Malvan Statue Incident: मालवणमधील शिवरायांचा पुतळा दुर्घटनेत मोठी कारवाई! मिर्झापूरमधून तिसऱ्या आरोपीला अटक; पोलीस कोठडीत रवानगी
Saam TV October 18, 2024 04:45 PM

विनायक वंजारे, सिंधुदूर्ग

Shivaji Maharaj Statue Incident: मालवण दुर्घटना प्रकरणात एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोसळ्याप्रकरणी काल तिसऱ्या आरोपीला अटक करण्यात आली. आरोपी परमेश्वर यादव हा वेल्डर असून त्याने पुतळ्याच्या भागाचे नीट वेल्डिंग केले नसल्याचा त्याच्यावर ठपका आहे. उत्तरप्रदेश येथील मिर्झापूर येथून त्याला काल अटक करण्यात आली. न्यायलयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राजकोट किल्ल्यावर आठ महिन्यांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात आला होता. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचे उद्घाटन केले होते. मात्र २६ ऑगस्ट रोजी हा २८ फुटी पुतळा कोसळला, ज्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणी शिवप्रेमींसह विरोधकांनी महायुती सरकारला धारेवर धरले होते. या घटनेनंतर राज्य सरकारने या प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश दिले होते.

ज्यानंतर याप्रकरणी केलेल्या तांत्रिक तपासात पुतळ्याच्या वेगवेगळ्या भागांची जोडणी करताना निकृष्ट दर्जाचे काम केल्याने गंज लागल्याने ही दुर्घटना घडल्याचे समोर आले होते. याप्रकरणी या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटेलाही पोलिसांनी अटक केला आहे. आता उत्तरप्रदेश येथील मिर्झापूर येथून आणखी एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

परमेश्वर यादव असे या तिसऱ्या आरोपीचे नाव आहे. परमेश्वर हा हा वेल्डर असून त्याने पुतळ्याच्या भागाचे नीट वेल्डिंग केले नसल्याचा त्याच्यावर ठपका आहे. आरोपीला मालवण न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी आता अधिक तपास सुरु आहे. दरम्यान, या दुर्घटनेनंतर आता राज्य सरकारने त्याठिकाणी नवीन पुतळा उधारणार असल्याची घोषणा केली आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.