थकीत मानधन दिवाळी पूर्वी मिळावे
esakal October 19, 2024 03:45 AM

जेजुरी, ता. १८ : जेजुरी शहरातील ज्येष्ठ लोककलावंत तीन महिन्यांपासून मानधनापासून वंचित आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून दिवाळीपूर्वी आमचे थकविण्यात आलेले मानधन मिळावे अशी मागणी लोककलावंत दशरथ लाखे यांच्यासह १५ जणांनी केली आहे.
जेजुरी ही लोककलावंतांची नगरी आहे. येथे अनेक लोककलावंत वास्तव्यास आहेत. किमान ७० लोककलावंत जेजुरीमध्ये निवासी आहेत. काही वर्षांपासून राज्य शासनाकडून ज्येष्ठ कलावंतांना दरमहा ५ हजार रुपये मानधन मिळत आहे. यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. राज्य शासनाकडून मिळणाऱ्या मानधनाशिवाय दुसरे कोणतेही साधन नाही. मात्र गेल्या तीन महिन्यापासून मानधन मिळालेले नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. वृद्धत्वामुळे काही कलावंतांना शारीरिक व्याधी (आजार)असून औषधोपचार करावे लागतात. या सर्वांचा गांभीर्याने विचार करत थकलेले मानधन दिवाळीपूर्वी देऊन आमची दिवाळी गोड करावी अशी मागणी शासनाला दिलेल्या निवेदनामध्ये करण्यात आली आहे. यावेळी प्रसिद्ध ढोलकीपटू गोविंद कुडाळकर, भरत कुडाळकर, दशरथ लाखे, भोलाजी मोहोरकर, सीमा लाखे, लक्ष्मी कुदळे, महानंदा यादव, पुष्पा यादव, लीला मोहोरकर आदींच्या लोककलावंतांच्या सह्यांचे निवेदन शासनाला पाठविण्यात आले आहे.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.