हौस ऑफ बांबू : …म्हणोनि काय शोभणे । चालोचि नयेत?॥
esakal October 19, 2024 08:45 AM

नअस्कार! दसऱ्याचं (उरलेलं) श्रीखंड (चितळे…आणा आणि खा!) खाऊन मेली झोप काय लागली, तर केवढं मोठ्ठं कांड होऊन गेलं. सकाळी उठून बघत्ये तर इकडचं जग तिकडे झालेलं. साहित्य महामंडळाच्या आणि विश्वकोश मंडळाच्या नियुक्त्या रातोरात होऊन गेलेल्या. माझा अगदी जीव खालीवर झाला.

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी आमचे श्रीसंत सदानंदमहाराज मोरे अढळ आहेत, पण बाकी टीम बदलण्यात आली आहे. मोरेसरांना मी अजून अभिनंदनाचा फोन केला नाही. केला, तरी ते काय म्हणणार? ‘ठेविले अनंते तैसेचि राहावे, चित्ती असो द्यावे समाधान’ हा तुकोबामाऊलीचा अभंग ते ऐकवणार, (किंवा खरं तर सुनावणार!) त्यांना मागल्या खेपेला छॉऽऽन ग्रीटिंग कार्ड पाठवलं होतं. उलट टपाली त्यांनी ऊर्दू शायरी पाठवलीन! (शिवाय खाली कठीण शब्दांचे अर्थ!!) त्यापेक्षा या सदरातूनच अभिनंदन केलेलं सेफ राहील! तर मोरेसर, पुन्हा अभिनंदन!!

याच महामंडळाचे उपाध्यक्ष म्हणून प्रदीप ढवळ हे आता (बैठकीत) त्यांच्या उजव्या बाजूला बसतील. अभिजात दर्जा मिळाल्यामुळे आता हे मंडळ नव्या जोमानं काम करेल, अशी अपेक्षा करु या. नाहीतर मराठीचे पांग फेडायचे तरी कोणी?

साहित्य-संस्कृती मंडळाचं राहू द्या, खरी खळबळजनक बातमी दिली ती विश्वकोश निर्मिती मंडळाने. या मंडळाच्या अध्यक्षपदी माझे अत्यंत लाडके सर रवींद्रशास्त्री शोभणे यांची त्या मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. त्यांचं विदर्भीय पद्धतीनं अभिनंदन!!

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यापासून विश्वकोशाच्या महायज्ञाचा प्रारंभ झाला. तर्कतीर्थांनंतर प्रा. मे. पुं. रेगे, प्रा. रा. ग. जाधव, डॉ. श्रीकांत जिचकार, डॉ. विजया वाड, दिलीपराव करंबेळकर, डॉ. राजा दीक्षित अशी तालेवार मंडळी अध्यक्षपदी बसून गेली. परंतु, या अभ्यासू, विचक्षक आणि सव्यसाची परंपरेशी संबंध नसलेल्या रवींद्रशास्त्रींची नियुक्ती का झाली? असा सवाल काही असंतुष्ट करत आहेत. मुळात रवींद्रशास्त्री या परंपरेतले नाहीत, हे यांना सांगितले कोणी?

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे आभाळाएवढं नाव होतं. त्या ऋषितुल्य माणसाची मोजपट्टी लावून दुसऱ्याला उगाचच दूषणं लावण्यात काय अर्थय? खुद्ध रवींद्रशास्त्री शोभणेजींनी जी प्रतिक्रिया दिली, ती किती उमदेपणाची आहे ती तरी बघा. ते म्हणतात : ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशीं यांच्यापासून सुरु असलेल्या या शब्दपरंपरेचा पाईक झाल्याचा मनापासून आनंद आहे. जागतिक ज्ञानवंतांच्या ज्ञानाचा मंडळाला फायदा होईल, यासाठी अध्यक्ष म्हणून सतत प्रयत्न करीत राहीन.’

यावर आपण त्यांना शुभेच्छा द्यायला हव्यात की नाही?

की तर्कतीर्थांचे वांचणे । जगी जालिया शहाणे ।

म्हणौनि काय शोभणे । चालोचि नयेत?॥

…असं आम्ही का म्हणो नये?

याच मंडळाच्या उपाध्यक्षपदी भाजपचे प्रवक्ते केशवराव उपाध्येबुवांची नियुक्ती झाली होती. पण रवींद्रशास्त्रींवरच तोफगोळे बरसू लागलेले पाहून ‘यांची ही अवस्था, तर आपलं काय होईल?’ असा सूज्ञ विचार करुन त्यांनी तितक्याच उमदेपणाने नियुक्ती नाकारली. (मिळवा आता आमदारकी!त्यासाठी आमच्या शुभेच्छा आहेतच!!) मुळात उपाध्यक्षपद हे दोन्ही संस्थांच्या घटनेमध्येच नमूद केलेलं नाही. तरीही या नियुक्त्या झाल्या. म्हणूनच त्या रातोरातही झाल्या. चालायचंच. अभिजात भाषेला काहीही शोभतं!!

नव्या नियुक्त्यांमध्ये कविवर्य डॉ. महेश केळुस्कर, विनोदवीर तंबीदुराई ऊर्फ श्रीकांत बोजेवार अशी आमच्या खास मित्रमंडळींची नावंही दिसली. (मेल्यांनी ताकास तूर लागू दिला नाहीन! किती हा कंजूषपणा? नाही मागत हो पार्टी!!)

…बाकी आपल्या मराठी भाषेच्या राज्यात सारं काही आलबेल आहे. ते तसंच राहो, ही सदिच्छा!

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.