गवतातील मोर
esakal October 19, 2024 08:45 AM

- केदार गोरे, gore.kedar@gmail.com

एका प्रकल्पांतर्गत एकूण १२ तणमोरांवर टॅग बसविण्याचे काम फत्ते झाले. त्यातील टॅग केलेली एकमेव मादी तणमोर गुजरात व महाराष्ट्रमार्गे तेलंगणात पोहोचली व तेथे वास्तव्य करून विणीसाठी परतताना चंद्रपूर जिल्ह्यातील एका विजेच्या तारेवर आदळून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. जर त्या मादीवर टॅग नसता, तर ही घटना कधीच कळली नसती. ही घटना अत्यंत दुःखद होती; पण त्याचबरोबर अशा संशोधनांचे महत्त्व अधोरेखित करणारीही होती.

तणमोर (लेसर फ्लोरिकन) या भारतातील प्रदेशनिष्ठ प्रजातीवर उपग्रह टॅग बसविण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम गुजरात वन विभागाने योजिला होता. तणमोर सापडण्याचे हमखास ठिकाण म्हणून काळवीट राष्ट्रीय उद्यानाची ख्याती असल्याने, प्रकल्पाची मुहूर्तमेढ भावनगर जवळील वेळावदार येथील काळवीट राष्ट्रीय उद्यानात रोवण्याचे निश्चित झाले.

काळवीटांचे मोठाले कळप येथील गवताळ कुरणांमधून बागडताना, टणाटण उड्या मारताना मी आधी पाहिले होते. तणमोर, नीलगाय, लांडगे, तरसही पाहिले होते. अवघ्या ३५ चौ.कि.मी.चा हा परिसर ‘मिनी’ मसाई मारा भासावा इतका सुंदर होता, पण सप्टेंबर २०२० मध्ये काळवीट राष्ट्रीय उद्यानाला दिलेली ‘ती’ भेट खासच ठरली.

मुंबई ते वेळावदार हे सुमारे साडेपाचशे किलोमीटरचे अंतर गाडी चालवत जायचे तसे जीवावरच आले होते. कोविडचा काळ असल्याने विमान किंवा रेल्वेने प्रवास शक्य नव्हता. बारा तासांचा प्रवास करून संध्याकाळी वेळावदार येथे पोहोचलो. गुजरात वन विभागाचे डॉ. मोहन राम व इतर वरिष्ठ अधिकारी आणि माझे कॉर्बेट फाउंडेशनचे सहकारी डॉ. देवेश गढवी व दुष्यंतसिंह ज्हाला आधीच वेळावदार येथे पोहोचले होते. बिहार राज्यातील बेगुसराई येथील अली हुसेननामक गृहस्थांना बोलावण्यात आले होते. पक्षी पकडण्यात अली हुसेन व त्यांचे कुटुंबीय तरबेज होते व अनेक वर्षे पक्ष्यांवरील संशोधनात त्यांनी मोलाचे योगदान दिले होते.

तणमोर प्रकल्पाची तयारी अनेक महिने चालली होती. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांशी विचारविनिमय करून प्रकल्पाची आखणी केली होती. या सगळ्यात देवेश आणि दुष्यंतसिंह यांचा मोलाचा वाटा होता. तुकतुकीत काळा रंग व तपकिरी-पांढऱ्या छटा असणारे पंख आणि डोक्यावर डौलदार तुरा मिरवणाऱ्या तणमोराच्या नराला आणि पूर्ण तपकिरी रंग व त्यावर काळे पांढरे ठिपके असणाऱ्या मादीला गवताळ अधिवासात हुडकून काढणे महाकठीण काम होते.

मात्र तणमोरांची एक विशिष्ट सवय असते. नर तणमोर मादीला आकर्षित करण्यासाठी विशिष्ट प्रकारे पंखांची फडफड करत सहा ते आठ फूट उंच उड्या मारतो. उड्या घेताना बेडकासारखा आवाजही काढतो. एक नर दिवसांतून तीनशे ते चारशे वेळा उड्या मारण्याची करामत करू शकतो. जोपर्यंत आसपासच्या गवतात लपलेल्या एखाद्या मादीचे त्याच्याकडे लक्ष जात नाही, तोपर्यंत नर त्याचे हे अथक प्रयत्न चालूच ठेवतो.

गुजरात वन विभागातर्फे उपग्रह टॅग परदेशातून सगळे शासकीय सोपस्कार पूर्ण करून मागविण्यात आले होते. सौरऊर्जाने बॅटरी चार्ज करणारे व ठरावीक वेळाने उपग्रहामार्फत संदेश पाठवणारे हे टॅग अवघ्या १०-१२ ग्रॅम वजनाचे होते. जेणेकरून पक्ष्याला आपल्या पाठीवर काही बसविले आहे हे जाणवणारही नाही. रात्रीच टीमच्या उपस्थितीत सगळ्या सामग्रीची तपासणी झाली. टॅग योग्य प्रकारे उपग्रहामार्फत संदेश पाठवत असल्याची खातरजमा केली.

