वेस्ट इंडिजला पराभूत करत न्यूझीलंडची अंतिम फेरीत धडक, दक्षिण अफ्रिकेशी होणार सामना
GH News October 19, 2024 02:06 AM

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात नवा विश्वविजेता क्रिकेटविश्वाला मिळणार आहे. न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला धावांनी पराभूत करत अंतिम फेरी गाठली आहे. आता अंतिम फेरीत न्यूझीलंडचा सामना दक्षिण अफ्रिकेशी होणार आहे. दक्षिण अफ्रिका आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी एकदाही जेतेपदावर नाव कोरलेलं नाही. त्यामुळे टी20 वर्ल्डकपच्या नवव्या पर्वात आणखी एक संघ जेतेपदाच्या पाटीवर कोरला जाणार आहे. आतापर्यंतच्या आठ पर्वात न्यूझीलंडने दोनदा आणि दक्षिण अफ्रिकेने एकदा अंतिम फेरी गाठली होती. मात्र या दोन्ही संघाच्या पदरी निराशा पडली. न्यूझीलंडला एकदा इंग्लंडने आणि एकदा ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीत पराभूत केलं आहे. तर मागच्या पर्वात दक्षिण अफ्रिकन संघ अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी ठरला होता. पण ऑस्ट्रेलियाकडून पराभवाची धूळ चाखावी लागली होती. मात्र या पर्वात न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिका हे संघ आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे कोण बाजी मारणार? याची उत्सुकता आहे. अंतिम फेरीचा सामना 20 ऑक्टोबरला होणार आहे.

उपांत्य फेरीत न्यूझीलंडने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खेळपट्टीचा अंदाज असल्याने न्यूझीलंडने सावध पण सातत्यपूर्ण धावा केल्या. 20 षटकात 9 गडी गमवून 128 धावा केल्या आणि विजयासाठी 129 धावांचं आव्हान दिलं. पण हे आव्हान गाठताना वेस्ट इंडिजचा संघ गडगडला आणि टप्प्याटप्प्याने विकेट गमवल्या. त्यामुळे वेस्ट इंडिज संघावर दडपण वाढलं आणि न्यूझीलंडने त्याचा पुरेपूर फायदा घेतला. न्यूझीलंडकडून एडन कार्सनने सर्वोत्तम स्पेल टाकला. महत्त्वाचे खेळाडू बाद करत वेस्ट इंडिजला बॅकफूटवर ढकललं.वेस्ट इंडिजच्या विकेट मोक्याच्या क्षणी पडल्याने धावा आणि चेंडू यांच्यातील अंतर वाढत गेलं आणि न्यूझीलंडचा विजय सोपा होत गेला. वेस्ट इंडिजला 20 षटकात 8 गडी गमवून 120 धावा करता आल्या. न्यूझीलंडने वेस्ट इंडिजवर 8 धावांनी विजय मिळवला.

न्यूझीलंडने साखळी फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना गमावला होता. तर दक्षिण अफ्रिकेने ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला उपांत्य फेरीत पराभवाची धूळ चारली आहे. त्यामुळे न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात सामना अतितटीचा होईल असंच वाटत आहे. दरम्यान, पुरुष टी20 वर्ल्डकप स्पर्धेत दक्षिण अफ्रिकेने अंतिम फेरी गाठली होती. पण भारताकडून पराभवाची धूळ चाखावी लागली होती. आता वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत दक्षिण अफ्रिकेने एन्ट्री मारली आहे. पुरुष संघाला जे शक्य झालं नाही ते महिला संघ करणार का? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.