टॉयलेट : एक भयकथा
esakal October 19, 2024 08:45 AM

- शुभांगी पासेबंद, scpaseband@gmail.com

अलीकडेच जुहू बीचला गेले होते. शौचालयात गेले. १० रुपये घेतले. टॉयलेट अस्वच्छ होते. मुंबईत ही परिस्थती आहे. प्रवास करताना, बाहेरगावी कामानिमित्त जाताना, बाथरूमला जाणे, टॉयलेटला जाणे नेहमीच अडचणीचे ठरते आहे. त्यमुळे बायकांसाठी टॉयलेट ही भयकथाच ठरते आहे.

कुठेही गेले तरी, टॉयलेटची सोय नसेल, तर मन अस्वस्थ होते. परदेशात सहलीला जातानासुद्धा जाण्या-येण्यापूर्वी टॉयलेटची सोय आहे की नाही, याचा विचार करावा लागतो. सोय असली तरीही त्या टॉयलेटच्या ठिकाणी भरपूर पैसे द्यावे लागतात आणि सोयीस्कर अशा ठिकाणी ते टॉयलेट मिळतंच असं नाही.

परदेशात बसमध्येच मागच्या बाजूला टॉयलेट असतं; पण शक्यतो ते वापरू नका, असं सांगितलं जातं. दूर पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये टॉयलेट असतं; पण लोकल ट्रेनमध्ये नसतं. एसटीचा प्रवास हा महिलांसाठी ५० टक्के सूट दिल्यामुळे आर्थिक परिस्थितीनुसार ठीक वाटतो. भरपूर महिला प्रवास करतात; पण बस थांबल्यावर टॉयलेट बघितलं, तर भयावह वाटतं.

बस थांब्यावर सोडा, आता नुकतीच मी नाशिकला गेले तेव्हा एका ठिकाणी लाहे गावाजवळ बस थांबवण्यात आली. तिथे टॉयलेट घाणेरडं होतं आणि टॉयलेटमध्ये पाणीही नव्हतं. टँकर मागवला आहे, हे खोटं कारण नाशिकमध्ये मला तीन ठिकाणी ऐकायला मिळालं. पाण्याच्या बाटल्या विकत घेऊन ज्यांना शक्य आहे, ते टॉयलेटला ते पाणी वापरत होते. म्हणजे शेवटी त्या हॉटेलच्या कमाईचा तो सोर्स असावा.

बाहेरून पाणी पिंप आणि टँकर मागवायचा तर काय शेवटचा थेंब संपेपर्यंत वाट बघतात का? आधी मागवता येत नाही? दुसऱ्या एका ठिकाणी इव्हेंट होती. हजार रुपये सगळ्यांचे घेतले होते; पण टॉयलेटची सोय नव्हती. ज्येष्ठ स्त्रिया होत्या. दोन मजले उतरून, अजून पुढे दोनशे मीटर चालून गैरसोयीचे टॉयलेट होते. तिथे पाणीच नव्हतं. इतकी अस्वच्छता होती की भीती वाटत होती. टँकर मागवला आहे, हे उत्तर तिथेही मिळालं.

कितीतरी वेगवेगळे आजार आज निघाले आहेत. जे जंतुसंसर्गाने वाढू शकतात. अस्वच्छतेने वाढू शकतात. टॉयलेटची सोय न झाल्यामुळे, लघवी दाबून धरल्यामुळे, लघवी तुंबणे हे प्रकार पण वाढतात. प्रवास करताना लघवी लागायला नको, म्हणून पाणी न पिणं हासुद्धा मोठ्या संकटाला आमंत्रण देणारा प्रकार घडू शकतो. तर त्या इव्हेंटमध्ये सकाळी आम्ही नऊ वाजता गेल्यापासून, साडेचार वाजता बाहेर पडेपर्यंत टँकर मागवला आहे, हेच वाक्य ऐकायला मिळायचे. नाशिकची टँकरची सोय एवढी वाईट आहे का?

सगळ्या जगभरातच पाण्याची सोय वाईट झाली आहे. रस्तोरस्ती जागोजागी टॉयलेट्स बांधले, तर काही बिघडेल का? मी म्हणते रस्त्यावर जी वेगवेगळी होर्डिंग लावली जातात, याला वाढदिवसाच्या शुभेच्छा, त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा... ते उंचावर टांगण्यापेक्षा जमिनीवरच लावा. त्याच्यामागे आडोसा होऊन महिला तिथे बाथरूमला जाऊ शकतात.

एकदा टॉयलेटला गेल्यावर एसटी स्टँडमध्ये पाच-दहा रुपये मागतात. कितीतरी मध्यमवर्गीय किंवा कनिष्ठ मध्यमवर्गीय महिला हे १० रुपयेसुद्धा देऊ शकत नसतील. त्यांनी काय करायचं? महिलांसाठी मोफत असा बोर्ड लावलेला असला, तरीही पाठीमागे धावत येतात. असे पैसे मागणारे त्या बाईच्या मागे गेलेले मी पाहिले आहे. त्या बाईने कनवटीला लावलेला एक एक रुपया काढून टॉयलेटमधल्या माणसाला दिला आहे.

राईट टू पी ही चळवळ आहे; पण परिणाम नाही. अशा टॉयलेटला जाणे याचा त्रास होतो म्हणून एक सुप्रिया नावाच्या मॅडम ही एक चळवळ चालवत आहेत; पण काय फळ? टॉयलेट बांधले जातात, पैसे टाकून टॉयलेटला जायची सोय होते म्हणतात, पण मला जागोजागी टॉयलेटची सोय आढळली नाही.

(लेखिका सामाजिक विषयावर भाष्य करणाऱ्या साहित्यिक आहेत.)

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.