Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच
esakal October 18, 2024 04:45 PM

श्रीगोंदा : महायुतीत भाजपकडून आमदार बबनराव पाचपुते यांच्या कुटुंबात उमेदवारी निश्चित मानली जात आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारीसाठी माजी आमदार राहुल जगताप यांचे नाव आघाडीवर असले, तरी उमेदवारीवरून मोठी रस्सीखेच बघायला मिळत आहे. इच्छुकांची संख्या मोठी असल्याने श्रीगोंदेत सध्यातरी बहुरंगी लढतीचेच संकेत मिळत आहेत.

भाजपकडून पाचपुते कुटुंबात उमेदवारी मिळून विक्रमसिंह पाचपुते मैदानात असण्याची शक्यता अधिक मानली जाते. त्यामुळे उमेदवारीच्या बाबतीत पाचपुते कुटुंब निश्चित वाटत आहे. महाविकास आघाडीत माजी आमदार राहुल जगताप, काँग्रेसचे घनश्याम शेलार, शिवसेनेचे उपनेते साजन पाचपुते हे तिघे प्रमुख दावेदार आहेत.

त्यातच राजेंद्र नागवडे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारीसाठी लॉबिंग चालविली आहे. त्यामुळे उमेदवारीबाबत सस्पेन्स वाढला आहे. त्याव्यतिरिक्त अण्णासाहेब शेलार, टिळक भोस, सुवर्णा पाचपुते व निवास नाईकही इच्छुक आहेत.

त्यामुळे उमेदवार जाहीर झाल्यानंतर कोणते नेते माघार घेतात अन् कोणते नेते बंडाचा झेंडा फडकवतात हे सांगणे आज तरी कठीणच आहे. सद्यस्थिती पाहता श्रीगोंदेत बहुरंगी लढत रंगण्याचीच चिन्हे आहेत.

गेल्या दोन-तीन वर्षांत झालेल्या विकासकामांच्या जोरावर पाचपुते कुटुंब विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याच्या तयारीत दिसत आहे, तर महाविकास आघाडी व विशेषतः खासदार शरद पवार यांच्याबद्दल असलेल्या सहानुभूतीचा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला फायदा होऊ शकतो, अशी सद्यस्थिती आहे. महाविकास आघाडीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर किती व कोणते इच्छुक बंडखोरी करीत विधानसभेच्या मैदानात उतरतात यावर विधानसभेची गणिते अवलंबून राहणार आहेत.

वाड्या-वस्त्या पक्क्या रस्त्यांच्या प्रतीक्षेत

वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला औद्योगिक वसाहतीचा प्रश्न सोडविण्यात पाचपुतेंना यश आल्याचे सांगितले जाते. परंतु, औद्योगिक वसाहत उभारणीची प्रक्रिया वेळखाऊ असल्याने मतदार त्याबाबत कितपत समाधानी आहेत, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मतदारसंघातील विविध रस्त्यांसाठी मोठा निधी आला आहे. मात्र, अद्यापही तालुक्यातील अनेक गावे, वाड्या-वस्त्या पक्क्या रस्त्यांच्या प्रतीक्षेत आहेत, हेही दुर्लक्षून चालणार नाही.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.