Navratri 2024: समाजातील महिलांसाठी, अंधश्रद्धा निर्मुलनासाठी उभी राहणारी सावित्रीची लेक 'रेश्मा खाडे'
esakal October 11, 2024 08:45 AM
 Navratri :

कोल्हापूर हे शहर पुरोगामी विचार असलेल्या मान्यवरांचे आहे. इथं राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचे लोक आहेत. या थोरांचे विचार गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचे काम कोल्हापुरातील राधानगरीत राहणारी एक महिला सर्वांपर्यंत पोहोचवत आहे. आजच्या या नवदुर्गेच्या रूपात आपण माहिती घेणार आहोत रेश्मा खाडे यांच्याबद्दल.

माझं नाव रेश्मा खाडे,मी कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरीत राहते. मी असं सांगितलं की, बरेच जण विचारत असतात की, एवढ्या ग्रामीण भागातून तू येतेस तर अंधश्रद्धा निर्मूलन समिती संविधान संवाद समिती आशा सामाजिक संघटनांचे काम करताना कोणी अडवलं नाही का? घरचे काही म्हणत नाहीत का?

तेव्हा मी आवर्जून सांगते राधानगरी हे गाव शाहू राजांनी त्यांच्या मुलीच्या नावाने बसवलेले गाव आहे, या वैचारिक बापाचा वारसा लाभलेली मी एक राधानगरीची लेक आहे. जरी हा ग्रामीण भाग असला तरी माझी आई अशिक्षित असूनही थोड्याफार पुरोगामी विचारांची आहे. कारण आजतागायत तिने कधीही अंनिसच्या कामासाठी अडवलं नाही, कामानिमित्त महाराष्ट्र भर फिरणं होत असतं, पण तिच्याकडून ‘हे काम करू नको’, असं आलेल नाही.

आमचं कुटुंब अति धार्मिक वातावरणाचे नाहीये. गंगाजमुनी संस्कारात असलेलं आमचं छोटसं कुटुंब आता तिसऱ्या पिढीमुळे मोठे झालेल आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच अंनिसच्या शाखेत सहभागी झालो होतो.प्रा.विश्वास पाटील सर एन.एस.एस शिबिरामध्ये ही आम्हाला अंधश्रद्धा निर्मूलन प्रबोधनाच्या उपक्रमात सहभागी करून घेत.

कॉलेजच्या शिक्षकांसोबत रामणवाडी सारख्या वस्तीवर एका महिलेची जट निर्मूलन केली. गावातच गणपती व निर्माल्य दान सारखे उपक्रम घेत कार्यकर्ता बनण्याचा प्रवास सुरु झाला. राधानगरी शाखेची कार्यकर्ता ते शाखा कार्याध्यक्ष म्हणून मी जबाबदारी स्वीकारली. कार्यकर्ता म्हणून सुरू केलेला हा प्रवास आज कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष पर्यंत आलेला आहे. 

कधीही कोल्हापूरला एकटी न येणारी मी आज महाराष्ट्रभर मी या कामासाठी प्रवास करते खूप लोकांशी भेटते. हे धाडस ही मला इथेच मिळाले. वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना भेटणे, ऐकणे, संवाद करणे हे खूपच आवडीचे बनले. खूप छान लोकं भेटलीत, वेगवेगळ्या संमेलनातून साहित्य याविषयी आवड निर्माण झाली.

संविधान या मुद्द्याला धरून काम करण्यासाठी अनेक सहकाऱ्यांसोबत 3 जानेवारी 2021 रोजी लोकराजां शाहू संविधान संवाद प्रशिक्षण सेंटर राधानगरी येथे सुरू केलं. संविधान सोप्या भाषेत त्यांच्या भाषेत समजावं यासाठी इथे प्रशिक्षण घेतले जातात.

हे प्रशिक्षण ऑनलाईन कोर्स, संवादशाळा, एक दिवसीय कार्यशाळा, ३ दिवसीय अभ्यास शिबीर अशा स्वरूपात घेतले जाते. यातून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडणारे संविधान संवादक असतात. आज पूर्ण महाराष्ट्रभर संविधान संवादक चळवळ तयार झाली आहे. आत्ता पर्यंत या चालवळींशी जोडलेले 150 च्या वर कार्यकर्ते आप आपल्या ठिकाणी कार्यरत आहेत.

अनेक शाळा, कॉलेज, प्रशासन, सहकारी संस्था, बचत गट, ग्रामपंचायत अशा खूप ठिकाणी संविधान संवाद प्रशिक्षण झालेली आहेत. या चळवळीचा सुरवातीपासूनचा मी एक भाग आहे याचा खूप अभिमान आहे. या वेगळ्या कामामुळे आज पूर्ण महराष्ट्रभर स्वतःची ओळख निर्माण झाली आहे. मी संकलित केलेले  सावित्री वदते’ या पुस्तकाचे प्रकाशन 3 जानेवारी सावित्री जयंती दिवशी झाले.

युवासाठी निर्भय नावाची छावणी राधानगरीमध्ये घेतली जाते, महिलांसाठी झेप नावाचं शिबिर आयोजित करतो, ज्यात आपला कन्फर्ट झोन सोडून महिला सहभागी होतात. यात वैचारिक, साहस, मनोरंजनाची सत्र असतात, नामवंत पाहुणे मार्गदर्शनासाठी येतात, तसेच छोट्या मुलांसाठी दिवाळी व उन्हाळी शिबिरे देखील आयोजित असतात. सामाजिक भान निर्माण व्हावं हाच यातून साधला जाणारा उद्देश आहे.

बलात्कार, खून यांनी अस्वस्थ करणारी परिस्थिती निर्माण झाली असताना समाजात पुरुषभान निर्माण करण्याची गरज आहे लकहात घेऊन स्त्री सन्मानासाठी पुरुषभान हा उपक्रम राबवत आहे. यात पथनाट्य, नाटक, पीपीटी, शॉर्टफिल्म्सद्वारे संवाद, महाविद्यालयिन विद्यार्थ्यांची परिषद, गणेशोत्सव नवरात्रोत्सव मंडळात जाऊन त्यांच्याशी संवाद असे उपक्रम घेत आहे.

आज घडीला सामाजिक क्षेत्रातील हा माझा प्रवास माझी आई भाऊ आणि माझ्या सोबत असणाऱ्या साथींशिवाय शक्य नव्हता. त्यांची साथ, मार्गदर्शन नेहमी असते. वयात येताना, प्रेमात पडताना, जोडीदाराची विवेकी निवड, संविधान, वैज्ञानिक दृष्टिकोन, चमत्कार सादरीकरण, जादूटोणा विरोधी प्रबोधन, स्त्रिया व अंधश्रद्धा, लिंगसमभाव, लैंगिकता प्रबोधन, मानसिक आरोग्य व्यवस्थापन अशा विषयांवर संवादक म्हणून मांडणी करतो.


मला महाराष्ट्र युवा प्रतिष्ठानकडून महिला युवा पुरस्कार २०२० व युवा जागर साथी हा पुरस्कार २०२२ मध्ये मिळाला आहे. येणाऱ्या आव्हानांचा स्वीकार करणे, नव्या कल्पनांना कृतीत आणणे, सतत वेगवेगळे उपक्रम करत राहणं, एखादी जबाबदारी घेऊन त्याचे व्यवस्थित नियोजन करण हे सुरूच राहील आयुष्यभर, अशा या रणरागिणीला आमचा सलाम!

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.