अवघ्या काही तासांच्या झोपेनंतर भल्या पहाटे अली हुसेन यांनी आधीच हेरून ठरवलेल्या स्थळांवर जाऊन जमिनीवर फासाचा सापळे (नूज ट्रॅप) रचले. सर्व काही शांततेत करायचे होते, गवतात विसावलेल्या तणमोरांना कळू न देता. थोड्या अंतरांवर तयार केलेल्या काही लपणगृहांत अली हुसेन आणि इतर सहकारी तणमोर फासामध्ये सापडायची वाट पहात बसले. पहिल्या दिवशी तणमोर फासात अडकले नाहीत.

दुसऱ्या दिवशी मात्र नशिबाने साथ दिली. सकाळी एक नर तणमोर अडकल्याचे कळले. आम्ही सर्व लगबगीने तेथे पोहोचलो. सकाळच्या कोवळ्या उन्हात त्या काळाभोर तणमोराचे अंग चमकत होते. त्याच्या पंखांवरची नक्षी विलोभनीय दिसत होती. त्याचे डौलदार रूप पाहून डोळ्याचे पारणे फिटले, पण त्यांचे सौंदर्य निरखायची ती वेळ नव्हती.

माणसांना पाहून पक्षी गांगरून जातात. म्हणून अली हुसेन यांनी लगोलग त्या नराच्या डोळ्यांवर एक खास बनवलेली कापडाची पिशवी घातली जेणेकरून या सर्व प्रकाराने त्याला जाणवणारा ताण कमी होण्यास मदत होईल. नंतर त्या नराचे वजन, पंखांची व पायाची लांबी, इत्यादी मोजमाप नोंदवून उपग्रह टॅग बसविण्याचे काम सुरू केले.

शाळेतील मुलांच्या पाठीवर जसे दप्तर अडकवलेले असते त्याप्रमाणे टॅग त्या पक्ष्याच्या पाठीवर टेफ्लॉनच्या दोरीने बांधण्यात आला. टॅग तीन-चार वर्षांनी आपोआप गळून जातात. टॅग निवडताना त्यांचे वजन तणमोर पक्ष्यांच्या शरीराच्या तीन टक्क्यांहूनही कमी भरेल याची काळजी घेतली होती, जेणेकरून त्या पक्ष्यांना उडताना कोणताही त्रास होणार नाही.

तणमोर पक्षांच्या आयुष्याची नाळच गवताळ प्रदेशाशी जोडलेली आहे असे म्हटले, तर वावगे ठरू नये. पावसाळा या पक्षांचा विणीचा हंगाम. याकाळात हे पक्षी भारतातील काही मोजक्या गवताळ प्रदेशांत स्थलांतर करून येतात. गुजरातमधील सौराष्ट्र व कच्छ, मध्य प्रदेशमधील सैलाना व सरदारपूर अभयारण्ये, राजस्थानातील अजमेर जवळील शोखलिया गाव ही विणीच्या हंगामात तणमोर दिसण्याची काही प्रमुख ठिकाणे. तणमोर पक्ष्यांचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञ मंडळींनी व काही पक्षी निरीक्षकांनी महाराष्ट्रातही तणमोर पाहिल्याच्या अनेक नोंदी केल्या आहेत.

पुण्याजवळीळ सासवड, सोलापूर जिल्ह्यातील नान्नज माळढोक अभयारण्य व करमाळा, नाशिकजवळील गंगापूर, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर आणि वाशीम जिल्ह्यातील काही भागांतही तणमोर आढळून आले आहेत. प्रजननासाठी गवताळ प्रदेश गाठणारे तणमोर पावसाळा संपताच स्थलांतर करतात, पण त्यांचे स्थलांतर नेमके कुठे होते हे जाणून घेण्यासाठीच उपग्रह टॅगमधून आलेल्या सिग्नल्समधून आकांक्ष-रेखांशसहित पक्ष्यांची अचूक ठिकाणे आम्हाला मिळणार होती. या प्रकल्पातून उपलब्ध होणारी माहिती तणमोरांचे स्थलांतर, त्यांना लागणारा अधिवास, मानवाशी असणारे त्यांचे नाते, या सर्वच बाबींवर प्रकाशझोत टाकणार होती.

एका मोकळ्या जागी नेऊन नराला अलगद जमिनीवर ठेवले व डोळ्यावर घातलेले कापड काढले. त्याने स्वतःला सावरले आणि काही पावले टाकून लगेचच त्याने भरारी घेतली. थोडे उंच उडून तीन वेळा घिरट्या घालून काही अंतरावरील गवतात नाहीसा झाला. आमच्या मनाला हुरहुर लागून राहिली होती. नराला काही झाले तर नाही ना, टॅग नीट बसला असेल ना, अशा अनेक प्रश्नांचे मनात काहूर माजले होते.

साधारण वीस मिनिटे टेन्शनमध्ये गेली. तितक्यात त्या नराने गवतातून उंच उडी घेऊन जणू काही आम्हाला सर्व काही आलबेल असल्याचे खुणावले. आमचा जीव भांड्यात पडला. गुजरातमध्ये तणमोरांवर उपग्रह टॅग बसविण्याचा पहिल्याच प्रयत्नाचा पहिला टप्पा यशस्वी झाला होता. आता तो नर जिथे जाईल तेथून काही मिनिटांच्या अंतराने आम्हाला त्याचा अचूक ठावठिकाणा कळणार होता.

