Nashik Traffic Route Change : पंचवटीतील वाहतूक मार्गात बदल : रावण दहन
esakal October 11, 2024 06:45 AM

नाशिक : दसऱ्यानिमित्त शनिवारी (ता.१२) चर्तुसंप्रदाय आखाडा महंत कृष्णचरणदास महाराज यांच्यातर्फे रावण दहन आयोजित करण्यात येते. रावण दहनापूर्वी श्रीराम-लक्ष्मण सेनेची मिरवणूक निघते. त्या पार्श्वभूमीवर पंचवटीतील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. तरी भाविकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी केले आहे. (Change in traffic route in Panchavati due to Ravana Dahan )

श्रीराम - लक्ष्मण सेनेची मिरवणूक शनिवारी (ता. १२) सायंकाळी सहाला चर्तुसंप्रदाय आखाड्यातून मार्गस्थ होईल. चर्तुसंप्रदाय आखाडा, मालेगाव स्टँड, पंचवटी कारंजा, मालवीय चौक, शिवाजी चौक, सितागुंफामार्गे काळाराम मंदिर, सरदार चौक, साईबाबा मंदिरमार्गे रामकुंड पार्किंग मैदानापर्यंत मिरवणूक निघेल. मिरवणुकीची सांगता झाल्यावर राम व रावणाचे प्रातिनिधिक युद्ध दर्शवून (रामलीला) रात्री आठला रावण दहन करण्यात येते.

यासह रामकुंड परिसरात नवरात्र मंडळाच्या देवी मूर्तींचेही विसर्जन करण्यात येते. मोठ्या वाहनात या मूर्ती रामकुंडावर येतात. या मिरवणुका दुपारी चार वाजेपासून रात्री नऊपर्यंत येत असतात. त्यामुळे मालेगाव स्टँडपासून गाडगे महाराज पूल या अरूंद रस्त्यावर वाहतूक कोंडीची शक्यता आहे. त्यानुसार पोलिसांनी मार्गात बदल केले आहेत. मालेगाव स्टँड ते गाडगे महाराज पूलापर्यंत दुपारी तीन ते रात्री दहापर्यंत वाहतूक केवळ एकेरी मार्गाने सुरू ठेवण्यात येईल. ()

यासंदर्भात वाहतूक उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार मालेगाव स्टँडकडून रामकुंड, सरदार चौक ते गाडगे महाराज पुलापर्यंत सर्व वाहनांची एकेरी मार्गाने वाहतूक सुरू असेल. गाडगे महाराज पुलाकडून मालेगाव स्टँडच्या दिशेने वाहनांना जाता येणार नाही. वाहने गणेशवाडीमार्गे काट्या मारुती पोलिस चौकी, निमाणी बस स्थानक, पंचवटी कारंजा मार्गे इतरत्र जातील.

प्रवेश बंद मार्ग : मालेगाव स्टॅण्ड ते रामकुंड - सरदार चौक - गाडगे महाराज पूल दुतर्फा प्रवेश बंदी

पर्यायी मार्ग : गणेशवाडी - काट्या मारुती चौकी - निमाणी बससथानक - पंचवटी कारंजा मार्गे

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.