Kamthi Vidhan Sabha: कामठीत भाजपची सत्ता मोडीत काढण्याचा काँग्रेसचा प्रयत्न! कसं आहे मतांचं गणित?
esakal October 19, 2024 05:45 AM

गेल्या अनेक वर्षांपासून भाजपची एकहाती सत्ता असलेला कामठी विधानसभा मतदारसंघ हिसकावून घेण्याची तयारी यावेळी काँग्रेसनं केली आहे. काँग्रेसचे नेते यासाठी जोरदार कामाला लागले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात ही निवडणुकी लढली जात आहे, तर दुसरीकडं काँग्रेसचे सुनील केदारही अधिक सक्रिय झाले आहेत. सामाजिकदृष्ट्या चार समाजाची मतं इथं मोठी असून त्यांचा इथं प्रभाव आहे. यातून भाजप कशी तरेल, याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

कामठी विधानसभा आणि चंद्रशेखर बावनकुळे असं समीकरण झालं आहे. गेली अनेक वर्षे त्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. नागपूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला, याचा लाभ त्यांना झाला. ते कामठीचे आमदार झाले, तेव्हापासून सतत निवडून येत आहेत.

मात्र, २०१९ मध्ये पक्षाची त्यांच्यावर अवकृपा झाली आणि वरिष्ठांनी नाराजी भोवली. शेवटपर्यंत त्यांना उमेदवारी दिली नाही. मुलगा किंवा पत्नीला उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, टेकचंद सावरकर यांनी उमेदवारी देण्यात आली. ते निवडून आले, सावरकर यांना १ लाख १८ हजार १८२ मते मिळाली. तर काँग्रेसचे सुरेश भोयर यांना १ लाख ७ हजार ६६ मते मिळाली.

या निवडणुकीत भाजपचं मताधिक्य प्रचंड घडलं. २०१४ मध्ये ४० हजारांचं मताधिक्य होतं ते १२ हजारांवर आलं. यामुळं भाजप सध्या कामठी मतदारसंघात चांगला उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. स्वतः बावनकुळं इथून निवडणूक लढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर काँग्रेसकडून सुरेश भोयर, हुकुमचंद आमधरे, अवंतिका लेकुरवाळे यांच्या नावाची चर्चा आहे.

या मतदारसंघात कुणबी, तेली, बौद्ध आणि मुस्लिम समाजाची मते मोठ्या प्रमाणात आहेत. यावेळी बहुसंख्य समाज हा काँग्रेसच्या बाजूनं असल्यानं भाजप सावध पवित्रा घेत आहे. बसपा, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांवरही बरेच काही अवलंबून आहे.

कामठी मतदारसंघाचं राजकारण

कुणबी, बौद्ध आणि तेली समाजाचं प्राबल्य

शहरी भागात मुस्लिम मतंही लक्षणीय

धार्मिक ध्रुवीकरणाचा फारसा प्रभाव नाही

सामाजिक ध्रुवीकरणाची शक्यता अधिक

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.