कॅम्पवर येऊन समाधानाने चहाचे घोट घेत असतानाच दुसऱ्या ठिकाणच्या फासात आणखीन एक तणमोर सापडल्याची बातमी आली. ताबडतोब त्या ठिकाणी पोहोचलो. आमचा विश्वास बसेना, कारण फासात तणमोराची मादी अडकली होती. त्या दिवसापर्यंत मादीवर भारतात कधीही उपग्रह टॅग बसविण्यात आले नव्हते. आमच्यासाठी तो दुग्धशर्करा योग होता, पण प्रचंड काळजीही वाटत होती. नरावर केलेले सर्व सोपस्कार मादीवरही झाले.

मादीला ज्या ठिकाणी ती अडकली होती तिथे सोडण्यात आले. मादी मात्र न उडता चटकन गवतात शिरली आणि दिसेनाशी झाली. आता फक्त उपग्रह टॅगद्वारेच तिचा ठावठिकाणा कळणार होता. संध्याकाळी कॅम्पवर परतल्यावर दोन्ही उपग्रह टॅग आपापले सिग्नल योग्यप्रकारे देत आहेत, हे कळले आणि हायसे वाटले. एका महत्त्वाकांक्षी संशोधन प्रकल्पाची यशस्वी सुरुवात झाल्याचे समाधान सर्वांच्याच चेहऱ्यावर दिसत होते.

सप्टेंबर २०२० पर्यंत उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे तणमोर गुजरातमधून आंध्र प्रदेशात जातात, असे पक्षी अभ्यासकांचे निरीक्षण होते. १९४०च्या दशकात, भावनगर संस्थानाचे श्री धर्मकुमारसिंह यांनी सुमारे ५०० नर तणमोर पक्ष्यांच्या पायांत कडी बसवली होती. त्यातील फक्त अठरा पक्ष्यांचा मागोवा लागला.

परंतु विणीच्या हंगामानंतर, तणमोर कोणत्या मार्गाने कुठे-कुठे जातात, या विषयीची निश्चित माहिती मिळू शकली नव्हती, मात्र या प्रकल्पांतर्गत एकूण १२ तणमोरांवर टॅग बसविण्याचे काम फत्ते झाले आणि यातून मिळालेल्या माहितीनुसार काही तणमोर हे पुणे, सातारा, पालघर, चंद्रपूर, सोलापूर, नाशिक व अहिल्यानगर येथे वास्तव्यास होते, याचे पुरावे या संशोधनातून मिळाले.

टॅग केलेली एकमेव मादी तणमोर गुजरात व महाराष्ट्रमार्गे तेलंगणात पोहोचली व तेथे वास्तव्य करून विणीसाठी परताना चंद्रपूर जिल्ह्यातील एका विजेच्या तारेवर आदळून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. जर त्या मादीवर टॅग नसता, तर ही घटना कधीच कळली नसती. ही घटना अत्यंत दुःखद होती; पण त्याचबरोबर अशा संशोधनांचे महत्त्व अधोरेखित करणारीही होती.

टॅगने बसविलेले अनेक तणमोर भसाभस वाढत चाललेल्या व ‘पर्यावरण स्नेही’ समजल्या जाणाऱ्या अक्षय ऊर्जा प्रकल्पांच्या विद्युत तारांवर आदळून मृत्युमुखी पडले असण्याची दाट शक्यता नाकारता येणार नाही. माळढोक पक्ष्यांवर ज्या कारणाने नामशेष होण्याचे गंडांतर आले, तीच कारणे तणमोर विलुप्त होण्यासही कारणीभूत ठरू शकतात, याची निश्चित कारणे या प्रकल्पाद्वारे उपलब्ध होत आहेत.

तणमोर आढळत असलेल्या अनेक राज्यांमध्ये अक्षय ऊर्जा प्रकल्प मोठ्या प्रमाणात उभारण्यात आले आहेत व अजूनही नवनवे प्रकल्प येऊ घातले आहेत. वीज महत्त्वाची आहेच, पण अतिदुर्मिळ श्रेणीत आलेल्या तणमोरांना विजेच्या तारांवर ‘बर्ड डायव्हर्टर’ बसवणे अथवा अतिमहत्त्वाच्या अधिवासांवरून जाणाऱ्या तारांना जमिनीखाली गाडण्याचा पर्याय स्वीकारण्यावाचून आता गत्यंतर नाही, हे सत्य स्वीकारूनच अक्षय ऊर्जा प्रकल्पांची उभारणी व्हायला हवी. राजकीय इच्छाशक्तीची जोड तणमोरांच्या (आणि माळढोकांच्या) संवर्धनाला आतातरी मिळेल, अशी आशा आहे.

(लेखक प्रसिद्ध वन्यजीव अभ्यासक, निसर्ग संवर्धक आणि ‘द कॉर्बेट फाउंडेशन’चे संचालक आहेत.)

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.