Sillod Politics : सिल्लोडमध्ये मंत्री अब्दुल सत्तार यांची एकाहाती सत्ता कोण भेदणार? महाविकास आघाडीकडून कोणाची तयारी? वाचा सविस्तर
Saam TV October 19, 2024 05:45 AM

सिल्लोड : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड हा सर्वाधिक चर्चेतला विधानसभा मतदरसंघ आहे. सलग तीन टर्म आमदार, वेगवेगळी मंत्री पदे भूषवलेले मंत्री अब्दुल सत्तार यांची या मतदारसंघात एकहाती सत्ता आहे. यावेळी त्यांच्या एकहाती सत्तेला हादरा देण्यासाठी युतीतलेच भाजपचे नेते दंड थोपटले आहेत. शिवाय ठाकरे गटाच्या शिवसेनेने समीकरणे जुळवत निवडणुकीच्या मैदानात दोन हात करण्याची तयारी केली आहे, त्यामुळे यावेळेसची निवडणूक रंगतदार होईल अशी शक्यता आहे.

जगप्रसिद्ध अजिंठा लेणी, मिरची आणि मक्याचे आगारासोबत ऐतिहसिकदृष्ट्या प्रसिद्ध असलेला आणि नेहमी चर्चेत राहणारा मराठवाड्यातला आणखी मतदारसंघ म्हणजे सिल्लोड. त्यात राज्यातील राजकारणात आक्रमक आणि कायम चर्चेत असणारे मंत्री म्हणून सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांची ओळख आहे. त्याशिवाय सिल्लोड मतदारसंघांवर त्यांची मजबूत पकडही आहे. मूळ काँग्रेसी असलेले सत्तार हे २०१९ मध्ये शिवसेनेत दाखल झाले. गेल्या पाच वर्षात महसूल राज्यमंत्री, त्यानंतर शिंदे सेनेत कृषिमंत्री आणि आता अल्पसंख्यांक मंत्री अशी जबाबदारी पार पाडली. काँग्रेसमध्ये असताना आणि त्यानंतर युतीमध्ये आल्यानंतर भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांची मैत्री चर्चेत होती.

निवडणुकीमध्ये अप्रत्यक्षपणे सत्तार हे दानवे यांना लोकसभेत मदत करायचे आणि दानवे हे सत्तार यांना विधानसभेत मदत करायचे हे काही लपून राहिले नाही. मात्र, २०२४ च्या लोकसभेत दानवे यांचा पराभव झाल्यानंतर मात्र दोघांचा वाद विकोपाला गेला. दानवे यांनी सत्तारांमुळे सिल्लोडचा पाकिस्तान झाल्याचे जाहीररीत्या म्हणल्यानंतर सत्तार समर्थकांनी मोर्चा काढला. त्याला प्रतीत्युत्तर म्हणून दानवे समर्थकांनी काढला.

सिल्लोड विधानसभा मतदारसंघात सिल्लोड आणि सोयगाव हे दोन तालुके आहेत. गेल्या १५ वर्षांपासून सत्तार यांच्या विरोधात सिल्लोड- सोयगावमध्ये फारशे कोणी आक्रमकपणे पुढे येत नव्हते. जिल्हा बँक, दुध संघ, विविध सोसायट्या, नगर पालिका, नगर पंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समित्या या सत्तरांच्या ताब्यात आहेत. त्यांचा दोन्ही तालुक्यात वरचष्मा आहे. मात्र अलीकडच्या काही काळात भाजपचे स्थानिक नेते वेगवेगळ्या मुद्द्यांवरून आंदोलने आणि युतीच्या नेत्यांकडे तक्रारी करू लागलेत.

सातत्याने आंदोलने सुरु आहेत. त्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटानेही सत्तार विरोधात उमेदवार रिंगणात उतरवण्यासाठी दंड थोपटले आहेत. त्यासाठी भाजपचे प्रदेश चिटणीस सुरेश बनकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उद्धव सेनेत दाखल झालेत. त्यामुळे सलग तीन वेळा एकहाती सत्ता राखणाऱ्या अब्दुल सत्तारांच्या सिल्लोड विधानसभेची निवडणूक रंगतदार होईल असं दिसतंय.

मतदारसंघात विद्यमान आमदार अब्दुल सत्तार यांच्याबरोबर युतीकडून भाजपचे ज्ञानेश्वर मोठे, माजी आमदार सांडू पाटील लोखंडे आमदार सुनिल मिरकर इच्छुक आहेत. मात्र भाजपच्या तिघानाही तिकीट मिळणार नसल्याने बंडखोरीची शक्यता आहे.

महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचे भास्कर पाटील घायवट, उद्धव ठाकरे शिवसेनेचे ठगणराव पाटील भागवत, कैसर आझाद, शरद पवार राष्ट्रवादीचे रंगनाथ काळे इच्छुक आहेत. मात्र शिवसेनेकडे जागा असल्याने कालच भाजपमधून उद्धव सेनेते दाखल झालेल्या सुरेश बनकर यांना उमेदवारी मिळेल अशी शक्यता आहे.

यावेळी प्रमुख दुरंगी लढत होईल अशी स्थिती आहे. मात्र मतदारांचा कौल कसा राहील यावर सगळी भिस्त असेल. विशेष म्हणजे या मतदारसंघात मराठा मतदार बहुसंख्य आहे. त्यापाठोपाठ मुस्लीम मतदार, राजपूत, बंजारा आणि ओबीसी समाजाच्या मतदारांची संख्याही बरीच आहे.

सिल्लोड विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्यावेळी ३ लाख ३९ हजार ८४७ मतदार होते. त्यात आता १५ हजार ४१३ ची भर पडून मतदारसंख्या ३ लाख ५५ हजार २८० एवढी झाली आहे.

२०२४ च्या सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातून युतीचे उमेदवार २७ हजार ७५९ मतांनी पिछाडीवर राहिले. कॉंग्रेसचे उमेदवार कल्याण एक लाख एक हजार ३७ मते मिळाली होती तर दानवे यांना ७३ हजार २७८ मते मिळाली होती.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीचे चित्र असले तरी सत्तार यांच्या पाठीशी असणारा जनाधार मोठा असल्याचे बोलले जातय. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सत्तार हे २४ हजार ४६५ मतांनी विजयी झाले होते. त्यागोदर २०१४ मध्ये मोदी लाटेत ही कॉंग्रेसचे उमेदवार असताना १४ हजार मतांनी विजयी झाले होते. त्यापूर्वी २००९ मध्ये काँग्रेसमध्ये असताना २६ हजार ७५३ मतांनी विजय मिळवला होता. त्यामुळे लाट कोणतीही असू दे किंवा विरोध कितीही असू दे सत्तार विजयी होणार असे समीकरण आतापर्यंत दिसले आहे. आता या निवडणुकीत चौथ्यांदा सत्तार विजयी होतात का हे पाहावे लागेल.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.