भरणा माफीची रक्कम वीजजोडणी

  • कल्याण-एक 429 35.49 लाख 6.46 लाख 235

  • कल्याण-दोन 773 1.03 कोटी 25.25 लाख 431

  • वसई 1408 1.49 कोटी 41.90 लाख 861

  • पालघर 539 62.81 लाख 20.22 लाख 358

  • कल्याण परिमंडल 3148 3.41 कोटी 93.83 लाख 1885

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.