आरोग्याला प्रथम प्राधान्य
esakal October 19, 2024 08:45 AM

- पूनम खेमनर, क्रीडापटू

शारीरिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी जिम, रनिंग आणि सूर्यनमस्कार हे नियमितरीत्या मी करते. जिममध्ये अप्पर बॉडी, लोअर बॉडी कोअर आणि कार्डिओ अशा पद्धतीने मी जिमचे वर्कआउट करते. त्याचप्रमाणे मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी ध्यानधरणा हा माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा पाया आहे. खेळामध्ये लक्ष केंद्रित करण्यासाठी ध्यानधारणा खूप गरजेची असते.

शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी मी नियमितपणे जिममध्ये जाते. वेगवेगळ्या प्रकारचे वर्कआउट करते. स्टेच ट्रेनिंग, कार्डिओ असे वेगवेगळे वर्कआउट वेगवेगळ्या दिवशी केले जातात.

प्रत्येकाच्या आयुष्यासाठी आहार खूप महत्त्वाचा आहे. मी स्वतः क्रिकेटची खेळाडू आहे, त्यामुळे आहाराबाबत मी खूप सजग आहे. या आहारामुळेच खेळाडू म्हणून मला चांगला फायदा होतो. शरीर स्ट्रॉंग राहते. कोणत्याही प्रकारची दुखापत होत नाही. माझ्या आहारामध्ये प्रोटीन, मल्टिव्हिटॅमिन्स, फायबर आणि कार्बोहायड्रेटचा समावेश असतो. प्रोटिनसाठी मी कधीतरी चिकन किंवा मासे खाते. त्याचप्रमाणे शाकाहारामध्ये पनीर, स्प्राऊट, सोया या पदार्थांचा समावेश करते.

मल्टिव्हिटॅमिनसाठी वेगवेगळ्या ऋतुमानानुसार सर्व प्रकारची फळे नियमितपणे खाते. कडधान्यासह विविध प्रकारच्या पालेभाज्या व फळभाज्यांचाही आहारामध्ये नियमितपणे समावेश असतो. बॉईल्ड केलेले पदार्थ मी जास्त खाते. माझा आहार सर्वसमावेशक असल्यामुळेच माझा फिटनेस चांगला राहतो. मी सतत कार्यमग्न आणि उत्साहवर्धक राहते.

मी सध्या महिलांसाठीच्या आयपीएलमध्ये यूपी वॉरिअर्सच्या संघात खेळत आहे. गेल्या वर्षी मी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या संघात होते. फिटनेससाठी मी बॉक्सिंगसुद्धा करते.

आरोग्य हे माझ्या आयुष्यात प्रथम स्थानावरच आहे आणि असेल. आता खेळाडू असतानाही आणि उर्वरित आयुष्यातही योग्य पद्धतीनेच आहार घेतला जाईल. दिवसातून किमान तीन ते चार लिटर पाणी पिलेच पाहिजे. सकाळी उठण्याची आणि रात्री झोपण्याची वेळ पाळली पाहिजे. तुम्हाला एखादा छंद असेल, तर तो जोपासला पाहिजे. त्यातून आपल्याला आनंद मिळून आपलं मन आणि शरीर प्रसन्न राहते.

सुदृढ आरोग्यासाठी टिप्स

  • आरोग्य हीच जीवनाची खरी गुरुकिल्ली आहे. आरोग्य चांगले असेल, तरच आपण जीवनाच्या सर्व गोष्टींचा आनंद घेऊ शकतो.

  • माणसांकडे नुसता पैसा असून उपयोग नाही. आरोग्य चांगले नसेल, तर त्या पैशांचा काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

  • आरोग्य तंदुरुस्त असेल, तरच आपण आयुष्यभर चांगले जीवन जगू शकू. त्यासाठी दिवसातील एक तास तरी आरोग्यासाठी दिला पाहिजे.

  • कोणत्याही परिस्थितीत धावणे, सायकलिंग, जिम किंवा योगासने व ध्यानधारणा नियमितपणे केली पाहिजे.

  • आहार वेळेवरच घेतला पाहिजे. पाणीही भरपूर प्रमाणात पिले पाहिजे.

(शब्दांकन : अरुण सुर्वे)

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.