भारत - दक्षिण कोरियातील शैक्षणिक दुवा
esakal October 19, 2024 08:45 AM

- प्रा. नागेंद्र कौशिक, रमेश अय्यर

‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे दक्षिण कोरियामध्ये २० ते २६ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या ‘एज्युकॉन’ या शैक्षणिक परिषदेच्या आयोजनात इंडियन्स इन कोरिया (आयआयके) व इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स इन कोरिया (आयसीसीके) या दोन संस्था मोलाचे सहकार्य करीत आहेत. कोरियन नागरिक आणि तेथील भारतीय यांच्यातील दुवा होण्याची महत्त्वाची भूमिका ही संस्था बजावत असून, विविध उपक्रमांची पायाभरणी केली जात आहे.

इंडियन्स इन कोरिया (आयआयके) ही एक अधिकृत आणि ना-नफा तत्त्वावर चालणारी संस्था आहे. सन २००२ मध्ये तिची स्थापना झाली आणि ती दक्षिण कोरियात राहणाऱ्या भारतीयांचे प्रतिनिधित्व करते. इंडियन्स इन कोरिया ही संस्था दक्षिण कोरियातील भारतीय आणि कोरियन समुदायाचे हित जपण्यासाठी काम करते. तिचे १३ हजारपेक्षा जास्त सदस्य आहेत. त्यात कोरियात राहणाऱ्या भारतीय नागरिकांबरोबर ज्या कोरियन नागरिकांना भारतात रस आहे अशाही नागरिकांचा समावेश आहे.

त्यामुळे आयआयके या दोन्ही समुदायांत सामाजिक आणि सांस्कृतिक सेतू म्हणून काम करते. दक्षिण कोरियात अशा प्रकारे नोंदणी झालेली ही एकमेव संस्था असून, संपूर्ण दक्षिण कोरियात राहणाऱ्या हजारो भारतीयांना बळ देण्यात ती महत्त्वाची भूमिका बजावते आहे. ‘सकाळ’च्या एज्युकॉन उपक्रमासाठी ‘आयआयके’चे प्रा. नागेंद्र कौशिक व अमित भट, तसेच ‘आयसीसीके’चे सचिन सातपुते आणि रमेश अय्यर यांची मोलाची मदत झाली आहे.

विद्यार्थ्यांसाठी भरीव कार्य

‘आयआयके’तर्फे वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यात एकत्रीकरण मेळावे, उद्योग-शिक्षण सहकार्य आणि व्यावसायिक नेटवर्किंग यांच्यावर विशेष भर दिला जातो. संस्थेतर्फे आयोजित मेळाव्यांमध्ये विविध व्यावसायिक, विद्यापीठांमधील प्राध्यापक, विद्यार्थी, संशोधक आणि उद्योजक असे विविध क्षेत्रांमधील लोक एकत्र येतात ज्यामुळे अर्थपूर्ण संवादाच्या संधी उपलब्ध होतात.

विविध कार्यक्रमांच्या आयोजनाबरोबरच ‘आयआयके’तर्फे एसएनएस प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण माहितीही आपल्या सदस्यांपर्यंत पोचवली जाते. भूकंप किंवा पूर यांसारख्या आपत्तींनतर आपत्ती निवारण निधीही संस्थेकडून उभारला जातो. कोविड-१९ महासाथीमध्ये ‘आयआयके’ने भारताच्या दूतावासाबरोबर काम करून अडकून पडलेल्या भारतीयांना मायदेशी परत जाण्यासाठी विमानांची व्यवस्था करून दिली; तसेच भारतात त्या वेळी गरजेचे असलेले ऑक्सिजन सिलिंडर्सही मोठ्या संख्येने पाठवण्याची व्यवस्था केली.

दक्षिण कोरियात राहणाऱ्या भारतीयांमध्ये एक प्रकारची आपलेपणाची भावना तयार होण्यासाठी आयआयके झटत आहे. थेट संवाद साधून, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे; उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांच्या बैठकांद्वारे ही संस्था आपल्या सदस्यांना ते घरी असल्याची भावना निर्माण करण्यासाठी काम करते. कोणताही धर्म, प्रदेश किंवा पार्श्वभूमीचे असले तरी त्यांच्यात ही आपलेपणाची भावना निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातात.

