Bjp Sillod constituency Leader suresh bankar join Shivsena UBT at Matoshree mumbai urk
Marathi October 19, 2024 03:24 AM


मुंबई – विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. लवकरच महायुती आणि महाविकास आघाडी जागा वाटप जाहीर करणार आहे. अशा वेळेस शिवसेना ठाकरे गटाने छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला भगदाड पाडले आहे. छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात लढण्यासाठी भाजपचा बडा नेता मैदानात उतरवण्याची तयारी ठाकरे गटाने केली आहे. भाजपचे प्रदेश चिटणीस सुरेश बनकर यांनी आज मुंबईत उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्री येथे 2000 कार्यकर्त्यांसह पक्ष प्रवेश केला आहे.

ठाकरे गटाला सिल्लोडमध्येही मिळाला उमेदवार 

शिवसेनेते बंडखोरी झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिवसेनेच्या सहा पैकी पाच आमदारांनी शिंदे गटात जाणे पसंत केले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर मराठवाड्यात त्यांचा पहिला जंगी सत्कार हा सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार यांनी केला होता. विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केलेल्या संजय शिरसाट, प्रा. रमेश बोरनारे, प्रदीप जैस्वाल, पैठणचे माजी आमदार संदीपान भुमरे या आमदारांच्याविरोधात ठाकरे गटाने जवळपास उमेदवार निश्चित केले आहेत. फक्त सिल्लोडचे आमदार आणि महायुती सरकारमधील मंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात ठाकरे गटाला उमेदवार मिळत नव्हता. आज भाजपचे सुरेश बनकर यांनी मोठ्या लवाजम्यासह मातोश्री येथे उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन बांधून ठाकरे गटात प्रवेश केला आहे. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, कन्नडचे आमदार उदयसिंह राजपूत देखील उपस्थित होते.

– Advertisement –

ठाकरे गटातील पक्ष प्रवेशानंतर बनकर म्हणाले की, अब्दुल सत्तार यांनी सिल्लोडमध्ये जमीनी लाटल्या आहेत. त्यांनी शिवसेनेसोबत गद्दारी केली , आता या गद्दारांना पाडल्याशिवाय राहणार नाही.बनकर यांच्यासोबत भाजप अल्पसंख्याक विभागाचे इद्रिस मुलतानी, माजी आमदार सांडू पाटील लोखंडे यांनीही ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे सिल्लोडमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी रंगतदार लढत होण्याची शक्यता आहे.

छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोडमध्ये आमदार अब्दुल सत्तार, औरंगाबाद मध्यमध्ये आमदार प्रदीप जैस्वाल, औरंगाबाद पश्चिम आमदार संजय शिरसाट, वैजापूरमध्ये आमदार प्रा. रमेश बोरनारे यांच्या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट तगडे आव्हान उभे करण्याच्या तयारीत आहे.

– Advertisement –

हेही वाचा : Maha Elections : शिंदेंच्या आमदाराविरोधात लढण्याची ठाकरेंच्या माजी खासदाराची तयारी; राऊतांची घेतली भेट

Edited by – Unmesh Khandale



Source link

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.