Video : बाबा सिद्दीकी हत्या ते लॉरेन्स बिश्नोई; सलमानचे वडील सलीम खान यांची स्फोटक मुलाखत
abp majha web team October 19, 2024 12:13 AM

मुंबई : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान पुन्हा एकदा माध्यमांच्या केंद्रस्थानी आहे. मुंबईतील नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी (Baba siddique) यांची हत्या झाल्यानंतर बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी स्वीकारल्याने खळबळ उडाली आहे. तसेच, सलमान खान व बाबा सिद्दिकी यांचे अत्यंत मैत्रीपूर्ण संबंध होते. सलमान खानला (Salman khan) बाबा सिद्दीकी यांची मोठी मदत झालीय. त्यामुळेच, लॉरेन्स बिश्नोई गँगने बाबा सिद्दीकींची हत्या केल्याचा आरोप होत असून बॉलिवूड (Bollywood) व गुन्हे विश्वास तशीच चर्चा आहे. पोलिसांनीही त्यादृष्टीने व इतर अँगलने या हत्याप्रकरणाचा तपास सुरू केला असून सलमान खानच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आलीय. त्यामुळे, सध्या देशभरात चर्चेत असलेल्या आणि संवेदनशील बनलेल्या सलमान खान, बाबा सिद्दीकी व लॉरेन्स बिश्नोई प्रकरणावर सलमान खानचे वडिल सलीम खान यांनी सर्वच बाबींवर बिनधास्तपणे भूमिका मांडली. तसेच, काळवीट हत्याप्रकरण, बाबा सिद्दीकी आणि सलमान खान यावर अनेक गौप्यस्फोट केले आहेत.  

मला कशाचीही भीती नाही, आज काय आहे तो सोक्षमोक्ष होऊन जाऊ द्या, कदाचित पुन्हा भेट होईल किंवा नाही. जिंदगी और मौत खुदा के हात मे है... असे म्हणत सलीम खान यांनी सलमान खानने काळवीटाची कुठलीही शिकार केली नसल्याचे म्हटले. तसेच, बाबा सिद्दीकी आणि सलमान खान मित्र होते, दोघे एकाच शाळेत होते, बाबाच्या मृत्यूचं वाईट वाटतंय. आम्ही सगळे त्याच्या अंत्यसंस्काराला गेलो होतो. त्यांचा इतर कोणाशी काही वाद असेल तर माहिती नाही, त्यांच्या संपूर्ण आयुष्याबाबत तरी आम्हाला माहिती नाही, असे म्हणत सलीम खान यांनी सलमान खान व बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाचा संबंध नसल्याचे म्हटले आहे. 

माफी कोणाची मागायची, सलमानने काही केलंच नाही

माफी कोणाची मागितली जाते, ज्याच्यासोबत गुन्हा केलाय, ज्याला धोका दिलाय किंवा ज्याची आर्थिक लूट केलीय अशा लोकांची माफी मागितली जाते. कुठल्या मूर्तीसमोर उभं राहून माफी मागता येत नाही. माफी मागणे म्हणजे चूक कबुल करणे आहे, पण सलमानने काही चूकच केली नाही. आम्ही कधी साधं झुरळ देखील मारलं नाही, सलमाननेही कधी कुठल्याही प्राण्याला इजा केली नाही. सलमान हा प्राण्यांवर खूप प्रेम करतो, सलमानने एक कुत्र पाळलं होतं, ते कुत्र मेल्यानंतर सलमानला खूप रडू आलं. सलमानला मी काळवीट हत्याप्रकरणावर विचारलं होतं, तेव्हा त्याने मला सांगितलं की, मी तिथं नव्हतोच. सलमान मला कधीच खोट बोलत नाही. त्यामुळे सलमानचा काळवीट हत्याप्रकरणाशी कसलाही संबध नसल्याचे सलीम खान यांनी एबीपी माझीशी बोलताना स्पष्ट केले. दरम्यान,कोरोना काळात 144 कलम लागल्यामुळे दररोज सुरू असलेलं मदतीचं समाजकाम कमी झालं. नाहीतर दररोज 100 एक लोकं आमच्या घराबाहेर मदतीसाठी येत होते, तेव्हा त्यांच्या मदतीसाठी आम्ही पुढे येत, अशी माहितीही सलीम खान यांनी आपल्या मुलाखतीत दिली.  

बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणाचा संबंध नाही

पोलिसांनी जेव्हा ही जबाबदारी घेतली, तेव्हापासून अनेक बंधने आली आहेत. घरातून बाहेर पडायलाही स्वतंत्र्य नाही, खूप बंधनं आमच्यासाठीच आहेत. सलमानला साधं खिडकीत उभं राहण्यासाठी काळजी घ्यावी लागते. कधी ही गोळी चालवतील, असं सांगण्यात येतं. बिष्णोई केस हा खंडणीचा प्रश्न आहे, बाबा सिद्दीकी यांच्या खुनाचा सलमान खानशी काहीही संबंध नाही. ही दोन्ही प्रकरणे वेगळी आहेत, असेही सलीम खान यांनी आपल्या मुलाखतीतून सूचवलंय. 

बारामतीतून अजित पवारच, नवाब मलिकांनाही संधी; राष्ट्रवादीच्या संभाव्य 41 उमेदवारांची यादी समोर

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.