व्यापारसंबंध मजबुतीसाठी ‘आयसीसीके’ भारत आणि कोरिया यांच्यातील व्यावसायिक संबंध परस्पर विकास आणि समृद्धीसाठी महत्त्वपूर्ण संधी निर्माण करणारे आहेत. दोन्ही राष्ट्रांकडे मजबूत अर्थव्यवस्था, प्रगत उद्योग असून, दोन्ही देशांनी नवनवीन संकल्पना राबवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. यामुळे परस्पर सहकार्याच्या अनेक शक्यता निर्माण होतात. मात्र, यासाठी द्विपक्षीय व्यापारसंबंध मजबूत करणारे एकत्रित प्रयत्न होणे आणि धोरणात्मकरीत्या पुढाकार घेणे आवश्यक आहे.

इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स इन कोरिया (आयसीसीके) ही संस्था भारतीय आणि कोरियन व्यवसायांमधील एक महत्त्वाचा दुवा म्हणून काम करते. दोन्ही देशांमधील आर्थिक सहकार्य आणि सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवते. व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी स्थापन करण्यात आलेली ‘आयसीसीके’ ही संस्था दक्षिण कोरियामध्ये विस्तार करू पाहणाऱ्या भारतीय कंपन्यांना आणि भारतीय बाजारपेठेत स्वारस्य असलेल्या कोरियन कंपन्यांना आवश्यक ती संसाधने उपलब्ध करून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.

भारत आणि कोरिया यांच्यातील ‘सेपा’ (CEPA) करारानंतर २०१०मध्ये स्थापन झालेल्या ‘आयसीसीके’ने दोन्ही देशांमधील आर्थिक विकास आणि व्यापार संवर्धनात मोलाची भूमिका बजावली असून, त्याबाबत नेतृत्वही केले आहे.

‘आयसीसीके’ची प्रमुख कार्ये व उद्दिष्टे -

१) जागरुकता : भारतीय आणि कोरियन व्यवसायांमध्ये व्यवसाय आणि सांस्कृतिक घटकांची माहिती सामाईक करणे.

२) विकास : आर्थिक आणि सांस्कृतिक वाढीसाठी भारत आणि कोरिया यांच्यातील परस्पर गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे.

३) पाठिंबा : व्यावसायिक संबंध वाढवणाऱ्या आणि दोन्ही देशांमधील व्यापाराची एकूण गुणवत्ता सुधारणाऱ्या व्यापार धोरणांना समर्थन, पाठिंबा देणे.

आयसीसीके ही ना-नफा तत्त्वावर काम करणारी एक संस्था आहे. ती तिच्या सदस्य कंपन्यांसाठी कामाच्या विविध संधी व नेटवर्क उपलब्ध करून देणे, व्यावसायिक समुदायांशी ओळख करून देणे आणि व्यापाराला प्रोत्साहन देत सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवण्यावर लक्ष केंद्रित करणे यांसारखी महत्त्वपूर्ण कामे करत आहे.

‘सकाळ’ माध्यम समूहातर्फे दक्षिण कोरियात होणाऱ्या ‘एज्युकॉन २०१४’च्या यशस्वी आयोजनासाठी इंडियन्स इन कोरिया (आयआयके) व इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स इन कोरिया (आयसीसीके) या दोन संघटना करीत असलेले सहकार्य अमूल्य आहे. या संस्था आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यातून दक्षिण कोरियातील ‘एज्युकॉन’ उपक्रम नक्कीच यशस्वी होईल, असा मला विश्वास आहे.

- डॉ. दिनेश अमळनेरकर, ‘एज्युकॉन दक्षिण कोरिया - २०२४’चे मानद सल्लागार आणि दक्षिण कोरियातील नामांकित विद्यापीठांतील संशोधक

(प्रा. कौशिक ‘आयआयके’ संघटनेचे, तसेच अय्यर ‘आयसीसीके’चे अध्यक्ष आहेत.)

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.